
पुणे : 'नाटक आणि राजकीय मतं वेगळी असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनी बोलावल्यास त्यांच्याही कार्यक्रमांना जाऊ,'असे अभिनेता योगेश सोमण यांनी स्पष्ट केले. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पुण्यात शिवसेनेच्या कामगार सेनेकडून कलावंत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सोमण यांनी अभिनयाचे धडे दिलेत आहेत. याच ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले कि,"विद्यापीठस्तरीय कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. माझी भूमिका मी तेथे स्पष्ट करेल. चौकशी सुरु असेपर्यंत याविषयावर मी काहीही टिप्पणी करणार नाही. चौकशीतून खरे काय ते समोर येईल. सत्ताकारण, राजकारण , समाजकारण या सर्व वेगळ्या गोष्टी आहे. नाटक कला सादर करण्यासाठी आम्हाला व्यासपीठ हवं असतं आणि त्यासाठी मला कोणीही बोलावलं तर मी जाईल."
आपली भूमिका ठामपणे मांडताना ते म्हणाले, 'मी फक्त माझे मत मांडले होते आणि मी माझ्या विचारांवर ठाम आहे. सावरकरांविषयी आपले विचार मांडत असताना आपण कोणाचीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे आता कोणाची परवानगी का घ्यावी,' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 'आपण या सर्व मुद्द्यावरील उत्तर आणि स्पष्टीकरण हे येत्या काही दिवसांमध्ये देईन. विद्यापीठातील चौकशीलाही सामोरे जात चौकशी समितीपुढे हे सर्व स्पष्ट करू.' अभिनेते आणि मुंबई विद्यापीठाच्या नाट्य विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधीचा समाचार घेतला होता. सोमण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधीवर टीका केली होती. परिणामी त्यांच्यावर सक्तीच्या रजेची कारवाई केली गेली.