अमेरिकेने WHOला निधी रोखण्याचा दिला इशारा!
अमेरिका : कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात जागतिक आरोग्य संघटना पक्षपातीपणे काम करीत असल्याचा गंभीर आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
चीनमधून ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग सुरु झाल्याने तिथून येणारी हवाई वाहतूक कमी करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला होता. परंतु ‘WHO’ ने त्याला विरोध दर्शवला होता. याच मुद्द्यावरुन ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला अशी चुकीची शिफारस का केली? असा सवालही विचारला. सुदैवाने चीनसाठी आमच्या सीमा खुल्या ठेवण्याचा त्यांचा सल्ला मी वेळीच नाकारला, असेही पुढे ते म्हणाले.
व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी पत्रकारांशी नैमित्तिक संवादावेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही जागतिक आरोग्य संघटनेला निधी देणार नाही. अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखला जाईल.
जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेकडून दिला जातो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने सर्वात आधी अमेरिकेचा विचार केलाच पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी अनेकवेळा म्हटले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचा नक्की किती निधी रोखणार याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सांगितले की, मी नुसता बोलत नाही. तर करून दाखवतो. लवकरच मी निधी रोखणार आहे.
जागतिक आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’ हा चीनबद्दल खूप पक्षपाती असल्याचे दिसते. हे बरोबर नाही. ‘WHO’ खूपच चीन केंद्रित आहे’, असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.