सावरकरांचा मानवतावाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2020
Total Views |


savarkar_1  H x

हिंदूंना झुकते माप देणारा दृष्टिकोन सावरकरांचा नव्हता आणि त्यामुळे पक्षपाती मानवतावादाचा आरोप उद्भवूच शकत नाही. त्या आरोपातला समजून घेण्याचा उरलेला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावरकरांचा मानवतावाद. त्यांच्या मानवतावादाला जातीची, धर्माची, राजकीय मतांची बंधने किंवा कुंपणे नव्हती.


तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवतावाद यावर अनेकजणांनी, अनेक ठिकाणी विविध काळात चर्चा केल्या आहेत. ‘कन्फ्युशियस’च्या संकल्पनेनुसार मानवता म्हणजे मानवजातीतील परस्परप्रेम किंवा सौहार्द. अ‍ॅरिस्टॉटल आणि प्लेटो या दोन्ही ग्रीक तत्त्वज्ञांनी थेट मानवतेचा उल्लेख केलेला नाही. मात्र, मानवतेचे स्तंभ मानले जाणार्‍या प्रेम आणि दया यावर नक्कीच भर दिलेला आहे. थॉमस अ‍ॅक्विनासने ‘सात स्वर्गीय सद्गुण’ (Seven heavenly virtues) मध्ये मानवतेला मुख्य स्थान दिलेलं आहे. एका आदर्शवादी पातळीवर बोलत असलेल्या मानवतेच्या संकल्पनेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी वास्तववादी कक्षेत आणले. भारतातील तत्कालीन स्थितीला अनुसरून मानवतावाद मांडण्यावर त्यांचा भर होता. स्वप्नातील मानवता सहजसाध्य नाही, हे जाणून असल्याने सावरकरांनी तशी स्वप्ने इतरांनाही कधी दाखवली नाहीत.
 

सावरकरांचा मानवतावाद हा केवळ हिंदूराष्ट्रासाठीचा किंवा केवळ हिंदू धर्मासाठीचा मानवतावाद होता, असा आरोप अनेकदा होत असतो. सर्वांचा धर्म मानवधर्म, जात मानवता आणि श्रद्धाही मानवाच्या ठायी असे आदर्शवादी ध्येय सावरकरांनीही मांडले आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच वास्तविकतेतल्या मानवतेत बदल आणि सुधारणा करता येतील, हेही त्यांना ज्ञात होते. ‘हा सर्व हिंदुस्थान धार्मिक, वांशिक नि सांस्कृतिक भिन्नभावाचा विचार न करता त्या सर्वांना एकात्मगटात बुडवून एक झाला तर ते सर्व मानवी राजकीय ध्येय प्रत्यक्ष गाठायच्या दिशेने मानवजातीने एक मोठेच पाऊल टाकले असे होईल,’ असे विचार सावरकरांनीही मांडले आहेत. (समग्र सावरकर वाड्.मय - खंड ५, पृष्ठ ५८) मात्र, आधीपासूनच समाजाचा सर्व डोलारा धर्म, जात आणि वर्णव्यवस्था यावरच उभा होता. त्यामुळे धर्माधिष्ठित व्यवस्थेत जर मानवतावादाचा प्रचार करायचा असेल, तर त्यालाही धर्माच्या आधारावरच उभे करावे लागेल, ही तात्कालिक गरज सावरकरांनी ओळखली होती. सद्यकाळातील मानवतावादी विचारवंत जसे दहशतवाद्यांना आणि अत्याचार्‍यांनाही मानवतेचे हक्क प्रदान करतात, तसे सावरकरांनी नक्कीच केले नाहीत. मात्र, त्यांचा मानवतावाद सर्वसमावेशक होता यात यत्किंचितही शंका नाही. या आक्षेपांना आणि आरोपांना खोडून काढताना प्रथम त्यातील समज व गैरसमजांचे आकलन होणे आवश्यक आहे.
 
सिंधुसागरापासून सिंधुनदीपर्यंत ही भारतभूमी ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो ‘हिंदू’ अशी कल्पना सावरकरांनी ठिकठिकाणी मांडली आहे. ‘हिंदू’ या शब्दाचे अनेक अर्थ व उगमस्थान सावरकरांनी ‘हिंदुत्व’ या ग्रंथात मांडले आहे. त्यामुळे सावरकरांच्याच व्याख्येनुसार ‘हिंदू’ हे धर्माचे नसून राष्ट्रीयत्वाचे प्रमाण आहे. अर्थातच, हिंदूराष्ट्र ही संकल्पना केवळ हिंदू या धर्मापुरती मर्यादित नसल्यामुळे मानवतावाद सीमित असण्याचे काही प्रयोजनच नाही. धर्माच्या बाबतीतला हिंदुत्ववाद हा केवळ मानवतावादाचा एक टप्पा होता. “जर मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी ‘त्वे’ इतर सोडीत असतील, तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल. जसे माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल की जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन मनुष्यपणा तेवढा जगात नांदू लागेल.” (समग्र सावरकर वाड्.मय- खंड ३, पृष्ठ ६४४) हे सावरकरांचे म्हणणे तर्कशास्त्ररित्या अत्यंत सुसंगत आहे. यावरून हेच सिद्ध होते की, हिंदुत्व हे केवळ प्रतिसादात्मक भावातून अंगिकारलेले तत्त्व होते. केवळ हिंदूंना मानवतेचा अधिकार आहे, असे कोणतेही प्रतिपादन सावरकरांनी केलेले नाही. ‘हिंदू’ आणि ‘अहिंदू’ हा धर्माधिष्ठित भेद बाजूला ठेवून सर्वांना समान हक्क प्राप्त करून देण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. जे अधिकार हिंदूंना आहेत, तेच अहिंदूंनाही असले पाहिजेत, मिळाले पाहिजेत असा सावरकरांचा आग्रह होता.
 
हिंदूंना झुकते माप देणारा दृष्टिकोन सावरकरांचा नव्हता आणि त्यामुळे पक्षपाती मानवतावादाचा आरोप उद्भवूच शकत नाही. त्या आरोपातला समजून घेण्याचा उरलेला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सावरकरांचा मानवतावाद. त्यांच्या मानवतावादाला जातीची, धर्माची, राजकीय मतांची बंधने किंवा कुंपणे नव्हती. समाज म्हणून एकत्र राहताना सहजीवन सुरळीत आणि सुसह्य असावे, यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांच्या ‘संगीत उःशाप’ या नाटकातून दिसते. भेदाभेद आणि अस्पृश्यता पाळणारा समाज हा संघटन होण्याच्या आणि राष्ट्रीयीकरणाच्या दृष्टीने अहितकारक आहे हे त्यांनी जाणले होते. समाजसुधारणेचे त्यांचे प्रयत्न हे सर्व बाजूंनी होते. स्पृश्य-अस्पृश्यांचे मेळावे, एकत्रित भजन-कीर्तन, हळदीकुंकू समारंभ अशा एक ना अनेक मार्गांनी ते स्वतः सक्रिय होते, व्याख्यानांतून ठिकठिकाणी जनजागृती करत होते. मात्र, केवळ सरधोपट मार्गांनी प्रयत्न करून ते थांबले नाहीत, तर त्यांच्या लेखनातूनही त्यांचे विचार त्यांनी परखडपणे मांडले. ‘संगीत उःशाप’ ही नाट्यकृती या लेखनाचे उत्तम आणि ज्वलंत उदाहरण! मानवतेला अनुसरून आचरण न करणार्‍या प्रत्येकावरच सावरकरांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. छळ करणार्‍या ब्राह्मण, क्षत्रिय आणि धर्मांतरित मुस्लिमांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले नाही आणि त्याचवेळी तो छळ सहन करून स्वतःला आणखी पतित करून घेणार्‍या अस्पृश्य समाजालाही सक्षमतेचे धडे दिले आहेत. “दुसर्‍याच्या हिणवण्याने स्वतःच्या कर्तव्याला गदळे समजून जर कोणी महार स्वतःसच हीन मानू लागला आणि असंतुष्ट होऊन रागावू लागला, तर दुसर्‍याचे हिणवणेही ठीकच होते, असे नाही का सिद्ध होणार? दुसरा हिणवतो म्हणून जो स्वकर्तव्य आणि लोकसेवा सोडतो, तो खराच पतित होतो,” असे उद्गार संत चोखामेळा यांच्या तोंडी ‘संगीत उःशाप’ या नाटकात सावरकरांनी लिहिले आहेत. (संगीत उःशाप - पृष्ठ १८) अत्याचार करणारा जसा गुन्हेगार, तसाच अत्याचार सहन करून लाचारी पत्करणारा मनुष्यही तितकाच गुन्हेगार, हे तत्त्व सावरकरांनी यात अधोरेखित केले आहे. मानवतेने वागणारे लोक प्रत्येक धर्मात असतात, हेही त्यांनी या नाटकातील मौलवीच्या पात्राद्वारे दाखविले आहे. या सर्वांतून अंतिमतः हेच सिद्ध होते की, सावरकरांनी कोणत्याही एका विशिष्ट धर्मासाठी मानवतावादाचे प्रतिपादन केलेले नाही.
 
