बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा IIFA पुरस्कार सोहळा लवकरच मुंबईत पार पडणार आहे. येत्या १६ ते १८ सप्टेंबरला हा सोहळा मुंबईत रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सुप्रसिद्ध कलाकार या सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवतील आणि या सोहळ्याची शान वाढवतील.
IIFA अवॉर्ड्स सोहळ्याच्या या २० व्या वर्षीचे सूत्रसंचालन आयुषमान खुराना आणि अर्जुन कपूर हे सध्याचे आघाडीचे अभिनेते करणार आहेत. तर या भव्य दिव्य सोहळ्यात सलमान खान, माधुरी दीक्षित, रणवीर सिंह, कतरीना कैफ, विकी कौशल आणि सारा अली खान हे सुप्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडतील यात शंकाच नाही.
तसेच या अवॉर्ड्स सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'आयफा रॉक्स'. संगीत आणि फॅशन क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींना या सोहळ्यात पुरस्कृत केले जाते. यावर्षीच्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन राधिका आपटे आणि अली फझल करणार असून या कार्यक्रमात नेहा कक्कर, ध्वनी भानुशाली, रंजीत बारोत, जॉनीता गांधी यांसारखे कलाकार जोरदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत.