न्यूझीलंडवर भारताचा धडाकेबाज विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये शुक्रवारी पहिला टी- २० सामना खेळवण्यात आला. भारताने टॉस जिंकून पहिले गोलानंदजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत २०३ धावांची खेळी केली. त्यानंतर २०४ धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, के.एल राहुलच्या ५६ धावा आणि श्रेयस अय्यरच्या नाबाद ५८ धावांच्या खेळीने भारताला धडाकेबाज विजय मिळवून दिला.

 

न्यूझीलंड संघाने दिलेल्या २०४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ७ धाव करत माघारी परतला. त्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी पहिल्या १० षटकामध्ये संघाची धावसंख्या शंभरीपार पोहोचवली. राहुलने २७ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५६ धावा केल्या. तर, विराटने ३२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर मुंबईकर श्रेयस अय्यर आणि मनीष पांडेने भारताचा विजय साकारला. श्रेयसने धडाकेबाज फलंदाजी करत २९ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर, मनीष पांडे १४ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या इश सोधीला सर्वाधिक २ बळी मिळाले. तर, मिशेल सँटनर आणि ब्लेअर टिकनर यांना प्रत्येकी एक-एक बळी मिळाला.

 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या न्यूझीलंड संघाने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी ८ षटकात ८० धावांची दमदार सलामी दिली. गुप्टिल ३० धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विल्यम्सनने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत ४ चौकार आणि ४ षटकारांसह २६ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. तत्पूर्वी, मुन्रो ५९ धावांची वादळी खेळी करून बाद झाला. मुन्रोनंतर, अनुभवी रॉस टेलर मैदानात आला. त्यानेही आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या धावसंख्येत वाढ केली. टेलरने २७ चेंडूत नाबाद ५४ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. भारतीय गोलंदाजांची कामगिरी यावेळी चांगली राहिली नाही. शार्दुलने ४४ धावांमध्ये १ बळी टिपला. शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक बळी मिळाला आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@