वॉयलंस पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे कारण देत हटवले भारतीय अॅप!
मुंबई : चीनी ‘टिकटॉक’ला टक्कर देणारे, गेल्या महिन्यात लाँच केले गेलेले भारतीय 'मित्रों' अॅप गुगल प्लेस्टोरने हटवले आहे. 'मित्रों’ बरोबरच प्ले स्टोरने ‘रिमुव्ह चायना अॅप’ हा अॅपदेखील हटवला आहे. गूगलच्या मते, या अॅपने प्ले स्टोअर ‘भ्रामक वर्तन धोरणा’चे (वॉयलंस पॉलिसी) उल्लंघन केले आहे. या धोरणा अंतर्गत कोणताही अॅप वापरकर्त्याच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये किंवा अॅपच्या बाहेरील वैशिष्ट्यात कोणताही बदल करू शकत नाही, तसेच कोणत्याही तृतीय पक्षाच्या अॅपला हटविण्यास उद्युक्त करू शकत नाही. लडाख सीमेवर भारत-चिनी सैन्यामध्ये तणाव वाढवल्यानंतर भारतात चीनी गोष्टींवर बंदी घालण्यासाठी एका मोहीम राबवण्यात आली. यावेळी ‘रिमुव्ह चायना अॅप’ हे अॅप चर्चेत आले होते. फोनमधून चीनने तयार केलेले अॅप्स काढून टाकण्यासाठी हे खास अॅप बनवले गेले होते. पाच दशलक्षाहूनही जास्त लोकांनी डाउनलोड केले होते.
तर, ‘टिकटॉक’ला टक्कर देणाऱ्या भारतीय 'मित्रों' अॅप देखील हेच कारण देऊन हटवण्यात आले. यावर स्पष्टीकरण देण्यास अथवा नेमेके कारण सांगण्यास गुगलने नकार दिला. दोन्ही अॅप जवळ जवळ ५ दशलक्षाहूनही अधिक लोकांनी डाऊनलोड केले होते.