नवी दिल्ली : प्लास्टीकचा वापर कमीत कमी करावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन दिल्लीत वैशिष्ट्यपूर्ण उपाहारगृहांची सुरूवात करण्यात आली आहे. प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात अन्नपदार्थ देणारे गार्बेज कॅफे दिल्लीत सुरू करण्यात आले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
देशभरात प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरण प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा वापर एकाएकी थांबविणे शक्य नसले तरी त्याचा कमीतकमी वापर करणे आणि योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सिंगल युझ प्लास्टिकचा वापर थांबवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दिल्लीत वैशिष्ट्यपूर्ण असे गार्बेज कॅफे सुरू करण्यात आले आहे.
या उपाहारगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्लास्टिकच्या बदल्यात ग्राहकांना अन्नपदार्थ दिले जातात. त्यामध्ये २५० ग्रॅम प्लास्टिकच्या बदल्यास चहासोबत सामोसा आणि ब्रेड पकोडा असे न्याहारीचे पदार्थ मिळतात. तर एक किलो कचऱ्याच्या बदल्यात दुपार अथवा रात्रीचे जेवण मिळते. सिंगल युझ प्लास्टिकच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे कॅन्स, शीतपेयांच्या बाटल्या आणि अन्य प्लास्टिकचा कचरा ग्राहक येथे आणू शकतात आणि त्याबदल्यात अन्नपदार्थ घेऊ शकतात.
दक्षिण दिल्ली महापालिकेच्या नजफगढ झोनचे आयुक्त संजय सहाय यांची ही कल्पना आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० साठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर अथवा उघड्यावर साचून राहण्यास पायबंद बसणार आहे. त्याचप्रमाणे उपाहारगृहात साठलेल्या कचऱ्याची योग्य त्या रितीने विल्हेवाट लावली जाणार आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य उपाहारगृहांनादेखील असे करण्याचे आवाहन केले जाणार आहे. नजफगढप्रमाणे द्वारका सेक्टर १२ आणि २३ मधील मॉलमध्येही अशा प्रकारचे उपाहारगृह सुरू करण्यात आले आहे.