दहशतवाद्यांच्या देशा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2019   
Total Views |

jp_1  H x W: 0




दहशतवादाची फॅक्टरी’, ‘दहशतस्थान’, ‘दहशतवाद्यांची जन्नत’, ‘दहशत-ए-पाकिस्तान’ आणि दहशतीच्या दशावतारांनी दुमदुमणारा असा आपला शेजारी पाकिस्तान. पण, जर तुमचा समज असेल की एखादी व्यक्ती पाकिस्तानातच राहून ‘दहशतवादी’ होऊन ‘जिहाद’ पुकारते, तर तो केवळ भ्रम ठरावा. पाकिस्तानी नागरिक असो किंवा पाकिस्तानी वंशाची, पण इतर देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले व्यक्ती, तीही दहशतवादाची कट्टर, छुपी पुरस्कर्ती असू शकते, हे ‘लंडन ब्रिज’च्या घटनेने नुकतेच दाखवून दिले.

 

२९ नोव्हेंबर रोजी एका माथेफिरुने सुप्रसिद्ध लंडन ब्रिजवर अंदाधुंद चाकू हल्ला सुरू केला. या हल्ल्यात चार-पाच जण जखमी झाले, तर दोन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. पोलिसांनी या माथेफिरुला गोळ्या झाडून जागच्या जागी संपविले. नंतर त्याची ओळख पटली. उस्मान खान. वय वर्षे २९. पाकिस्तानी वंशाचा, पण ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेला जिहादी. शालेय शिक्षण अर्धवट सोडून तो लंडनमध्ये दाखल झाला खरा, पण जिहादचा सैतान त्याच्या तनामनात दबा धरून होता. २०१२ साली उस्मानला लंडनच्या दहशतवादी कायद्याअंतर्गत अटकही झाली. २०१० साली उस्मान आणि त्याच्या काही साथीदारांनी मिळून ब्रिटनमधल्या महत्त्वाच्या वास्तूंवर हल्ल्याचा कट रचला. एवढेच नाही, मुंबईतील ‘२६/११’ सारखा भयंकर रक्तपाती हल्ला ब्रिटनच्या संसदेवर करण्याचा कट त्यांच्या जिहादी मेंदूत शिजत होता. पण, लंडन पोलिसांनी हा दहशतवादी कट वेळीच उधळून लावला. उस्मान लंडन पोलिसांच्या कैदेतही होता. पण, ‘प्रोबेशन’वर अर्थात सुधारण्याची एक संधी त्यालाही दिली गेली. ब्रिटनच्या कायद्याची उदारता बघा, याच उस्मानला त्याचे तुरुंगातील अनुभव कथन करण्यासाठी ज्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले, त्याच कार्यक्रमात या माथेफिरुने स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या मोठ्या चाकूने उपस्थितांवर सपासप वार करायला सुरुवात केली. दोन जणांना ठार मारून पोलिसांच्या गोळ्या खात उस्मानही अल्लाला प्यारा झाला. त्याचे पार्थिव शरीर ब्रिटनमध्ये पुरण्यास विरोध झाल्यामुळे त्याच्या मायदेशी पाकिस्तानात ते पाठवण्यात आले व पाकव्याप्त काश्मिरातील त्याच्या मूळ गावात दफनविधीही पूर्ण झाला.

हा घटनाक्रम जसाच्या तसा वार्तांकित करणार्‍या ‘डॉन’ या पाकिस्तानमधील इंग्रजी वृत्तपत्रावर मात्र अज्ञात कट्टरतावाद्यांच्या झुंडीने हल्ला केला. ‘पाकिस्तानी वंशाचा’ या बातमीतील मथळ्यावर आक्षेप नोंदवत तो पाकिस्तानचा नागरिक नव्हता, तर पाकिस्तानला नाहक बदनाम का करता, म्हणून ‘डॉन’च्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. पत्रकारांना धमकावण्यात, चोपण्यात आले. पाकिस्तानच्या मंत्र्यांनीही ‘डॉन’वर तोंडसुख घेतले. म्हणजे, एकीकडे पाकिस्तानी माध्यमे किती स्वतंत्र आहेत, याचे जगभर गुणगान गायचे आणि दुसरीकडे अशाप्रकारे त्यांची मुस्कटदाबी करून त्यांना दहशतीच्या छायेखाली ठेवायचे, असा हा दुटप्पीपणा. पण, पाकिस्तानने कितीही हात झटकले तरी तो पाकिस्तानी वंशाचा, म्हणजे आपसुकच दहशतीच्या विषवल्लीशी निगडित होता. ‘अल कायदा’च्या विचारांचा उस्मान पाईक होता. ‘जिहाद’ ही त्याची मनोवृत्ती त्याच्या पाकी वंशानेच त्याच्याशी नैसर्गिकरित्या जोडली गेली होती. पण, दहशतवादाशी एकीकडे संबंध कित्येकदा कबूलही करायचे, पण पाकी दहशतवादी सापडला की ‘तो आमच्या देशाचा नागरिकच नाही,’ म्हणून सरळ हात झटकायचे, ही पाकची वाईट सवय. मुंबई हल्ल्यातील एकमेव जीवंत पकडला गेलेला आणि नंतर फासावर लटकवलेल्या अजमल कसाबलाही पाकिस्तानने सज्जड पुरावे असूनही नागरिक म्हणून साफ नाकारले. त्याचा मृतदेही स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवादी निर्मितीची आणि नंतर त्यांना नाकारण्याची खोड तशी जुनीच. त्याचाच कित्ता त्यांनी यंदाही गिरवला.

तेव्हा यादहशतवाद्यांच्या देशात’ आणि देशाबाहेरही जिहादरुपी विषारी सर्प डूक धरून आहेच. संधी मिळताच, त्याचे जिहादी फणा काढतात. तेव्हा, लंडनमधील पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या वाढत्या लोकसंख्येकडे ब्रिटनने आता अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे; अन्यथा ब्रिटिशांच्या या देशाला ‘जिहाद’ची लागण होऊन, तोही ‘दहशतवाद्यांचा देश’ म्हणून भविष्यात ओळखला जाऊ लागला, तर आश्चर्य वाटायला नको.

@@AUTHORINFO_V1@@