कोझिकोड : ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केरळ येथे एका कार्यक्रमात राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निवडून देऊन केरळने विनाशकारी काम केले असल्याचे म्हणत गांधी घराण्यातील पाचव्या पिढीतला व्यक्ती म्हणून राहुल गांधींना खासदारपदी निवडून देऊन चूक केली, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना हा उपरोधिक टोला लगावला आहे.
अमेठी या आपल्या पारंपारिक मतदार संघातून राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात भाजपतर्फे स्मृती इराणी यांनी कडवे आव्हान तयार केल्यामुळे राहुल गांधींना लोकसभेचे मैदान खडतर बनले. पराभवामुळे होणारी नाचक्की रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड लोकसभा मतदार संघातूनही अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचा हा गड असल्याने राहुल गांधी या ठिकाणी निवडून येऊ शकले. नेमका याच प्रकाराचा समाचार रामचंद्र गुहा यांनी घेतला आहे.
राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, 'काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यामध्ये भारताच्या राजकारणात कठोर मेहनत आणि स्वत: निर्णय घेणाऱ्या नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभा करेल, अशी क्षमता नाही. काँग्रेस स्वातंत्र्यकाळातील महान पक्ष ते सद्यस्थितीत एका कुटुंबाचा पक्ष बनला आहे. यामागे भारतात हिंदुत्व आणि अंध राष्ट्रवादाची वाढ हे कारण आहे. केरळ साहित्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रभक्ती विरुद्ध अंध राष्ट्रवाद या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रामचंद्र गुहा बोलत होते.
गुहा म्हणाले, "मी वैयक्तीक राहुल गांधी यांच्याविरुद्ध नाही. ते शांत आणि सुस्वभावी व्यक्ती आहेत. पण सध्याच्या भारतातील तरुण एका कुटुंबातील पाचव्या पिढीचे नेतृत्व नको म्हणत आहे. जर तुम्ही केरळचे लोक पुन्हा २०२४ मध्ये राहुल गांधींना निवड़ून देण्याची चूक कराल तर नरेंद्र मोदींनाच त्याची मदत होईल. रामचंद्र गुहा म्हणाले की, केरळने भारतासाठी अनेक चांगली कामे केली आहेत. पण राहुल गांधींना खासदार म्हणून निवडून देऊन एक विध्वंसक काम केलं आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतूक
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना रामचंद्र गुहा म्हणाले, मोदी खऱ्या अर्थाने पुढे आहेत कारण ते राहुल गांधी नाहीत. त्यांनी हे स्थान स्वत: मिळवले आहे. त्यांनी १५ वर्षे राज्याचे नेतृत्व केले, त्यांना प्रशासनाच्या अनुभव आहे. विशेष म्हणजे ते प्रचंड मेहनत घेतात. कधी युरोपला जाण्यासाठी सुट्टी घेत नाहीत असे म्हणत राहुल गांधीना टोलाही लगावला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची तुलना मुघलांच्या शेवटच्या कार्यकाळाशी केली आहे.
Ram Guha-
— Ankur Singh (@iAnkurSingh) January 18, 2020
"Kerala, why did you elect 5th generation dynast like Rahul Gandhi? Don't make mistake of re-electing him in 2024.
Modi is self made man, hard working, never takes holidays in Europe" pic.twitter.com/fKLHkrPEUa