मुंबई : कोरोना रुग्णांची सध्या वाढत असलेली संख्या लक्षात घेता भाडेतत्वावरील रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेने कोणत्याही गोष्टीत कमतरता न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय, आया यांची कमतरता भरून काढण्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे विभागस्तरावर तत्काळ भरती करण्यात येत आहे. यानंतर आता कोरोनाबधित रुग्णांसाठी भाडेतत्त्वावर रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.
सद्यस्थितीत मुंबई महापालिकेकडे असलेल्या रुग्णवाहिका कमी पडत आहेत. त्यामुळे उपलब्ध रुग्णवाहिकांवर मोठा ताण पडत आहे. म्हणून चालक व सहाय्यकासह महापालिका भाडेतत्वावर रुग्णवाहिका घेणार आहे. कोरोना नियंत्रण केंद्रांपासून ते रुग्णालयांपर्यंत या रुग्णवाहिका सेवा देणार आहेत. तसेच मुंबई शहरात कोठेही कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला रुग्णालयांपर्यंत घेऊन जाण्यासाठी या रुग्णवाहिका उपलब्ध होतील. मुंबईतील सर्व पालिका प्रभागांमध्ये या रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत.