मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षेत घट करण्यात आली आहे. त्याच्या 'एक्स' दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढमध्ये वाढकरण्यात आली आहे. त्यांचा आता 'वाय प्लस' सुरक्षेचा दर्जा 'झेड' सुरक्षेत करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून राज्यातील काही व्हिआयपींना सुरक्षा प्रदान करण्यात येत असते. नुकतेच राज्यातील ४५ महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकर याला यापूर्वी एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती. म्हणजेच सचिनसोबत चोवीस तास पोलीस कॉन्स्टेबल असत होता. मात्र आता अशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. यापुढे सचिनला पोलीस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे.
यासोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना यापूर्वी वाय दर्जाच्या सुरक्षा होती. यासोबतच एस्कॉर्ट सुरक्षा देखील होती. आता खडसेंची एस्कर्ट सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा कमी करुन 'एक्स' दर्जाची प्रदान करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या सुरक्षेमध्येही घट करण्यात आली आहे. निकम यांना असलेली 'झेड प्लस' सुरक्षा व्यवस्था 'वाय' दर्जाची करण्यात केली आहे. तर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची सुरक्षा आता 'वाय प्लस'वरुन 'झेड' दर्जाची करण्यात आली आहे.