‘जात्युच्छेदक निबंध’ यातील लेखमालेच्या तिसर्‍या लेखांकात सावरकरांनी त्या काळात अस्तित्वात असलेला भीषण भेदाभेद स्पष्ट केला आहे. वेगवेगळ्या आधारावर उभे असलेले भेद हे वर्णविशिष्ट, प्रांतविशिष्ट, पंथविशिष्ट, व्यवसायविशिष्ट, आहारविशिष्ट आणि संकरविशिष्ट अशा प्रकारांत सावरकरांनी विशद केले आहेत. इतक्या भेदांमध्ये रोटीबंदी, बेटीबंदी असे अनेक प्रघात होते आणि अजूनही आहेत. मात्र, हे आचार म्हणजे सनातन धर्म नव्हे, हेदेखील सावरकरांनी स्पष्ट केले आहे. याच निबंधांतील दुसर्‍या लेखांकात सावरकरांनी ‘सनातन धर्मा’ची व्याख्या विस्ताराने मांडली आहे. “धर्म या शब्दाच्या भिन्न भिन्न अर्थांतील फरक ध्यानात न धरल्याने ‘सनातन धर्म’ म्हणजेच जातीधर्म आणि जातीधर्म म्हणजेच सनातन धर्म असा समजुतीचा घोटाळा उत्पन्न होतो,” असे सावरकरांनी म्हटले आहे. (समग्र सावरकर वाड्.मय- खंड ६, पृष्ठ १८-१९) “सनातन धर्माच्या अर्थाचा विपर्यास करून जातिभेद आणि वर्णभेद हे आचार प्रचलित झाले. अशा सनातन धर्माच्या रक्षणाचा मक्ता घेतलेले सर्व धर्मरक्षकच या विपर्यासाला जबाबदार आहेत. हा मुळातच सनातन धर्म नसल्याने हा भेद मोडून पडल्यास धर्म बुडणार नाही,” असेही सावरकरांनी त्याच लेखांकात मांडले आहे. सावरकरांच्या मानवतेविषयी किंतु मनात असलेल्या सर्वांसाठी सावरकरांचे ‘जन्मजात जातिभेद हा मुळी जन्मजात नाहीच. तो एका भावनेचा, वेडगळपणाचा खेळ आहे’ हे स्पष्ट, तीव्र आणि प्रखर मत सर्व शंकांचे उत्तर ठरावे.
 

(समग्र सावरकर वाड्.मय- खंड ६, पृष्ठ २९)

 

- वेदवती चिपळूणकर

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@