मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक स्वरूपचंद गोयल यांचे मुंबईतील राहत्या घरी सोमवारी सकाळी ९.३० वा. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
१८ ऑगस्ट, १९३० रोजी मुंबईत जन्मलेल्या स्वरूपचंद गोयल यांनी सुरुवातीला जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या अनेक संस्था व संघटनांत काम केले. पक्षाचे मुंबई कोषाध्यक्ष, तसेच पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली. परंतु, केवळ पक्षकार्य न करता स्वरूपचंद गोयल यांनी वनबंधू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशात वनवासी बांधवांसाठी ‘एकल विद्यालय’ उभारणीत सिंहाचा वाटा उचलला.
स्वरुपचंद गोयल यांना
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2019
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली pic.twitter.com/7odQk4rmAp
सोबतच स्वरूपचंद गोयल यांनी भारतीय संस्कृती जागरणाचेही काम केले. मुंबईच्या चौपाटीवर आदर्श रामलीला समितीमार्फत वर्षानुवर्षे भव्य रामलीला आणि कवी संमेलनांचे आयोजन करण्यातही त्यांचा विशेष पुढाकार होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक प्रसिद्ध कवी या संमेलनात भाग घेत असत. ‘बाबूजी’ या नावानेही परिचित असलेल्या स्वरूपचंद गोयल यांच्या निधनामुळे समाजसेवेच्या विविध आयामात ठसा उमटवणारे धडाडीचे नेतृत्त्व गमावल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
विविधांगी कार्याचा आलेख
गेली ७० वर्षं ते मृत्युच्या आदल्या दिवसापर्यंत समाजसेवेतच सक्रिय असणार्या स्वरूपचंद गोयल यांनी रा. स्व. संघ आणि संघपरिवाराशी संबंधित अनेक संस्थांत महत्त्वाची भूमिका निभावली. वनबंधू परिषदेच्या माध्यमातून देशातील दुर्गम, डोंगराळ प्रदेशात वनवासी बांधवांच्या शिक्षणासाठी चालवल्या जाणार्या एकल विद्यालय उभारणीत स्वरूपचंद गोयल यांचा मोठा सहभाग होता.
आज देशभरातील एकल विद्यालयांची संख्या ५० हजार ते १ लाखांच्या घरात आहे, त्यात स्वरूपचंद गोयल यांनी केवळ शारीरिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही सहकार्य केले. केवळ एकल विद्यालयच नव्हे तर संघाच्या सर्वच संस्थांना त्यांनी आर्थिक साहाय्य केले, तसेच अन्य ठिकाणांहून मदतही मिळवून दिली.
श्रीहरी सत्संग समितीमार्फत स्वरूपचंद गोयल यांनी गावागावात जाऊन भारतीय संस्कृतीला अनुसरून जागरणाचे काम केले. रामायण, महाभारतावर आधारित ध्वनिचित्रफितरथ तयार करण्यात त्यांनी सहभाग घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीलाही स्वरूपचंद गोयल यांनी प्रखर विरोध केला. परिणामी, त्यांनी १९ महिने तुरुंगवासही भोगला. इतकेच नव्हे तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ महानाट्याच्या हिंदी भाषेतील रुपांतराचे पहिले २५ प्रयोगही त्यांनी स्वखर्चाने केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat