सर्वप्रथम कविता नुसतीच वाचायची नाही तर ती ‘भोगायची’ असते. त्यासाठी पूर्वग्रहांची सर्व वस्त्रं बाजूला सारून निर्वस्त्र होऊन तिला सामोरं जायला हवं. पूर्वग्रहदूषित असून चालणार नाही. नितळ मनानं कवितेच्या तळ्यात उतरलं तर सौंदर्याची कमळं हाती लागण्याचा संभव असतो; अन्यथा नाही.
अशी एकाहून एक शब्दांची, अनुभूतींची सौंदर्यस्थळं वाचक रसिकांना ‘चिंतन झुंबराची प्रकाशवलये’ या ललित लेखसंग्रहात जागोजागी अनुभवायला मिळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे लेखक हा प्रथम संवेदनशील मन लाभलेला कवी आहे. ‘चाफा बोलेना..चाफा चालेना’ असं भावविभोर, काळजातून लिहिणार्या ‘कवी बी’ म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांचे हे लेखक, कवी नातू आहेत. असा समृद्ध वारसा, कवितेचा प्रसन्न झरा ज्यांच्या रंध्रारंध्रातून वाहत आहे, असे कवी, लेखक, मित्रवर्य अशोक दत्तात्रेय गुप्ते यांचे नुकतेच ‘चिंतन झुंबराची प्रकाशवलये’ हे आत्मचिंतनात्मक ललित लेखसंग्रहाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. एकूण ३१ लेखांमधून गुप्तेसरांनी वाचक-रसिकांशी लालित्यपूर्ण संवाद साधला आहे. आध्यात्मिक बैठक, शब्दांची उत्तम जाण, सहज-सुंदर प्रसन्न शब्दकळा, उत्तम वाचक असल्याने लेखात डोकावणारे अनेक रसपूर्ण संदर्भ, अशा वैशिष्ट्यांमुळे गुप्तेसरांचा हा लेखसंग्रह वाचकाला एका समृद्ध विश्वाचे दर्शन देतो.‘ललित’ याचा अर्थ म्हणजे सुंदर, सौंदर्य. या ललित वाङ्मय प्रकारात कलात्मक किंवा सौंदर्यपूर्ण लेखनाचा समावेश होतो. आजूबाजूला घडणार्या विविध घटना, किस्से, प्रसंग, निसर्ग, विविध प्रवृत्तीची माणसे, आठवणी याचा आधार मुख्यत्वे ललितलेखनाला असला तरी त्यातून साकारणार्या अद्भुत विश्वाची सफर, वेगळी ओळख लेखक आपल्या कल्पनाशक्तीतून, लाभलेल्या प्रतिभेतून आणि अनुभव विश्वामधून कागदावर साकारत असतो. लेखक, कवी अशोक गुप्ते यांनी अशाच अनुभवविश्वाची रसपूर्ण सफर लेखांद्वारे वाचकांना घडवली आहे. कवी अशोक गुप्ते यांचे हे सहावे पुस्तक.
लेखकाने आपल्या मनोगतातून ललित लेखाची परंपरा, आलेले अनुभव, विविध टप्प्यांमध्ये गवसलेली व्यक्तिमत्त्वं आणि लेखन प्रवास रेखाटला आहे. त्यात ते म्हणतात, “या सार्या चिंतनाच्या परिपाकातून, निर्मितीप्रक्रियेच्या गुर्हाळातून साकार झालेले माझे हे काही ललित लेख. म्हणूनच या संग्रहाचे नाव ‘चिंतन झुंबराची प्रकाशवलये’ असे ठेवले, तर सुप्रसिद्ध कवी, गीतकार अशोक बागवे यांनी या पुस्तकाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. ते संवाद साधतात, यात झुंबरे आहेत. पण, ती डोळे दीपवणारी नाहीत, तर आल्हाददायक मन प्रभेची निरांजने ठरली आहेत! कित्ती सुरेख!आध्यात्मिक स्वरूपाचे लेखन, बोधप्रद, संदेशात्मक लेखन, संस्कृती-परंपरेवरचे भाष्य, कवितेसंबंधी, व्यक्तिचित्रण, अशा विविधविषयांची बिलोरी प्रकाशवलये लेखकाने या पुस्तकात रेखाटली आहेत. जागेअभावी सर्वच ३१ लेखांचा परामर्श इथे घेणे केवळ अशक्य. परंतु, काही भावलेल्या लेखांची झलक खास वाचकांसाठी. ‘नमन’ या पहिल्याच लेखातून ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्यांचा संदर्भ देऊन वर्तमानकाळातील बदलत्या चालीरीतींबद्दल, बदललेल्या भाषेबद्दल, समाजाबद्दल, व एकूणच जगण्याबद्दलची निरीक्षणे दर्शवली आहेत. पहिल्या पावसाच्या वासाचा परिमळ कोणाला आवडत नाही? तर या वासाचे अंतरंग, बाह्यरंग छान उलगडून दाखवले आहेत, ‘वासांच्या सहवासात’ या लेखातून. ‘इके बुगा.. इके बुगा’ या नावातच बालकाचे निर्व्याज हास्य लपले आहे. जरूर वाचावा असा लेख. कवितेचं सुचणं, प्रसवणं आणि नंतर कागदावर उमटणे हे खरोखरच ‘हॅपनिंग’ असतं. कवितेच्या एकूण निर्मितीप्रक्रियेबद्दलची आपली मतं, निरीक्षणे विविध कवितांचे संदर्भ देऊन अभ्यासपूर्ण लिहिले आहे ते ‘शब्दांच्या अर्भकांची गर्भस्थाने’ या लेखातून. त्याचप्रमाणे ‘कविता : एक भोगणे’ आणि ‘कविता : एक वाचणे’ हेही दोन लेख वाचावेत असे. अध्यात्म म्हणजे नेमकं काय? पूजाअर्चा, कर्मकांड की आणखीन काही? या सर्वांची उत्तरं तुम्हाला ‘माझे अध्यात्म’मध्ये सापडतील. समर्थांनी ४०० वर्षांपूर्वी आपल्या मनाच्या श्लोकांमधून जीवनाचे सार, आयुष्याचे गणित आणि प्रपंचाचे गुपित समर्थ शब्दात सांगितले आहे. आज २०२१ च्या काळातदेखील ते संदर्भ, त्यातले तत्त्वज्ञान तंतोतंत लागू पडतात. ‘तुटे वाद-संवाद तो हितकारी’ या लेखातून समर्थांच्या अमृतशब्दांचा आधार घेत आजच्या वर्तमानकाळातील अनेक विषयांवर लेखकाने मौलिक भाष्य केले आहे.
विविध चॅनल्सवर सध्या निरागस मुलांचे रिअॅलिटी शो सतत सुरू असतात. त्यातील वेदना, जीवघेणी स्पर्धा, मनाचे कोमेजून जाणे, यावर भाष्य केले आहे ते त्या ‘छोट्याचे भावविश्व आणि रिअॅलिटी शो’ या लेखातून. आपले आजोबा कविश्रेष्ठ कवी बी. यांच्याबद्दलचा ‘न कोमेजलेला चाफा’हाही लेख जरूर वाचावा असा आहे. डोंबिवलीतलं एक व्रतस्थ, निर्मोही व्यक्तिमत्त्व म्हणजे कविश्रेष्ठ द. भा. धामणस्कर. यांच्या एकूण कविताप्रवासाबद्दल काय बोलावे आणि कसे? त्यांना मीही प्रत्यक्ष भेटल्यावर माझीही अवस्था गुप्ते सरांसारखीच झाली होती. त्यांचा आशीर्वाद लाभणे म्हणजे परमोच्च समाधानाचा कृतार्थ बिंदू. ‘समाधान संक्रमित करणारा कलावंत’ या लेखातून दंभांचे अंतरंग कवितेच्या अंगाने उलगडून दाखवले आहेत आणि संग्रहातील शेवटचा लेख. गुप्ते सर ज्यांना कवितेतले गुरू मानतात, ते सर्वांचे आवडते कवी, गीतकार अशोक बागवे सर. लेखनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात लेखकाला लाभलेलं बागवेसरांचे मौलिक मार्गदर्शन, सूचना, दिलासा. बागवेसरांचे मोठेपण, शब्दांवरची हुकूमत सारं सारं शब्दबद्ध झालं आहे ‘अशोक बागवे स्कूल ऑफ पोएट्री’ या सहज-सुंदर लेखातून.
या सुंदर पुस्तकाचे अंतरंग आणि बाह्यरंग सजवले आहेत ते पुण्याच्या ‘संवेदना प्रकाशन’ यांनी. मुखपृष्ठ, मांडणी आणि बांधणी अप्रतिम. कवी मनाच्या गाभार्यात मंदपणे हलणारीही चिंतन झुंबरे वाचक-रसिकांना नक्कीच सुखावतील यात शंकाच नाही.
पुस्तकाचे नाव : चिंतन झुंबराची प्रकाशवलये
लेखक : अशोक गुप्ते
प्रकाशन : संवेदना प्रकाशन, पुणे.
पृष्ठसंख्या : १७६
मूल्य : रु. २५०/-
- रामदास खरे