'सुरक्षित प्रवास, शाश्वत विकास हीच मेट्रोची हमी' : अश्विनी भिडे यांचा आत्मविश्वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : "मेट्रोमुळे सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी मिळणार आहे. पर्यावरणाचे १०० टक्के रक्षण होणार असून प्रदूषणमुक्ती मिळणार आहे. तसेच वेळ, पैसे आणि श्रम वाचणार असून आयुष्य सुखसमृद्धीने जगता येणार आहे. कुटुंबाचे सौख्य आणि शाश्वत विकास साधला जाणार असल्याने मेट्रो अत्यावश्यक आहे," असे ठाम प्रतिपादन मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी केले. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे आयोजित केलेल्या 'मेट्रोची गरज-शाश्वत विकास' या विषयावर त्या बोलत होत्या. दै. 'मुंबई तरुण भारत' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. यावेळी लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, कार्यवाह महेश काळे, डॉ. रश्मी फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

अश्विनी भिडे म्हणाल्या की, "आज रेल्वेने ८० लाख लोक प्रवास करतात. 'बेस्ट'ने ३८ लाख प्रवास करतात. १९८१ नंतर ही सेवा अपुरी पडू लागली आणि गर्दी रस्त्यावर आली. आजच्या घडीला ४२ टक्के लोक रेल्वेने, २० टक्के बसने, दोन टक्के मेट्रोने प्रवास करतात. बाकी सर्व लोक खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ५५ लाख झाडे आहेत, आरे कॉलनीत ३४ लाख झाडे आहेत, तरीही मुंबईत प्रदूषणाचे प्रमाण सरासरीपेक्षा ५० टक्के जास्त म्हणजे ६४ टक्के आहे. हरित पट्टे जास्त असतानाही वाहनांच्या अफाट संख्येमुळे प्रदूषण जास्त आहे. आज झाडांमुळे जेवढे प्रदूषण शोषले जात आहे ते सर्व प्रदूषण मेट्रो ४ दिवसांमध्ये शोषून घेणार आहे. सध्या रेल्वे प्रवासात विविध कारणांनी दररोज १० व्यक्ती आपला जीव गमावतात. यात तरुणांची संख्या अधिक आहे. जगात असे कुठेही घडत नाही," हे विदारक सत्यही भिडे यांनी मांडले.

 

"मेट्रो पाच-दहा वर्षात पूर्ण होईल. २०३१ पर्यंत ८० लाख, तर ४१ मध्ये १ कोटी लोक मेट्रोने प्रवास करतील. त्यावेळी त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळेलच, शिवाय त्यावेळी आजच्या सारखी प्रदूषणाची समस्याही भेडसावणार नाही. पूर्वी नरिमन पॉईंट हे एकच व्यापारी सेंटर होते. परंतु, आता बीकेसी, सिप्झ, मरोळ, सीएसएमटी, महालक्ष्मी अशा प्रकारची सहा व्यापारी वा आर्थिक स्रोत असलेली सेंटर झाली आहेत. ती सर्व मेट्रोने जोडली जाणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरची साडेसहा लाख वाहने कमी होतील. इतकेच इंधन वाचेल आणि वर्षाला अडीच लाख मेट्रिक टन प्रदूषण कमी होईल," अशी त्यांनी खात्री दिली. मेट्रो ही विकासाची गंगोत्री असल्याचे लक्षात घेता विलेपार्ल्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही अश्विनी भिडे यांचे विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@