प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जाणारा महाराष्ट्रातील एकमेव लढवय्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Devendra Fadanvis _1 

राज्य चालविण्याची जबाबदारी असतानाही सत्ताधारी पक्षांतील अनेक नेते कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाच्या भीतीने घरात बसून राहिले. मात्र, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी प्रत्येक ‘हॉटस्पॉट’ला भेट देत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तो म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. आपल्या जीवाची पर्वा न करता जनसेवेसाठी आयुष्य वेचणारे फडणवीस यांच्या मदतकार्याचा आढावा घेणारा लेख...
 
 
 
नाव : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
 
राजकीय पक्ष : भाजप
 
पद : विधानसभेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री
 
 
 
 
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही तत्कालीन मित्रपक्षाने केलेल्या कपटामुळे विरोधी पक्षात बसण्याची वेळ भाजपवर ओढवली. मुख्यमंत्रिपद हातचे निसटल्यानंतरही खचून न जाता, मिळालेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडण्याचा दृढ निश्चय करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. शासनदरबारी अनेकदा फेर्‍या मारल्यानंतरही आपली प्रलंबित कामे मार्गी लागत नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय कार्यालयाबाहेरच अनेक जण गर्दी करायचे. शासनकर्त्यांकडे कामे मार्गी लागण्याची शाश्वती नाही.
 
 
 
मात्र, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मार्ग निघणारच, असा अनेकांचा विश्वास. सत्तेतील नेते कामे करणे तर सोडा, अनेक जणांकडे सर्वसामान्यांच्या भेटीसाठी वेळही उपलब्ध होत नसे. मात्र, अशा परिस्थितीतही नियोजित वेळेनुसार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे, आवश्यक ती कामे मार्गी लावणे, त्यासाठी शासकीय दरबाबारी पाठपुरावा करणे आदी सर्व जबाबदारी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस अचूकरीत्या पार पाडू लागले. सर्वसामान्य परिस्थिती असताना राज्याची अवस्था अशी भयाण झाली होती. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असे विचारण्याची वेळ पुन्हा एकदा आली असतानाच ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून की काय संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट कोसळले.
 
 
 
या कोरोना महामारीच्या संकटात सावधपणे उपाययोजना करणे खरे तर गरजेचे होते. मात्र, ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. राज्य सरकारच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे देशभरात सर्वाधिक गंभीर परिस्थिती मुंबई आणि महाराष्ट्रात निर्माण झाली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होणारी वाढ, शेकडोंच्या संख्येने होणारे मृत्यू आदींमुळे परिस्थिती आणखीच चिंताजनक झाली. रुग्णालयांतील अपुर्‍या आरोग्य सुविधा, डॉक्टर्स, औषधे, बेड्स, ऑक्सिजन आदींची कमतरता राज्यात हिरिरीने जाणवू लागली. कोरोना रुग्णांना रुग्णालयात आणण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न होणे, उपलब्ध झाल्यास रुग्णवाहिकांचे अवाजवी दर, ‘कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिकां’ची कमतरता, कोरोनापासून बचावासाठी अत्यावश्यक असणारे मॉस्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, ‘पीपीई’ किट्स, फेस शिल्ड मॉस्क आदींच्या गगनाला भिडणार्‍या किमती आदींमुळे प्रशासकीय सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 
 
 
कोरोना महामारीच्या संकटात राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे वेळीच ओळखत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संकटाशी दोन हात करण्यासाठी आम्ही सरकारसोबत असल्याचे जाहीर केले. राज्यात ‘टाळेबंदी’ची (‘लॉकडाऊन’) घोषणा करण्यात आल्यानंतर या संकटाशी लढण्यासाठी आम्ही सरकारला नक्कीच मदत करू, असे त्यांनी शासनकर्त्यांना आश्वस्त केले. विरोधी पक्षनेतेपदी असतानाही त्यांनी घेतलेल्या या निर्णयातूनच जनसेवेसाठी ते कितपत तत्पर असल्याची प्रचिती येते. कोरोना महामारीला रोखण्यासाठी मार्च महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’दरम्यान त्यांनी राज्यातील जनतेला घराबाहेर न पडता, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळण्याचे आवाहन केले.
 
