मनसे नेते संदीप देशपांडे यांची शिवसेनेवर टीका!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून सतत विधान करणारी अभिनेत्री कंगना राणावतने आता राज्य सरकारलाच लक्ष्य केले आहे. त्यामुळे शिवसेना आणि कंगना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत आहे, असे विधान केल्यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. ‘तर मुंबईत येणारच. हिंमत असेल तर अडवून दाखवा’, असे आव्हान कंगनाने दिले आहे. शिवसेना विरुद्ध कंगना वादात आता मनसेने उडी घेतली आहे.
शिवसेना आणि कंगना वादामागे वेगळेच कारण असल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सांगितले आहे. सध्या राज्यात विविध प्रश्न आहेत. लोकांचे हाल होत आहेत. त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना नेते कंगनाला इतके महत्त्व देत आहेत, असा दावा त्यांनी केला. ‘सध्या मंदिरात कोणालाही जाता येत नाही. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे उपचाराअभावी हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री घरात बसल्याने जनतेत नाराजी आहे. रेल्वेसेवा सुरू नसल्याने लोकांचे प्रचंड हाल सुरू आहेत,’ अशा शब्दांत देशपांडेंनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.
राज्यातील असंख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष वळ्वण्यासाठी ज्या व्यक्तीच्या वक्तव्याला पाच पैशांची किंमत नाही, त्याला शिवसेनेचे नेते किंमत देत आहेत. ती व्यक्ती केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असले विधाने करत आहे. त्या व्यक्तीने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नक्कीच नाही. पण शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकतेय? का हा प्रश्न आहे. इतर सगळ्या गोष्टींवरून लक्ष विचलित करून या एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत व्हायला हवे, हा शिवसेनेचा प्रयत्न आहे का, त्यासाठी काही षडयंत्र रचले जात नाही ना, याचा विचार जनतेने करायला हवा, असे मनसेनेते संदीप देशपांडे म्हणाले.