मुंबईत नाल्यांवरील अतिक्रमणावर 'ड्रोन'वॉच

    24-May-2020
Total Views | 30

drone watch_1  



मुंबई
: लॉकडाऊनच्या काळात गर्दीवर वॉच ठेवणारा ड्रोन आता नाल्यांच्या काठावर होणाऱ्या बेकायदा बांधकामांवरही नजर ठेवून आहे. पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यास अडथळा ठरणारी ही बांधकामे लॉकडाऊन उठताच भुईसपाट करण्यात येणार आहेत. नाल्याशेजारील अनधिकृत बांधकामांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. नाल्याशेजारी होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन कॅमेराची नजर फिरत आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातर्फे प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग राबवला जात आहे.



मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये महापूर आला आणि मुंबईतील मिठी नदीसह लहान मोठ्या नाल्यांचे अस्तित्व समोर आले. २६ जुलैनंतर नाल्याशेजारील अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारण्यात येऊ लागला. मात्र कारवाई संपताच काही वेळात त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाल्याशेजारील अतिक्रमणावर आता ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच नाल्याशेजारी होणाऱ्या अतिक्रमणावर ड्रोन कॅमेराची नजर राहणार आहे.



मुंबईत जागा मिळेल तेथे अनधिकृत बांधकाम करण्याचा सपाटाच भूमाफियांनी लावला आहे. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याशेजारीही बांधकामे केली आहेत. नाल्याशेजारील अतिक्रमणावर कारवाई केल्यानंतर काही वेळात त्या ठिकाणी अतिक्रमण होते. अशी कामे आता जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. वस्तीत साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि नाल्याच्या तळापर्यंत व्यवस्थित पाहणी करून गाळ काढता यावा यासाठी ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पर्जन्य जलविभागाकडून सांगण्यात आले.


२८० नाल्यांवर ड्रोनचा वाॅच

महापालिका क्षेत्रातील सुमारे २६४ किलोमीटर लांबीच्या २८० मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाणार आहे. यामध्ये शहर भागातील सुमारे २२ किलोमीटर लांबीचे २७ मोठे नाले, पूर्व उपनगरातील १०२ किलोमीटर लांबीचे १११ मोठे नाले, तर पश्चिम उपनगरातील १४० किलोमीटर लांबीचे १४२ मोठे नाले यांचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121