नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. भारताच्या कूटनितीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी देशातील नागरिकांना शुभेच्छा देत विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, "हा नवीन भारत आहे आणि हा नवीन भारताचा आवाज आहे. भारताने २०१९मध्ये केलेल्या पाचव्या प्रयत्नात चीनला हार मानावी लागली आहे. आज मसूद अझहरला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. गेल्या १० वर्षांपासून भारत यासाठी प्रयत्न करत होता, या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. प्रत्येकवेळी चीनने खोडा घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलवामा घटनेनंतर आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनलाही भारताच्या प्रस्तावापुढे झुकावे लागले आहे."
"मसूद अझहरला दहशतवादी घोषित करणे हे केवळ नरेंद्र मोदीचे यश नाही, तर संपूर्ण देशाचे यश आहे. हा नवीन भारत असून, हा नवीन भारताचा आवाज आहे. मात्र ही केवळ सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होते. आज प्रत्येक भारतीयसाठी अभिमानाचा दिवस आहे. विरोधकांनी या उत्साहाच्या वातावरणात भंग करु नये." असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat