मी आता अध्यक्ष नाही...राहुल गांधींकडून राजीनाम्यावर शिक्कामोर्तब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2019
Total Views |


  

 

ट्विटरवर 4 पानी भावूक पत्रातून स्पष्टीकरण

 नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत बरेच चर्वितचर्वण झाल्यानंतर बुधवारी स्वतः राहुल गांधी यांनी मी आता अध्यक्ष नाहीअसे सांगत राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच, याबाबत ट्विटरद्वारे चार पानांचे भावूक पत्र शेअर त्यांनी शेअर केले.

राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने नाकारला होता तसेच, त्यानंतर काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांची मनधरणी करत होते. अखेर, राहुल गांधी यांनीच याबाबत खुलासा करत, मी माझा राजीनामा याआधीच दिलेला असून आता मी काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, काँग्रेस कार्यकारिणीने आणखी विलंब न करता तातडीने नव्या अध्यक्षाबाबत निर्णय घ्यावा, त्यासाठी बैठक बोलवावी, असेही राहुल यांनी सांगितले. तसेच, आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आपल्या राजीनाम्याबाबतचे चार पानी सविस्तर पत्रही त्यांनी शेअर केले.

काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे ते म्हणाले. माझ्या सहकार्यांनी मला सल्ला देताना मीच काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडावा, असे सुचवले होते. परंतु, असे करणे योग्य नसल्याचेही राहुल यांनी स्पष्ट केले.

नव्या अध्यक्षाबाबतच्या चर्चेला उधाण

राहुल गांधींनी राजीनाम्याबाबत शिक्कामोर्तब करताच आता काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चांना उधाण आले आहे. ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव याकरिता आघाडीवर आहे. तरीई, सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेल्या 77 वर्षीय शिंदे यांना अध्यक्षपद खरोखरच मिळेल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे हे गांधी घराण्याशी निष्ठावान असल्यामुळे शिंदे यांच्यासारख्याच एखाद्या नेत्याची अध्यक्षपदी वर्णी लागेल, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

 
 
 
 
राहुल गांधीचे ट्वीटर हँडल त्वरित बदले गेले आहे. आता फक्त संसद सदस्य आणि काँग्रेस सदस्य इतकाच उल्लेख त्यांनी ठेवला आहे. यापूर्वी ट्वीटर हँडलवर 'प्रेसिडेंट ऑफ इंडियन नेशनल कांग्रेस' लिहिले होते. 
 

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@