दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील : राज्यपाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबई : दिव्यांगाच्या अडचणी सोडवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू, अशी ग्वाही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी दिली. दृष्टीहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी अखिल भारतीय ध्वजदिन निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी राज्यपालांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, नॅब संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, सरचिटणीस गोपी मयुर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

 

राज्यपाल भगत यांनी सांगितले की, "नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड अर्थात नॅब या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगाच्या कल्याणासाठी अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले आहेत. मुंबईसह इतर केंद्रातही उत्तम कामगिरी होत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यांचे केंद्र सुरु झाले पाहिजे." ध्वजदिन निधी संकलन तसेच भविष्यातील उपक्रमांसाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

नॅब संस्थेचे अध्यक्ष कलंत्री यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. या संस्थेत अनेक प्रकारचे अपंगत्व आलेल्यांचे पुनर्वसन केले जाते. हस्तकला, शिवणकला व इतर नैपुण्यासह इथे बी एड हा अभासक्रम शिकविण्यात येतो. "अंध लोकांसाठी सेन्सरी गार्डन तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून स्पर्श संवेदनांच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घेता येतो. याच धर्तीवर इतर बगीच्यांची रचना करण्यात यावी." अशी मागणी त्यांनी केली.

 

नॅब ही दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था असून राज्यपाल हे या संस्थेचे प्रमुख आश्रयदाता आहेत. या संस्थेची महाराष्ट्रातील शाखा सन १९८४मध्ये सुरु करण्यात आली आहे. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला तसेच निधी संकलन पेटीत पहिला निधी टाकण्यात आला. यावेळी तिमिरातूनी तेजाकडेया पुस्तकाचे प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@