 
 
 
 

Devendra Fadanvis _2  
 
 
"कोरोना महामारीच्या संकटात सर्वांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की, आपण लवकरच या महामारीच्या संकटातून मुक्त होऊ. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."
 
 
 
‘टाळेबंदी’च्या काळातही ते स्वस्थ बसले नाहीत. ‘व्हिडिओ कॉलिंग’च्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज आणि मातब्बरांशी संवाद साधत या क्षेत्राला कसे सावरता येईल, यासाठी चर्चा केली. क्रीडा, मनोरंजन, बँकिंग, शिक्षण, आरोग्य, हॉटेल-उपाहारगृहे, पर्यटन, पर्यावरण, नाभिक महामंडळ अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून या क्षेत्रावर विसंबून असणार्‍या नागरिकांना कशा प्रकारे मदत करता येईल, याचा त्यांनी आढावा घेतला. या क्षेत्रांतील कोट्यवधी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य शासन दोन्हीकडे सातत्याने पाठपुरावा केला. फडणवीस तासन्तास आपल्या कार्यालयात बसून ‘व्हर्च्युअल’ माध्यमातून अनेकांशी संवाद साधत.
 
 
 
याच माध्यमातून त्यांनी अनेकांच्या समस्या जाणून घेत राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांना जनसेवेसाठी कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले. गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्या भागात सरकारचे लोकप्रतिनिधी पोहोचत नाहीत, शासकीय मदत पोहोचत नाही, अशा दुर्गम भागांत जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. कोरोना या महामारीची खरी परिस्थिती सरकारपुढे सादर करण्यासाठी कोरोना महामारीच्या संकटातही त्यांनी राज्यभर दौरे केले. मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा प्रत्येक भागात त्यांनी स्वतः दौरा करत संपूर्ण राज्य पिंजून काढले.
 
 
 
रेड, ऑरेंज आणि ग्रीन या विभागांनुसार सुरुवातीला जिल्ह्यांचे कोरोना रुग्णसंख्येनुसार वर्गीकरण करण्यात आले होते. त्यानुसार फडणवीस यांनी राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मोर्चा उघडला. भाजपच्या विविध नेत्यांसोबत त्यांनी रेड आणि ऑरेंज विभागांमधील ‘कोविड सेंटर्स’, रुग्णालये, ‘क्वारंटाईन सेंटर’ आदींमध्ये जाऊन रुग्ण तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी अनेकांना त्यांनी आवश्यक वस्तूंचा पुरवठाही केला. आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, अपंग अशा सर्व घटकांतील नागरिकांची त्यांनी यावेळी स्वतः भेट घेत त्यांची विचारपूस करत सर्वांना आवश्यक ती मदत केली. सर्व जिल्ह्यांमधील दौरे केल्यानंतर यासंदर्भात एक विशेष अहवाल तयार करत राज्यातील गंभीर परिस्थितीबाबत त्यांनी राज्य सरकारला अवगत केले. केवळ या महामारीच्या परिस्थितीची माहितीच नाही, तर यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजनांची गरज आहे, यासंदर्भात सूचनाही केल्या. या अहवालासोबतच अनेक पत्रही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला पाठविली.
 
 
 
कोरोना महामारीच्या संकटादरम्यानच उद्भवलेल्या बेरोजगारीच्या, शेतीसंकटाच्या विविध प्रश्नांबाबतही त्यांनी विशेष कार्य केले. कोकणात ‘निसर्ग’ चक्रीवादळादरम्यान उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतही त्यांनी विशेष दौरे केले. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीदरम्यान मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणीही त्यांनी स्वतः जाऊन पाहणी दौरे केले. या दौर्‍यादरम्यान त्यांना अनेक भाजपच्या नेत्यांची, लोकप्रतिनिधींची आणि कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली. कोरोना महामारीच्या गंभीर संकटात प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करत असताना जनसेवेसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या या लढवय्या नेत्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम...! 



- रामचंद्र नाईक



@@AUTHORINFO_V1@@