देशभरात कोरोनाचे ३० रुग्ण झाले बरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2020
Total Views |
corona india_1  
 
 


नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या ४१५ झाली असून त्यापैकी ३० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनाची चाचणी करण्यासाठी १२ खासगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देशात टेस्टींग कीटदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे पत्रकारपरिषदेत सोमवारी देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, नागरी पुरवठा मंत्रालय, गृहमंत्रालय आणि आयसीएमआरतर्फे संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत देशातील कोरोना साथीच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.

 

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, देशात सध्या ४१५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ३० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, देशात आतापर्यंत सात मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, चंदीगढ, दिल्ली, गोवा, जम्मू – काश्मिर, नागालँड, राजस्थान, उत्तराखंड, प. बंगाल, राजस्थान, लडाख, झारखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार, त्रिपुरा, तेलंगाणा, छत्तीसगढ, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश असे एकुण १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेश पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहेत. देशाचे कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 

राज्यांना २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले असून केवळ कोरोनाबाधितांसाठी स्वतंत्र रुग्णालयांच्या सोयीविषयी कार्यवाही करण्यासस सांगण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे राज्यांना मदतीसाठी संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी यापूर्वीच पाठविण्यात आले आहेत, असेही अग्रवाल यांनी सांगितले. आयसीएमआरचे बलराम भार्गव म्हणाले की, देशातील १२ खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या १२ प्रयोगशाळांचे देशभरात १५००० कलेक्शन सेंटर्स आहेत. त्याचप्रमाणे टेस्टींग किट बनविण्यासाठी खासगी उत्पादकांना किट चाचणासाठी एफडीएच्या मान्यतेची आवश्यकता नाही, त्यासाठी आयसीएमआर किंवा पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीची मान्यतादेखील लागू असणार आहे.

 

सध्या दोन खासगी टेस्टिंग कीट उत्पादकांना फास्ट ट्रॅक परवानगी देण्यात आली असून त्यांनी किट्सचा पुरवठा सुरू केला आहे. देशात टेस्टिंग किट पुरेशा प्रमाणात असल्याचेही भार्गव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी क्वोराक्विन हे औषध घेण्यात यावे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, क्वोरोक्विन केवळ आरोग्य कर्मचारी आणि क्वारंटाईनमधील रूग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असल्याचे भार्गव यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरी पुरवठा मंत्रालयातील अधिकारी विनीत माथुर यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. जीवनावश्यक वस्तूंच्या होम डिलेव्हरीस प्राधान्य देण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. गृह मंत्रालयाच्या अधिकारी पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी गृहसचिवांची सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्यांविरोधात कारवाई कऱण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@