नवी दिल्ली : भारतात कोरोनाव्हायरसची पुष्टी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे की यावर्षी होणाऱ्या होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात ते सहभाग घेणार नाहीत. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्याबाबत तज्ञांच्या सल्ल्याचा विचार करून आपण यावेळी होळीच्या कोणत्याही बैठकीत सहभाग घेणार नसल्याचे पंतप्रधान मोदींनी बुधवारी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी होळीच्या बैठकीत भाग घेणार नाहीत
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले आहे कि कोरोनाव्हायरस कोविड -१९चा प्रसार रोखण्यासाठी सामूहिक कार्यक्रम कमी केले पाहिजेत. त्यामुळे यावर्षी मी कोणत्याही होळी मेळाव्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे."
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा होळी साजरे करणार नाहीत
भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, जग कोरोनाव्हायरसशी झगडत आहे. देश आणि डॉक्टर एकत्रितपणे त्याचा प्रसार थांबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लक्षात घेऊन यावर्षी मी ना होळी साजरा करणार नाही ना होळी मेळाव्याचे आयोजन करणार आहे. सुरक्षित रहा, निरोगी रहा.
अमित शाह यांचीही होळीच्या कार्यक्रमांकडे पाठ
अमित शहा म्हणाले की होळी हा आपल्यासाठी भारतीयांसाठी खूप महत्वाचा उत्सव आहे परंतु कोरोनाव्हायरसच्या दृष्टीने मी यंदा कोणत्याही होळी मेळाव्यात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वांना सार्वजनिक कार्यात सहभाग टाळण्याचे आणि स्वत: ची व कुटुंबाची चांगली काळजी घ्यावी असे आवाहन करतो.
मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी भारताचा कोरोनाव्हायरसशी सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान म्हणाले होते की कोविड -१९ कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. भारतात येणा-या लोकांची तपासणी, वैद्यकीय उपचार तातडीने पुरवण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी विविध मंत्रालये एकत्र काम करत आहेत आणि भारतीय नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
भारतात कोरोनाचे एकूण २८ रुग्ण
भारतात कोरोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. सध्या कोरोना व्हायरसंबंधी देशात काय स्थिती आहे यासंबंधी हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली. राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली तर तयारीच्या दृष्टीकोनातून रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन यांनी दिली.