डोंबिवली : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत चालला आहे. मात्र असे असतानाही काही दिलासादायक बातम्या समोर येताना दिसतात. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर एका ९२वर्षीय आज्जीनी कोरोनावर मात केली आहे. आजच या आज्जीना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कल्याणच्या निऑन हॉस्पिटलमधून ९२वर्ष वयाच्या सुमती नार्वेकर या आज्जीनी कोरोनावर यशवीरित्या मात केली आहे. कोरोनावर उपचारा दरम्यान योग्य काळजी घेत डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले. वय काहीही असो इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोरोनावर पण मात करता येऊ शकते हे या आजींनी दाखवून दिले आहे. डोंबिवली पूर्वेच्या संत नामदेव पथ परिसरात राहणाऱ्याया या आजीबाईंना ८ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर डोंबिवलीजवळच्या निऑन हॉस्पिटलमध्ये ९ दिवस उपचार करण्यात आल्यानंतर १७ जून रोजी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटलचे मुख्य डॉ. मिलिंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजीबाईंचा विशेष सत्कार करत त्यांना निरोप दिला.
कल्याण डोंबिविलीमधील कोरोना रुग्णसंख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे. तर त्यातील ११७६ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्जे देण्यात आला आहे . तर १३२८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ६६जणांचा आतापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.