कर्नाळ्यात तिबोटी खंड्याच्या दर्शनाला परवानगी नाही !

    24-Jun-2019
Total Views | 1933



 

 

खंड्यांच्या प्रजनन परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास मज्जाव ; प्रजनन हंगामामुळे निर्णय


मुंबई ( अक्षय मांडवकर) : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या 'कर्नाळा पक्षी अभयारण्या'तील तिबोटी खंड्या (ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर) पक्ष्यांच्या विणीच्या जागेचा परिसर वन विभागाने पर्यटकांसाठी १५ जुलै पर्यंत बंद ठेवला आहे. ऐन विणीच्या हंगामात या पक्ष्यांच्या छायाचित्रणासाठी अभयारण्यात मोठ्या संख्येने हौशी छायाचित्रकार येतात. मात्र, छायाचित्रे काढताना त्यांची पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत होणारी लुडबुड लक्षात घेता वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने एखाद्या पक्ष्याच्या संवर्धनासाठी काही भाग विशिष्ट कालावधीकरिता संरक्षित करण्याचा निर्णय प्रथमच विभागाने अंमलात आणला आहे. परंतु, सरसकट बंदी ऐवजी कॅमऱ्यांवर बंदी घालून पक्षीनिरीक्षकांना हा परिसर खुला करुन द्यावा, असे मत तज्ज्ञ पक्षीनिरीक्षकांनी मांडले आहे.

 

पाऊसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या हरितक्षेत्रात आकर्षक अशा तिबोडी खंड्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. याठिकाणी हे पक्षी दरवर्षी काही संख्येने प्रजननाकरीता दाखल होतात. भारतात आढळणाऱ्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान खंड्या आहे. या पक्ष्यांच्या समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होत असला तरी तो केवळ प्रजननासाठी मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रात येतो. त्यानंतर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. मुंबईतील त्याच्या विणीचा काळ अत्यंत नाजूक मानला जातो. कारण, याच कालावधीत हे पक्षी प्रजनन करुन आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, बऱ्याचदा उत्साही छायाचित्रकार आणि पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांच्या प्रजननामध्ये व्यत्यय ठरतात. कर्नाळा पक्षी अभयारण्यात तर या पक्ष्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडालेली दिसते. परंतु, या पक्ष्याला मानवी हस्तक्षेपाची जाणीव झाल्यावर तो त्याठिकाणी आपले घरटे बांधत नाही. तिबोटी खंड्या मातीमध्ये बीळ खोदून आपले घरटे तयार करतो. सर्वसाधारणपणे. नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस कडेला असणाऱ्या मातीमध्ये हे पक्षी बीळ खणून त्यामध्ये आपले घरटे तयार करतात.

 

कर्नाळा अभयारण्यात तिबोटी खड्यांच्या घरटांच्या परिसरात हौशी छायाचित्रकार गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी वन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे विभागाने कर्नाळा अभयारण्यातील या पक्ष्यांच्या प्रजननाच्या काही जागेवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद ठेवला आहे. या परिसरात पर्यटक किंवा हौशी छायाचित्रकार आढळल्यास त्याच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे फलकच विभागाने या ठिकाणी लावले आहेत. गेल्या वर्षी आम्हाला अभयारण्यात तिबोटी खंड्याच्या सहा जोड्या आढळून आल्या होत्या. यंदा येथील 'कोकण लज्जत फूड सेंटर'च्या मागील परिसरात दोन जोड्यांचा अधिवास निदर्शनास आल्याचे कर्नाळा पक्षी अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे हा परिसर १५ जुलै पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. काही हौशी छायाचित्रकार या ठिकाणी छायाचित्रणाच्या नावाखाली गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे, चव्हाण म्हणाले. मात्र, या बंदीविषयी काही पर्यटकांनी राज्याचे 'प्रधान मुख्य वनसंरक्षक' (वन्यजीव) नितिन काकोडकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पण, प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी संवर्धन आणि संरक्षणाच्या दुष्टीने घातलेल्या बंदीची माहिती जाणून घेतल्यानंतर निर्णय योग्य आहे, असे सांगितल्याची माहिती ठाणे वनवृत्ताचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) अर्जुन म्हसे यांनी दिली.

 

 
 

मात्र, अशा प्रकारची सरसकट बंदी न आणण्याविषयीचे मत तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक आदेश शिवकर यांनी मांडले आहे. गेल्या वीस वर्षांपासून शिवकर कर्नाळा अभयारण्यामध्ये पक्षी निरीक्षणाचे काम करत आहेत. अशा बंदीचा फटका प्रामाणिक आणि रस असणाऱ्या पक्षीनिरीक्षकांना बसतो. त्यामुळे हौशी आणि नियम न पाळता छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकारांचा उच्छाद रोखण्यासाठी तिबोटी पक्ष्यांच्या प्रजनन क्षेत्रात कॅमरा घेऊन जाण्यावर बंदी आणणे आवश्यक असल्याचे मत शिवकर यांनी मांडले आहे. ठोस उपाययोजना करतानाच विभागाने त्याच्या त्रास विशिष्ट हेतुविरहित आलेले पर्यटक आणि निसर्गप्रेमींना होऊ नये याची देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे शिवकर यांनी सांगितले.

 

तिबोटी खंड्याची वैशिष्ट्ये

 

* या पक्ष्याच्या अंगावर जांभळा, गुलाबी, निळा, काळा, पांढरा या रंगांच्या वेगवेगळ्या छटा असतात. नारंगी पिवळे पोट आणि लाल रंगाची लांब चोच असते.

 

* त्याची लांबी साधारण १३ सेमी असते.

 

* मातीमध्ये बीळ खणून त्यामध्ये हा पक्षी घरटे तयार करतो. ४ सेमी तोंड असलेले त्याचे बळी मातीमध्ये सुमारे २ फुट आतवर गेलेले असते.

 

* छोटे किटक, पाल, मासे हे त्याचे खाद्य आहे.

 

* प्रजननाच्या कालावधीत जोडी जुळल्यानंतर या पक्ष्यांच्या नर-मादी मिळून घरटे खोदण्याचे काम करतात.

 

* अंडी उडविण्याची प्रक्रिया नर-मादी मिळून करतात. सतरा दिवसांच्या अंडी उबविण्याच्या प्रक्रियेनंतर पुढील तीन महिने पिल्लांना वाढविण्याचे काम केले जाते.

 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121