भाषाशास्त्र आणि कल्पनांचे मनोरे

    25-Jul-2020
Total Views | 257
Aaryans_1  H x




‘आर्यांच्या आक्रमणाचा/स्थलांतराचा सिद्धांत’ नावाचे पितळ उघडे करण्याच्या या उपक्रमात अजून एक पाऊल पुढे टाकताना, आपण यातला पुढचा एक पदर समजावून घेऊ. हा पदर आहे ‘Linguistics’ अर्थात भाषाशास्त्राचा. भाषांचा अभ्यास करणार्‍या काही युरोपियन अभ्यासकांनी जगभरातल्या असंख्य भाषा आणि त्यातल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. त्यावरून भाषांचा विकास आणि प्रवास यांच्याबद्दल काही आडाखे बांधले. हे आडाखे ‘जगात जिथे जसे सोयीचे, तिथे तसा तर्क’ या तत्त्वावर बांधले गेले. अशा आडाख्यांनाच ‘संशोधन’ असे नाव दिले. भारतावर राज्य करताना इथल्या गौरवास्पद गोष्टींना हीन ठरवणारा, परंतु अतिशय निष्पाप दिसणारा असा एक महामार्गच जणू या निमित्ताने या युरोपियन लोकांना गवसला. काय सांगते हे भाषाशास्त्र? आगामी काही लेखांमध्ये जरासे समजून घेऊ.


भाषांमधले दुवे
भारतात वसाहती करायला आलेल्या युरोपियन देशांनी भारतीय समाज आणि संस्कृती यांचाही अभ्यास करायला सुरुवात केली. यातून भारतीयांचे किंवा जगाचे कल्याण करण्याचा या अभ्यासाचा हेतू अर्थातच नव्हता, तर इथल्या लोकांच्या मनात कसल्याही प्रकारची गौरवाची भावना राहू न देता, त्याच्याऐवजी हीनतेची भावना निर्माण करावी, हाच होता. हे आता काळाच्या ओघात पुरेसे सिद्धही झालेले आहे. असे केल्यानेच या वसाहतवादी देशांना इथे सुखाने राज्य करता येणार होते. अगदी सुरुवातीचा असा अभ्यास बघायचा झाल्यास ‘फिलिप्पो सासेट्टी’ (Filippo Sassetti) नावाच्या एका इटालियन अधिकार्‍याने केलेला अभ्यास बघता येईल. सन १५८३ ते १५८८ या दरम्यान हा अधिकारी गोवा आणि कोचीन येथे राहत असे. त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास सुरु केला. त्याची काही निरीक्षणे तो पत्राने मायदेशी कळवत असे. त्यात त्याने संस्कृत आणि इटालियन भाषेतले काही समान वाटणारे शब्द लिहून कळवले होते. जसे ‘साप’ या अर्थाचा ‘सर्प’ आणि ‘Serpe’, ‘देव’ या अर्थाचा ‘देव’ आणि ‘Dio’, आई-वडील या अर्थाचे ‘मातृ-पितृ’ आणि ‘Madre-Padre’ इत्यादी. फिलिप्पोने या भाषांमधली अशी अनेक साम्यस्थळे शोधून काढली. पुढे गोव्यात त्याचे निधन झाले आणि हा अभ्यास इथेच थांबला. थोड्याफार फरकाने अशीच निरीक्षणे इतरही काही युरोपीय अभ्यासकांनी नोंदवली होती. पण, यांच्यापैकी कुणीही त्यातून पुढचा कुठला एखादा ठोस असा निष्कर्ष काढला नव्हता.


विल्यम जोन्स यांचे संशोधन
पुढे इंग्लंडहून आलेल्या सर विल्यम जोन्स (William Jones) यांनी मात्र हा अभ्यास पुढे नेला. सन १७८३ मध्ये हे महोदय भारतात न्यायाधीश म्हणून आले. न्यायदानासाठी आधी इथली संस्कृती समजणे आवश्यक, म्हणून संस्कृत शिकले. ती शिकताना संस्कृत आणि अन्य युरोपीय भाषांमधली अनेक साम्यस्थळे त्यांनीही इतरांप्रमाणेच शोधून काढली. पण, त्याच्याही पुढे जाऊन त्यातून त्यांनी असा निष्कर्षही काढला की, अनेक शब्दांमध्ये दिसणार्‍या सारखेपणावरून संस्कृत, पर्शियन, इंग्लिश, लॅटिन, गोथिक आणि ग्रीक या सर्व भाषा-भगिनीच (Sister languages) आहेत. आता एकदा या भाषांना एकमेकांच्या ‘बहिणी’ म्हटले, म्हणजे त्यांचे समान असे एक कुळ आले आणि त्यांची समान अशी कुणीतरी एक आईसुद्धा आलीच! मग कोणते असू शकेल हे कुळ आणि कोणती भाषा असू शकेल या भाषा-भगिनींची आई? या भाषांच्या कुळाला त्यांनी ‘इंडो-युरोपीय’ भाषा (Indo-European languages) असे नावही दिले. पण, या सर्व भाषा-भगिनींची आई म्हणावी, अशी एकही विद्यमान भाषा जोन्स महोदयांना काही सापडली नाही. मग त्यांनी तिथे एक काल्पनिक भाषा मानली, जी त्यांच्या मते या भाषांच्या सुरुवातीच्याही फार फार आधी होऊन गेली असावी. त्यांनी त्या भाषेला असेच एक पारिभाषिक नावही दिले ‘इंडो-युरोपीय पूर्व’ भाषा अर्थात Proto-Indo-European (PIE) language. अर्थातच, ही एक कल्पनेतली भाषा असल्यामुळे त्या भाषेचे नेमके स्वरूप काय असावे, हे सांगता येणार नाही - अशी त्यांनी त्यावर सोयीस्कर भूमिकासुद्धा घेतली. पण, या ‘PIE’ भाषेतूनच युरोपातल्या आणि भारतातल्या विद्यमान सर्व भाषा काळाच्या ओघात हळूहळू विकसित होत गेल्या, हे मात्र त्यांनी अगदी ठासून सांगितले.


भाषेची मायभूमी
यातून विल्यम जोन्स महोदयांनी पुढे असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की, जशी ही अगदी जुनी ‘PIE’ भाषा पूर्वी कधीतरी अस्तित्वात होती, तसे ती भाषा बोलणारे कुणीतरी तितकेच प्राचीन लोकही अस्तित्वात असतीलच! आणि जर असे लोक अस्तित्वात होते, तर त्यांचे राहण्याचे एखादे निश्चित असे मूळ ठिकाणही असणार. अशा प्रकारे यातून अजून एक कल्पना जन्माला आली, ती म्हणजे ‘भाषेची मायभूमी’ अर्थात ‘Homeland of language.’ जोन्स साहेबांनी या भाषांचा जो गट सांगितला, तो युरोपापासून भारतापर्यंत - असा संपूर्ण युरेशियात पसरलेला होता. त्यामुळे अशा एखाद्या प्राचीन काल्पनिक भाषेचे मूळ ठिकाणसुद्धा या प्रदेशाच्या दृष्टीने मध्यवर्तीच कुठेतरी असणार! अर्थात, त्या काल्पनिक ‘PIE’ भाषेची मायभूमी (Homeland) ठरली ‘मध्य आशिया.’



Aaryans_1  H x



भाषांची स्थलांतरे आणि परिवार
मग ती काल्पनिक ‘PIE’ भाषा बोलणारे आणि मध्य आशियात राहणारे ते काल्पनिक लोक तिथून सगळीकडे स्थलांतरित झाले. पण, ही स्थलांतरे मात्र काल्पनिक नाहीत बरं! काही जण पश्चिमेला युरोपात गेले, तिकडे युरोपीय भाषा जन्माला आल्या. काही जण दक्षिणेला इराण आणि भारतात आले, तिकडे इंडो-इराणी (Indo-Iranian) भाषा तयार झाल्या. काही जण पूर्वेला गेले, त्यातून काही आशियाई भाषा तयार झाल्या. अशा पद्धतीने मध्य आशियामधून लोकांनी इतरत्र स्थलांतरे केल्यामुळे एका ‘PIE’ नावाच्या आईपासून जन्मलेल्या या सगळ्या भाषा-भगिनी काळाच्या ओघात विकसित होत गेल्या. त्यांच्यापासून अजून छोटे छोटे भाषा-परिवारसुद्धा विकसित होत गेले. वर उल्लेख केलेला ‘इंडो-इराणी’ हा सुद्धा असाच एक भाषा-परिवार. यामध्ये सर्व इराणी भाषा आणि सर्व उत्तर भारतीय भाषा येतात. यातल्या उत्तर भारतीय भाषांचाही स्वतंत्र ‘इंडो-आर्यन’ नावाचा परिवार मानला गेला. हे नाव देताना त्यात ‘आर्यन’ शब्द का वापरला गेला, याचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्याची तसदी गेल्या दोन शतकांत आजवर कुणीच घेतलेली नाही. कारण उघड आहे. तसेच ‘द्राविडी’ भाषांचाही स्वतंत्र परिवार कल्पून त्याला फक्त या ‘इंडो-आर्यन’ किंवा ‘इंडो-इराणी’ परिवारापासूनच नव्हे, तर संपूर्ण ‘इंडो-युरोपीय’ परिवारापासून वेगळे ठेवण्याची पुरेशी काळजी या अभ्यासकांनी घेतली. याचेही कारण उघड आहे.


तर वाचकहो, अशा पद्धतीने विल्यम जोन्सने केलेल्या संशोधनाच्या आधारे जगभरातल्या भाषांचे गट बनविताना, सगळ्या गटांना त्यांच्याशी संबंधित भौगोलिक नावे देण्यात आली. पण, फक्त एका गटाला मात्र भौगोलिक नाव न देता त्यात ‘आर्यन’ शब्दाची पेरणी करण्यात आली. हे कारस्थान नाही, तर काय आहे? भौगोलिकदृष्ट्या आशियाशी जोडून असलेल्या आणि द्विपकल्प म्हणून एक असलेल्या भारतात फक्त दाक्षिणात्य भाषांचाच तेवढा वेगळा परिवार मानून तो पूर्ण युरेशियापासून बाजूला काढणे, यात आपल्याला फुटीरतेची बीजे दिसत नाहीत का? एका काल्पनिक भाषेला जन्म द्यायचा, तिची काल्पनिक मायभूमी ठरवायची, ती भाषा बोलणारे काल्पनिक लोकही मानायचे. पण, त्यांची इराणमार्गे भारतात स्थलांतरे मात्र खरी मानायची - यात कसले आलेय शहाणपण? या काल्पनिक मनोर्‍यातल्या एकेका मजल्याची सफर आपण आगामी लेखांत करूया.
(क्रमश:)




- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ‘भारतविद्या’ अथवा ‘प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121