‘कोरोना’नंतरची शहरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2020   
Total Views |

after lockdown_1 &nb
आगामी काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या मानकांना प्राधान्य देत शहरांची रचना करणे आवश्यक असणार आहे. तसेच रिम कूलाहास यांनी कार्यालयांची रचना कशी असावी, याबाबत बोलताना सांगितले की, भविष्यात अ‍ॅमेझॉन, गूगल, अ‍ॅपलसारख्या खुल्या व मोठ्या कार्यालयांचे महत्त्व हे नक्कीच वाढणार आहे.


मानवी जीवनात जीवनमान व्यतीत करणेकामी शहरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक जीवनशैलीत व्यक्ती आपले कुटुंब शहरी परिवेशात स्थिर करण्यास प्राधान्य देत असतो. त्यामुळे शहरांवर येणारा ताण हा कायमच चर्चेचा मुद्दा असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा या विषाणूचा पहिला हल्ला हा शहरांवर झाल्याचे दिसून आले. दाट लोकवस्ती, कमी जागेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अनेकविध सुविधा, या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी होणारी गर्दी, त्यामुळे सुरक्षेचा ऐरणीवर येणारा प्रश्न, असे अनेक मुद्दे कोरोनामुळे पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाले. त्यामुळे आता येणार्‍या नव्या कालावधीत शहरांची रचना करताना कोरोनासारख्या स्थितीचा विचार हा वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिक यांना करणे आवश्यक ठरणार आहे. पुन्हा भविष्यात कोरोनासारखी स्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठीची आवश्यक ती उपाययोजना आधीच करण्यात आलेली असावी, असा विचार आता करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे कोरोनानंतरची शहरे कसे असतील याबाबत नुकतेच नेदरलँडचे प्रख्यात वास्तुविशारद रिम कूलाहास यांनी आपले विचार प्रकट केले. त्यांचे विचार हे जगभरातील वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिक यांना आगामी काळात दखल घेण्यास नक्कीच उपयुक्त ठरणारे आहेत. त्यांच्या मते आगामी काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या मानकांना प्राधान्य देत शहरांची रचना करणे आवश्यक असणार आहे. तसेच रिम कूलाहास यांनी कार्यालयांची रचना कशी असावी, याबाबत बोलताना सांगितले की, भविष्यात अ‍ॅमेझॉन, गूगल, अ‍ॅपलसारख्या खुल्या व मोठ्या कार्यालयांचे महत्त्व हे नक्कीच वाढणार आहे.


कोरोना महामारीशी मुकाबला करताना सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचे नवे नियम रूढ होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात सार्वजनिक जागांचे आकार बदलणे आवश्यक असल्याचे कूलाहास यांचे म्हणणे आहे. तसे पाहता हे आधुनिक समाजजीवनात यापूर्वीच होणे आवश्यक होते. आगामी काळात पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे याबाबतही उपाययोजना करताना कोरोनास्थितीच्या काळातील उपाययोजना विचारात घेणे आवश्यक असणार आहे. तसेच, विमानतळेदेखील आगामी काळात वास्तुरचना आणि तेथील गर्दीचे नियोजन यासाठी केंद्रस्थानी असणार आहेत. विमानांना फक्त एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठीची जागा असणे आवश्यक असताना सध्याच्या घडीला विमानतळेहीआता जंक स्पेस बनली आहेत. त्याचबरोबर मॉलमधील अंतर्गत रचना, सर्पाकार जिने याबाबतदेखील आगामी काळात वास्तुविशारदांना विचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. महामारीच्या काळात विमानतळांसह इतर सार्वजनिक ठिकाणांना नव्याने डिझाइन करण्याचे आव्हान या निमित्ताने आता वास्तुविशारद यांच्यापुढे नक्कीच उभे ठाकले आहे. कूलाहास यांच्या विधानाला किंवा विचारांना महत्त्व यासाठी प्राप्त होते कारण त्यांनी आजवर स्थापत्य सौंदर्याने बरीच शहरे निर्मान केली आहेत. त्यांनी मॉस्को, मिलान, बीजिंग, सिएटल आणि सोल अशा बर्‍याच शहरांमध्ये इमारती डिझाइन केल्या आहेत. त्यांनी दहा पुस्तके लिहिली असून ‘डेलीरियस न्यूयॉर्क’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले आहे. त्यांनी रॉटरडॅम या मूळ गावी एक प्रकल्प डिझाइन केला आहे. जेणेकरून तेथून जाणार्‍या मोटारी चांगल्या प्रकारे दिसतील. त्यांनी केलेल्या विशेष डिझाइन्समध्ये मॉस्कोच्या गॉर्की पार्कमधील संग्रहालय आणि बीजिंगमधील सरकारी टेलिव्हिजन नेटवर्क-सीसीटीव्हीच्या इमारती यांचा समावेश होतो. संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव आगामी काळात रोखणेकामी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’शिवाय पर्याय नाही.
स्वयंचलित कारखाने, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल आणि गूगलसारख्या कंपन्यांसाठी डेटा ऑपरेशन आणि अन्य कामांसाठी खुल्या जागांना प्राधान्य देण्यात आले तेव्हा जगाने याबाबत नाके मुरडली. मात्र, आजमितीस त्याचे महत्त्व जाणवत आहे. मात्र, असे असले तरी, कूलाहास यांचे म्हणणे हे विकसित किंवा कमी लोकसंख्या असणार्‍या देशांसाठी लागू होते. मात्र, दाट लोकवस्तीचे देश जसे, भारत, बांगलादेश, चीन, श्रीलंका, पाकिस्तान अशा आशिया खंडातील दाट लोकसंख्या असणार्‍या देशांसाठी खूप मोठी मोकळी जागा सोडून बांधकाम रचना करणे हे महाकठीण कार्य आहे. त्यामुळे कोरोनानंतरच्या जगात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य याबरोबरच वास्तुरचना याबाबतदेखील मंथन होणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात या आव्हानावर तोडगा कसा निघतो हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणारे आहे.
@@AUTHORINFO_V1@@