आत्मघाताकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |


agralekh_1  H x


विवेकाचा त्याग करुन चीनच्या हातची कठपुतळी झालेल्या के. पी. शर्मा ओली यांचा भारतविरोध व चीनच्या नादी लागण्याचा प्रकार नेपाळला आत्मघाताकडेच नेणारा ठरेल. कारण असंगाशी संग केला की, पतन अटळ असते.

वर्तमानकाळातील घटनांची बीजे भूतकाळात दडलेली असतात आणि त्याचीच किंमत सध्या भारताला चुकवावी लागत असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून लडाख सीमेवर चीनबरोबर सुरु असलेला भारताचा संघर्ष ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या ‘नो मॅन्स लॅण्ड’मधील माघारीतून संपला. मात्र, दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती असतानाच नेपाळ या आपल्या पारंपरिक सोबत्याने ‘लाल’ रंग दाखवायला सुरुवात केली. चीनच्या मांडीवर जाऊन बसण्यासाठी आतुरलेल्या नेपाळने प्रारंभी भारताने मानससरोवर यात्रेसाठी नव्याने बांधलेल्या रस्त्याला आक्षेप घेतला. नंतर लिपुलेख, लिम्पियाधुरा व कालापानी ही ठिकाणे नेपाळच्या नकाशात दाखवणारे विधेयक आपल्या संसदेत मंजूर करवून घेतले. दरम्यानच्या काळात रेडिओ व एफएम केंद्रांवरुन भारतविरोधी गाणी वाजवणे, समाजमाध्यमांवर भारतविरोधी लिखाण करणे, ही कामेही नेपाळमधून झाली. पुढे बिहारमधील एका धरणाच्या दुरुस्तीला जाणार्‍या अभियंत्यांना नेपाळने रोखले आणि सीतामढी जिल्ह्यात भारतीय हद्दीत बांधल्या जाणार्‍या रस्त्यालाही नेपाळी पोलिसांनी विरोध केला व निर्माण कार्य थांबवले. नुकतेच नेपाळमध्ये ‘डीडी न्यूज’ वगळता सर्वच भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्रसारणही रोखण्यात आले. कोणत्याही आदेशाविना नेपाळ सरकारच्या बाजूने केबल टीव्ही प्रोव्हायडर्सने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. मात्र, नेपाळमध्ये ज्या काही भारतविरोधी कारवाया सुरु आहेत, त्याच्यामागे चीनच असल्याचे कोणीही सांगू शकेल. छोट्या देशांना अमाप अर्थशक्तीच्या साहाय्याने आपल्या अंकित करायचे आणि नंतर हवे तसे नाचवायचे, ही चीनची नीती आहे. चीनने असे प्रकार इतरही देशात करुन पाहिले, जसे की, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान आणि आता नेपाळ. मात्र, नेपाळ चीनच्या इतका कह्यात कसा गेला, नेपाळने भारताचा दुस्स्वास करावा असे नेमके काय घडले? तर त्याची पाळेमुळे राजीव गांधींच्या पंतप्रधानपदापर्यंत जातात.


 
राजीव गांधी यांनी सत्तेत येताच हिंदूराष्ट्र असलेल्या नेपाळविषयक भारताचे पारंपरिक धोरण बदलत राजपरिवाराऐवजी मृतप्राय झालेल्या डाव्या संघटनांना समर्थन व प्रशिक्षण दिले. असे केल्याने नेपाळमधील राजेशाही संपून तिथे लोकशाहीची स्थापना होईल, असे राजीव गांधी यांचे मत होते. मात्र, राजीव गांधी यांना हा सल्ला नेमका दिला कोणी, हे कोडेच असून तसा सल्ला जर एखाद्या अधिकार्‍याने वा परराष्ट्र धोरणाशी निगडित संस्थेने दिला असता, तर त्याची नोंद सरकारी दस्तावेजात राहिली असती. इकडे राजीव गांधींच्या निर्णयाने नेपाळचे राजे वीर वीरेंद्र विक्रम शाह नाराज होते. दरम्यान, राजीव गांधी यांनी पत्नी सोनिया गांधींसह नेपाळचा दौरा केला आणि इथेच पशुपतीनाथ मंदिरप्रवेशाचा प्रसंग घडला. ख्रिश्चन असल्याच्या कारणावरुन सोनिया गांधी यांना पशुपतीनाथ मंदिरात प्रवेश देता येणार नाही, असे तिथल्या व्यवस्थापनाने सांगितले आणि त्यांनी राजे वीर वीरेंद्र विक्रम शाह यांची विनंतीदेखील धुडकावली. मात्र, राजीव गांधी यांना हा स्वतःचा वैयक्तिक अपमान वाटला आणि दिल्लीला परतल्यावर त्यांनी ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेला नेपाळमधून राजेशाहीच्या खात्म्यासाठी काम करण्यास सांगितले. नेपाळमधील या गुप्त अभियानाची जबाबदारी ‘रॉ’चे तत्कालीन चीफ ऑफ ईस्टर्न ब्युरो अमर भूषण यांच्याकडे सोपवण्यात आली. काम पूर्ण करण्यासाठी अमर भूषण नेपाळमध्ये ‘जीवनाथन’ या टोपण नावाने राहू लागले व पुढे एक एक घडामोडी होत गेल्या. नेपाळमध्ये माओवादी-मार्क्सवादी-कम्युनिस्टांचे गट सक्रिय झाले व त्यांच्याच एका म्होरक्याचे नाव पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ हे होते.


 
दरम्यान, राजीव गांधींनी तिन्ही बाजुंनी भारतीय भूमीने घेरलेल्या नेपाळची अन्न व आर्थिक आघाडीवर नाकेबंदी केली आणि त्रासलेल्या नेपाळच्या राजांनी चीनकडे मदतीची मागणी केली व चीननेही ती मदत केली. राजीव गांधी पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतरही ‘रॉ’चे हे काम सुरुच होते आणि ते पी. व्ही. नरसिंह राव सत्तेवर आल्यानंतर थांबले. मात्र, या काळात चीनला नेपाळमध्ये हातपाय पसरण्यास मदत मिळाली व त्यातून माओवादी डाव्या संघटना तिथे उभ्या राहिल्या. १९९६ साली त्यांनी नेपाळमध्ये छुपे युद्ध सुरु केले व त्याचे पर्यावसान १ जून, २००१ रोजी नेपाळी राजपरिवाराच्या हत्याकांडात झाले. वरवर पाहता, कौटुंबिक संघर्षातून या हत्या झाल्याचे सांगितले गेले, पण त्यामागचे सत्य कोणालाही माहिती नाही. नेपाळचे राजे भारताचे समर्थक मानले जात होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर हिंदूराष्ट्र असलेला नेपाळ राजकीयदृष्ट्या अस्थिर झाला. पुढे वाजपेयी सरकार गेल्यानंतर मनमोहन सिंग यांच्या काळात ‘रॉ’ला आपले काम पुन्हा सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आणि संपुआ सरकारच्या दोन वर्षांतच नेपाळमध्ये सशस्त्र क्रांती झाली व नेपाळला ‘सेक्युलर देश’ म्हणून घोषित केले गेले. दरम्यान, या सर्वच घडामोडी अमर भूषण यांनी ‘इनसाईड नेपाळ/द वॉक इन’ या आपल्या पुस्तकात तपशीलवार दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात आपल्याला नेमून दिलेल्या कारवाया, आलेले अनुभव, नेपाळचे भारतापासून दुरावणे व चीनच्या आहारी जाणे, याचे विवेचनही या पुस्तकात विस्ताराने केलेले आहे.


 
सुरुवातीला राजेशाहीची हिंदूराष्ट्र नेपाळवरील पकड ढिली पडली आणि तिथे नंतर डाव्यांनी पकड बसवली. भारतातील वेळोवेळच्या काँग्रेस सरकारने डाव्यांना पाठिंबा दिल्याने आणि राजेशाहीकडे दुर्लक्ष केल्याने किंवा अमर भूषण यांच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे राजेशाही संपवल्याने चीनच्या आशीर्वादाने कम्युनिस्टांचा पक्ष नेपाळमध्ये सत्तेवर आला. कम्युनिस्ट असल्याने त्याची चीनशी जवळीकही साहजिकच म्हटली पाहिजे. पण, डाव्यांना प्रस्थापितांविरोधात फक्त क्रांती करता येते आणि क्रांतीनंतर काय, हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहतो. तीच गत नेपाळी डाव्यांचीही झाली आणि इथेही त्यांना धड सरकार चालवता आले नाही. आता तर इथल्या कम्युनिस्ट पक्षातच वेगवेगळे गट-तट पडले असून सत्तेसाठी सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे दिसते. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ हे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याकडे राजीनाम्याचा हट्ट धरुन बसलेत, तर ओली चीनच्या इशार्‍यावर भारताशी वैर पत्करुन, राष्ट्रवादाची फोडणी देऊन खुर्ची वाचवण्याची धडपड करत आहेत. मात्र, विवेकाचा त्याग करुन चीनच्या हातची कठपुतळी झालेल्या के. पी. शर्मा ओली यांचा भारतविरोध व चीनच्या नादी लागण्याचा प्रकार नेपाळला आत्मघाताकडेच नेणारा ठरेल. कारण असंगाशी संग केला की, पतन अटळ असते!

 
@@AUTHORINFO_V1@@