मात्र, भाविकांसाठी दर्शन बंदच!
उत्तराखंड : भगवान केदारनाथ धामचे द्वार आज खुले करण्यात आले. पुढच्या काही महिन्यांसाठी केदारनाथ धाम खुले राहणार आहे मात्र लॉकडाऊनच्या काळात भाविकांना केदारनाथच्या दर्शनाची अनुमती नाही. लॉकडाऊन सुरु असेपर्यंत येथे नियमावलींचे पालन करुन पूजाअर्चा होईल. बुधवारी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मंदिराची कवाडे उघडण्यात आली. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारास फुलमाळांची आरास करण्यात आली होती.
कोरोना विषाणूच्या संकटाने देशाला त्रस्त केले आहे. सध्या केवळ मंदिर समितीच्या १६ सदस्यांनाच पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंदिराची कवाडे खुली करण्यात आल्यानंतर अत्यंत साध्या पद्धतीने येथे पूजा- अर्चा करण्यात आली. दरवर्षी मंदिरांची कवाडे खुली होताना केदारनाथ धाम परिसरात भाविकांची मोठी गर्दी होते, बम-बम भोलेच्या जयघोषात हा सारा परिसर निनादून निघतो. मात्र कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच हा परिसर रिकामा पहायला मिळाला.
कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम चार धाम यात्रेवरही झाला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘११ वे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथ मंदिराची कवाडे उघडण्यात आली आहेत, तुमच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवोत तसेच भगवान केदारनाथ यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, अशी मी प्रार्थना करतो. बाबा सर्वांचे कोरोनाच्या संकटातून रक्षण करो’, असेही त्रिवेंद्र सिंह रावत यांनी लिहिले आहे.