नवी दिल्ली : मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जनधन योजनेला मोठे यश प्राप्त झाले असून, या खात्यांमधील ठेवींचा आकडा एक लाख कोटी रुपयांवर गेला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार, जनधन योजनेतील ३६.०६ लाख खात्यांमध्ये ३ जुलै रोजी तब्बल १,००,४९५.९४ कोटी रुपये जमा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातील रकमेचा आकडा सातत्याने वाढत असून, ६ जून रोजी या खात्यांमध्ये ९९,६४९.८४ कोटी रुपये जमा होते. त्याच्या मागील आठवड्यात ठेवींची रक्कम ९९,२३२.७१ कोटी रुपये होती. देशातील गरीब नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान जनधन योजनेचा २८ ऑगस्ट २०१४ रोजी शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत मूलभूत बचत बँक ठेवींसह रुपे डेबिट कार्ड आणि खात्यातील शिलकीपेक्षा एका निश्चित प्रमाणात जास्त रक्कम काढण्याची सुविधाही खातेदारांना दिली आहे.
पंतप्रधान जनधन य ोजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या मार्च २०१९ मध्ये घटून ५.०७ कोटींवर आली आहे. मार्च २०१८ मध्ये या खात्यांची संख्या ५.१० कोटी होती, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने अलिकडेच राज्यसभेत दिली आहे. २८.४४ कोटी जनधन खातेधारकांना रुपे डेबिट कार्डची सुविधा देण्यात आली आहे. या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.
या योजनेच्या यशामुळे सरकारने खातेधारकांना अतिरिक्त सुविधा देत जुन्या खातेधारकांना दोन लाख रुपयांच्या अपघात विम्याचे कवच आणि २८ ऑगस्ट २०१८ नंतर उघडलेल्या खात्यांवर एक लाख रुपयांचा अपघात विमा दिला आहे. शिलकीपेक्षा १० हजार रुपये जास्त रक्कम काढण्याची सुविधाही या योजनेंतर्गत देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील एकूण जनधन खात्यांपैकी ५० टक्के खाती ही महिलांची आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat