बेडच्या उपलब्धतेबाबतही माहिती मिळणार
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने १२८ रुग्णालयांची माहिती ऑनलाईन केली असून, त्याबाबतची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. उपलब्ध बेडची माहिती ऑनलाईन मिळणार आहेच शिवाय १९१६ या सेवेअंतर्गत बेड मिळवण्याचा सोपा मार्गही उपलब्ध आहे.
मुंबईतील खासगी किंवा सरकारी रुग्णालयात बेडची उपलब्धतेबाबत माहिती नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाना अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता ही अडचण दूर होणार आहे. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालये भरुन गेली आहेत. रुग्णांच्या तुलनेत बेड कमी पडत असल्याने सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत होते. प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार बेडची संख्या वाढवली जात असली तरी कोणत्या रुग्णालयात पुरेसा बेड उपलब्ध आहेत, किंवा नाही अशी माहिती नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना रुग्णालयाच्या शोधात भटकावे लागे. अनेकवेळा बेड उपलब्धतेबाबत चुकीचीही माहिती मिळत असल्याने रुग्णांचे हाल होत होते.
आता रुग्णालयातील बेडच्या उपलब्धतेबाबत एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोणालाही चुकीची माहिती दिली जाऊ शकणार नाही. मुंबईकरांना सध्या https://mumgis.mcgm.gov.in/MedicalFacility.html या लिंकवर १२८ रुग्णालयांची माहिती मिळू शकेल. कोविड व नॉन कोविड सुविधा असलेल्या १२८ रुग्णालयांची क्षमता रिकाम्या बेडसह ऑनलाईन करण्यात आली आहे. या दुव्यावर संशयित, पॉझिटिव्ह, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, डायलिसिस, नॉन-कोविड अशा बेडची जागा आणि रिक्त जागा अपलोड करण्यात आल्या आहेत. तसेच १९१६ च्या ही सेवाही २४ तास देण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटी पद्धतीने लोकांची नेमणूक केली आहे.