
मुंबई - मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शुक्रवारी सायंकाळी पार पडणाऱ्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना नेते रामदास कदम हजर राहणार नाहीत. रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या आॅडियो क्लिपनंतर शिवसैनिकांमध्ये कदमाविरोधांत संतापाचे वातावरण आहे. मात्र, रामदास कदम यांनी एक पत्र लिहून प्रकृती ठीक नसल्याचे सांगत आपण दसरा मेळाव्याला उपस्थित न राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्याना दिली आहे.
अनिल परब यांच्याबाबत रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर कदम वादात सापडले होते. रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली बाजू देखील मांडली होती. तीन महिन्यापासून प्रकृती ठीक नाही, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याचे कदम यांनी सांगितले आहे.
माझ्या मंत्रिपदाच्या काळात कोकणातील पर्यटन उद्योग वाढावा यासाठी सीआरझेडमध्ये शिथिलता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला होता. दापोली तालुकाच नव्हे तर संपूर्ण कोकण किनारपट्टीत स्थानिकांना पर्यटनाद्वारे रोजगार मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहणार आहे. मंत्री अनिल परब यांच्याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याबाबत बोलणे उचित नाही. पण येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असा खुलासा रामदास कदम यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.