रक्ताचा सडा शिंपणारे डावेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


डाव्यांनी आतापर्यंत जसे भिन्न विचाराला व तशा विचाराच्या माणसांना मारून टाकले, त्यांच्या रक्ताचा सडा शिंपला तेच काम जेएनयुतही करण्याचे नियोजन त्यांनी केले. विचारांचा विरोध विचारांनी न करण्याची डाव्यांची ही तशी वर्षानुवर्षांपासूनचीच परंपरा व रविवारचा विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला त्याचाच नमुना! परंतु, पायाखालची वाळू सरकलेल्या व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झालेल्या डाव्यांनी अशा हिंसाचारातून आपलेच थडगे बांधण्याचे काम केले आहे.


जगभरात कोट्यवधी लोकांचा जीव घेणाऱ्या डाव्या विचारांच्या गुंडांनी रविवारी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात धिंगाणा घातला. जेएनयुत वर्चस्व असेलल्या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्याच्या मडक्याला फडकी बांधून विद्यापीठ परिसर व वसतिगृहात धुडगूस घालत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना, अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच प्राध्यापक व सुरक्षारक्षकांनाही मारहाण केली. आपण ज्या विचारधारेचे पाईक आहोत, त्या कम्युनिझमने आतापर्यंत जे जे काळे कारनामे इतिहासात करून ठेवले, त्याला जागत हिंसाचारात आम्हीही काही कमी नाही, हे डाव्या विद्यार्थी संघटनांनी आताच्या रक्तपातातून दाखवून दिले. अर्थात विषारी बीजाची फळे विषारीच असणार आणि ते शिक्षणक्षेत्रासह सर्वत्र थैमान घालणारच. परंतु, यामुळे दिल्लीसारख्या महानगरात अतिशय कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाचे राजकारणातले खेळणे झाल्याचे दिसते, जे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य म्हणता येणार नाही. दरम्यान, आताच्या प्रकारात सर्वाधिक चर्चा झाली ती हल्लेखोर मुलीची. आपल्याकडे 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा,' अशी एक सकारात्मक उक्ती सांगितली जाते. तसे या लाठ्या-काठ्या घेऊन हाणामारी करणाऱ्या मुलीला पाहून 'पुत्री झाली ऐसी गुंडी, जिने दुष्कृत्यांसाठीच उचलली मुंडी,' असे पण नकारात्मक अर्थाने म्हणायला हरकत नसावी. दरम्यान, डाव्या विद्यार्थी संघटनांनी हे कृत्य आमच्या कार्यकर्त्यांनी केले नाही, असा कांगावा करत त्याचा आरोप अभाविपच्या माथी चिकटवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र, जसजशी नवनवीन माहिती उजेडात येऊ लागली, तसतशी ही कामगिरी डाव्यांचीच यावर विश्वास बसू लागला. कारण व्हॉट्सअ‍ॅप समूहातील संभाषणे, व्हायरल झालेल्या ध्वनिचित्रफिती, समाजमाध्यमांवरील पोस्ट्स यामधून बदकर्म करणारे डावेच, हे उघड झाले. तसेच ज्या मुलीचे छायाचित्र फिरवून, तिला अभाविपची कार्यकर्ती ठरवून व तिनेच हल्ला केल्याचे सांगून आरोपबाजी करण्यात आली, ती मुलगी डाव्या विद्यार्थी संघटनेचीच सदस्य असल्याची खात्रीही पटू लागली. तथापि, हे डाव्यांचे नेहमीचेच काम; करून सवरूनही आपण त्यापासून नामानिराळे असल्याचे दाखवायचे आणि अभाविप, भाजप वा हिंदुत्ववाद्यांविरोधात फुत्कार सोडायचे. पण जसजसे सत्य सर्वांसमोर येत जाते तसतसे डाव्यांच्या सोज्वळ चेहऱ्यामागे हैदोस घालणारे हिंस्त्र श्वापद असल्याचेच सिद्ध होते, जसे ते आताही झाले.

 

मात्र, रविवार सायंकाळचा हल्ला एकाएकी झालेला नाही, तर हा डाव्यांच्या नियोजनबद्धरित्या केल्या जाणाऱ्या कुकृत्यांच्या मालिकेतला केवळ एक भाग. कारण हाणामारी सुरू झाल्यानंतर काही वेळातच तेथे वृंदा करात, योगेंद्र यादव आणि अन्य पक्षांचे नेते दाखल झाले. त्याचप्रमाणे देशभरातही विविध ठिकाणी आंदोलने सुरु झाली. हे सर्व एकाएकी कसे घडू शकते? तसेच गेल्या २-३ महिन्यांपासून जेएनयुमध्ये शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून डाव्या विद्यार्थी संघटनांकडून जे राजकारण केले गेले, त्यावरूनही हे त्यांचेच षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते. शुल्कवाढीच्या मुद्द्यावरून डाव्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुरळीत चालू न देणे, प्राध्यापकांना वर्गात जाऊ न देणे, रुग्णवाहिकेचा मार्ग रोखून धरणे, पोलिसांपासून ओळख लपवण्यासाठी जुगाड करणे आणि विद्यार्थ्यांची सत्रांत परीक्षेसाठी नावनोंदणी होऊ न देणे, अशी कामे या काळात केली. परंतु, विद्यार्थ्यांनी डाव्यांच्या परीक्षेवरील बहिष्कार टाकण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षा देण्याचा पर्याय दिला, त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित डाव्यांच्या दहशतीस झुगारून दिले. तर आताचा जो प्रकार झाला, त्याची सुरुवात ३ जानेवारीपासूनच झाली होती. विद्यापीठाच्या आगामी शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेला १ जानेवारीपासून प्रारंभ झाला. परंतु, डाव्या विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आधी वसतीगृहाची शुल्कवाढ मागे घ्यावी व त्यानंतरच विद्यार्थ्यांनी पुढील सत्रासाठी नावनोंदणी करावी, असे होते. तसेच विद्यार्थ्यांनी नावनोंदणी न करता बहिष्काराच्या माध्यमातून प्रशासन व सरकारवर दबाव टाकावा, असाही त्यांचा हेतू होता तर अभाविप व अन्य ६० ते ७० टक्के विद्यार्थ्यांचे मत नावनोंदणी करण्याचे होते. परिणामी, विद्यापीठाने नावनोंदणीची प्रक्रिया सुरू केली, तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद देत त्यासाठी रांगा लावल्या. मात्र, विद्यार्थी आमचे ऐकत नाही, प्रशासन व सरकारविरोधात आवाज उठवत नाही, आंदोलने करत नाहीत, यावरून संतापलेल्या डाव्या विद्यार्थी संघटनांनी नावनोंदणी प्रक्रिया सुरळीत होऊ नये यासाठी पुढाकार घेतला. शुक्रवारी नावनोंदणी प्रक्रिया सुरू असतानाच डाव्या विचारांच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या जमावाने चेहऱ्यावर फडके बांधून कम्युनिकेशन अॅण्ड इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसच्या इमारतीत घुसखोरी केली. बळजबरी व दांडगाई करत तिथल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आणि त्यामुळेच नावनोंदणीची प्रक्रिया थांबली. पण हे त्याच दिवशी नव्हे तर दुसऱ्या दिवशी शनिवारीही झाले. 4 तारखेला डाव्या विद्यार्थ्यांनी संबंधित इमारतीत घुसून इंटरनेट व वीजेची जोडणी तोडून टाकली तसेच कार्यालयातही फोडाफोडी केली. दोन्ही दिवस धटिंगणगिरी करूनही विद्यार्थी मागे सरत नसल्याचे व आपले आंदोलन फसल्याचे पाहून संतापलेल्या डाव्यांनी रविवारी हिंसेचा आधार घेतला. म्हणजेच तीन-चार दिवसांपासून डाव्यांकडून विद्यापीठात गोंधळ घातला गेला, पण त्याची बातमी झाली ती रविवारी रात्री. तीदेखील डाव्यांच्या निरागसतेचे कोडकौतुक करण्यासाठी! परंतु, आधी आपण ज्यांचे समर्थन करत आहोत, त्या पिलावळीने काय धुमाकूळ घातला याची कोणीही नोंद घेतली नाही, ना त्याविरोधात कोणी बोलले!

