नाम ही काफी हैं...

वेध - नाम ही काफी हैं...

    12-Oct-2021
Total Views | 93

Pakistan_1  H x
एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान दि. २४ ऑक्टोबर रोजी ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेदरम्यानआमने-सामने येणार आहेत. २०१९च्या विश्वचषक स्पर्धेमधील लढतीनंतर जवळपास दोन वर्षांनी हे दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मात्र, मैदानावरील ही लढत रंगण्यापूर्वीच पाकिस्तानच्या कृत्यामुळे क्रिकेट विश्वात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आपल्या खेळाडूंच्या कपड्यांवरचा लोगो पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) परवानगी न घेताच बदलण्याचे धाडस केले आहे. ‘लोगो’मध्ये असणारे भारताचे नाव काढत त्याठिकाणी पाकिस्तानने संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) नाव दिले आहे. याबाबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्यानंतर यावरून क्रिकेट वर्तुळात वादावादी सुरु झाली आहे. २०२१ ‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी भारतावर आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा जरी भारताऐवजी दुबईत खेळविण्यात येत असली, तरी ‘आयसीसी’च्या नियमांप्रमाणे या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी भारताची आहे. त्यामुळे ‘लोगो’मध्ये परवानगी न घेता बदल करण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नाही. परंतु, पाकिस्तानने अखेर खोडसाळपणा केलाच. त्यामुळे पाकिस्तान कारवाईस पात्र आहे, यात काही दुमत नाही. ‘आयसीसी’च्या नियमांप्रमाणे आपल्या देशाच्या खेळाडूंच्या कपड्यांवर काही बदल करावयाचे असल्यास त्याआधी परवानगी घेणे बंधनकारक आहे. आक्षेपार्ह बदल नसल्यास ‘आयसीसी’ परवानगी देते. मात्र, परवानगी न घेता कपड्यांवर बदल केल्यास खेळाडूवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद ‘आयसीसी’च्या नियमांमध्ये आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या एकूण मानधनाच्या १० ते ५० टक्क्यांपर्यंतचे मानधन कापण्याचा नियम ‘आयसीसी’चा आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कपड्यांवरील ‘लोगो’मध्ये बदल न केल्यास पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंवर कारवाई झाल्यास नवल वाटायला नको. दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी पाकिस्तान प्रत्यक्ष सामन्याआधी आपल्या खेळाडूंच्या कपड्यांवरील ‘लोगो’मध्ये बदल करेलही. मात्र, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खोडसाळपणा करून नेहमी भारताला डिवचण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांवरही कारवाईची वेळ आली आहे. ‘आयसीसी’ने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आता तरी शहाणपण सुचेल?

भारताला अशाप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न करण्याची पाकिस्तानची ही काही पहिली वेळ नाही. भारताकडून दरवर्षी ‘इंडियन प्रीमिअर लीग’ (आयपीएल) स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र, आपल्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळण्यास संधी मिळत नसल्याच्या रागातून पाकिस्तान भारताला डिवचण्यासाठी दरवर्षी न चुकता असे अनेक केविलवाणे प्रयत्न करत असल्याची उदाहरणे आहेत. यंदाही ‘आयपीएल’ स्पर्धेच्या कालावधीदरम्यानच पाकिस्तानने न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन बलाढ्य देशांसोबत दौऱ्यांचे आयोजन केले होते. मात्र, सुरक्षेच्या मुद्द्यावर बोट ठेवत न्यूझीलंडच्या संघाने सामना सुरू होण्याच्या नेमक्या तासाभरापूर्वी अखेरच्या क्षणी पाकिस्तानसोबत न खेळण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडनंतर इंग्लंडच्या संघानेही असाच निर्णय घेतल्याने पाकिस्तान तोंडावर आपटला. भारताच्या ‘आयपीएल’ स्पर्धेत खेळण्यासाठीच या दोन्ही संघांनी आपल्या देशातील दौऱ्यांतून काढता पाय घेतल्याचा आरोप पाकिस्तानच्या खेळाडूंनी केला. मात्र, सुरक्षेच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तरे देताना पाकिस्तानची बोलती बंद झाली. इतकेच नव्हे, तर ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डा’च्या (पीसीबी) अध्यक्षपदी विराजमान असणारे रमीझ राजा यांनी नुकतेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटेल तेव्हा ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड’ बंद करू शकतात, असे खळबळजनक विधान केले होते. आर्थिक चणचण भासत असल्याने खेळाडूंचे मानधन वेळेवर देण्यात अपयशी ठरलेला ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड’ विविध देशांकडे आपल्या देशात दौरे आयोजन करण्यासाठी याचना करत आहे. मात्र, बलाढ्य देश सुरक्षेच्या मुद्द्यावर खेळण्यासाठी तयार होत नसल्याने ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्ड’ आर्थिक डबघाईला आला आहे. परंतु, आपले हे अपयश झाकून ठेवत थेट दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांवर कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप करण्यापर्यंत यांची मजल जाते. आर्थिक परिस्थितीचा ताळमेळ उत्तमप्रकारे हाताळू न शकलेल्या पाकिस्तानच्या या क्रिकेट बोर्डाकडे आता गाशा गुंडाळायची वेळ आली आहे. परंतु, यासाठीही भारतच जबाबदार आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. आपली आर्थिक स्थिती कशी भक्कम करता येईल, यावर आत्मचिंतन करण्याची गरज पाकिस्तानला आहे. मात्र, मूर्खाला शहाणपण सुचेल कसे, हे एक न उलगडणारे कोडेच!
 
- रामचंद्र नाईक 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121