मुंबई : सोमवारी सकाळी नागपाडा कामाठीपुरा परिसरात ‘चिनॉय’ या इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करत आहे.
सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या दरम्यान नागपाडा - कामाठीपुरा परिसरातील या इमारतीला आग लागली आहे. आग लागल्याचे कळताच इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. हा मुंबईतील अतिशय गजबजलेला आणि चिंचोळी रस्त्यांचा परिसर आहे. अग्निशमन दलाची गाडी आत येण्यास अडचण असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला थोड्या अडचणी येत असल्याचे म्हटले गेले.
आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र सकाळीच कामाच्या वेळी लागलेल्या या आगीमुळे परिसरात गोंधळ उडाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अद्याप झालेली नसली तरी आगीत ५ जखमी जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.