मुंबई : उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरमध्ये मंगळवारी दोन साधूंची हत्या झाली. ही घटना अनूपशहर येथील पगोना या गावात घडली आहे. पालघर साधू हत्या प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा साधूंच्या हत्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करत घटनेबाबत चिंता व्यक्त केली.या दुख:द घटनेनंतर आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत याविषयी माहिती दिली.
ते म्हणतात, "मी आत्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत." तसेच ते पुढे म्हणतात,"ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असे आवाहन करतो." असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.