 

डाव्यांकडून नेहमीच स्वतःच्या सहिष्णू व संवेदनशीलपणाचे गोडवे गायले जातात. जगातला करुणा आणि दयाळूपणाचा जो काही सागर तो आम्हीच अशा आविर्भावात डावी मंडळी वावरत, बडबडत असतात. मात्र, आपले म्हणणे न ऐकणाऱ्यांविरोधात डावी मंडळी कोणत्या थराला जाऊ शकतात, त्याचे प्रात्याक्षिक त्यांनी जेएनयुमध्ये रविवारी करून दाखवले. डाव्यांनी नोंदणीप्रक्रिया रोखल्याने पुढील सत्रात जाऊ इच्छिणारे विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याजवळ जाऊन नोंदणीची मागणी करू लागले. हे सहन न झालेल्या डाव्या संघटनांच्या पाचशेच्यावर विद्यार्थी व कार्यकर्त्यांच्या टोळक्याने तोंडाला फडके बांधून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. डाव्या विद्यार्थ्यांच्या असहिष्णूपणाचा कहर म्हणजे त्यांनी विद्यार्थिनींच्या गुप्तांगांवरही हल्ला केला. तसेच विद्यापीठ परिसरातील पेरियार, साबरमती आणि माही मांडवी या वसतीगृहांमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांना लोखंडी रॉड, काठ्या या साधनांनी मारहाण करण्यात आली. तरीही अशा विकृतांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी अभाविपनेच आम्हाला मारहाण केल्याचे ठोकून दिले. हिंदुत्ववादी व राष्ट्रवादी विचारांचे जेएनयुसह सर्वत्र प्राबल्य व एकत्रीकरण होत असल्यानेच डाव्यांनी तसे आरोप केले. म्हणजेच हा संघर्ष जितका शुल्कवाढ, विद्यापीठीय राजकारण, नावनोंदणीशी संबंधित आहे, तितकाच तो वैचारिक असल्याचेही यावरून दिसते. मात्र, डाव्यांनी आतापर्यंत जसे भिन्न विचाराला व तशा विचाराच्या माणसांना मारून टाकले, त्यांच्या रक्ताचा सडा शिंपला तेच काम जेएनयुतही करण्याचे नियोजन त्यांनी केले. विचारांचा विरोध विचारांनी न करण्याची डाव्यांची ही तशी वर्षानुवर्षांपासूनचीच परंपरा व रविवारचा विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला त्याचाच नमुना! परंतु, पायाखालची वाळू सरकलेल्या व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झालेल्या डाव्यांनी अशा हिंसाचारातून आपलेच थडगे बांधण्याचे काम केले आहे. कारण, कोणत्याही सर्वसामान्य माणसाला हिंसाचार प्रिय नसतो, त्याला सुखासमाधानाने जीवन जगायचे असते. पण डावी मंडळी आपल्या स्वार्थासाठी सर्वांनाच हिंसेच्या आगीत लोटण्यासाठी तत्पर असल्याचे जेएनयुतील कांडावरून दिसते. अर्थात अशा मानसिकतेमुळेच डाव्यांचे नामोनिशाण मिटत चालल्याचे गेल्या काळातील घडामोडींवरून स्पष्ट होते. म्हणूनच जेएनयुतील डाव्यांची ही अशी फडफडदेखील दिवा विझेपर्यंतच असेल.

@@AUTHORINFO_V1@@