चिंता कसोटीच्या अस्तित्वाची !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



सामने रंगत नसल्यामुळे अनेक खेळाडू कसोटीऐवजी टी
-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यावरच भर देतात. त्यामुळे टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या युगात कसोटी क्रिकेटचे भवितव्य ही एक सध्या चिंतेची बाब बनली आहे.



बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजय मिळवला
. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवत कसोटी क्रिकेटच्या प्रकारात बांगलादेश आजही कच्चा लिंबूच असल्याचे भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले. ऐतिहासिक मानल्या जाणार्‍या गुलाबी कसोटी क्रिकेटच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा सामना अवघ्या तीन दिवसांतच संपवला. या सामन्यांच्या निकालासाठी संपूर्ण तीन दिवसही लागले नाहीत. दोन दिवस आणि तिसर्‍या दिवसातील ४७ मिनिटे इतक्या कमी वेळात या सामन्याचा निकाल हाती आला. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी ही बाब आनंदाची असली तरी कसोटी क्रिकेटच्या अस्तित्वाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



कारण या मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांत बांगलादेशचा पराभव झाला आहे
. दोन्ही डाव मिळून बांगलादेशचे खेळाडू दोन दिवसही फलंदाजी करू शकत नसून कसोटी सामना दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसांतच संपुष्टात येत आहे. ही बाब कसोटी क्रिकेटसाठी हितावह नाही. कसोटी क्रिकेटचा सामना हा पाच दिवसांचा असतो. पाच दिवसांपर्यंत सामना चालल्यास कसोटी क्रिकेटची खरी रंगत लढते. मात्र, दोन ते तीन दिवसांत सामना निकाली निघाल्यास कसोटी क्रिकेटची खरी रंगत लढतच नाही. सामने एकतर्फी होतात. परिणामी, कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होते. सामने रंगत नसल्यामुळे अनेक खेळाडू कसोटीऐवजी टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यावरच भर देतात.


त्यामुळे टी
-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या युगात कसोटी क्रिकेटचे भवितव्य ही एक सध्या चिंतेची बाब बनली आहे. विविध देशांच्या क्रिकेट नियामक मंडळाकडून यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. ‘गुलाबी कसोटी’ हादेखील त्याचाच एक भाग म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ‘गुलाबी कसोटी’आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही कसोटी सामना पाचऐवजी चार दिवसांचा करण्याचा प्रस्ताव याआधी सर्व देशांच्या क्रिकेट नियामक मंडळापुढे ठेवला होता. मात्र, अनेक देशांनी तो नाकरल्याने कसोटी आजही पाच दिवसांचीच आहे.



एक
‘परफेक्ट स्ट्रोक’


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर केलेले एक विधान सध्या भारतीय क्रिकेट विश्वात चांगलेच चर्चेत आले आहे
. ऐतिहासिक कसोटी सामना जिंकल्यानंतर कोहलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना२००० सालापासून पुढे म्हणजेच गांगुलीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर भारतीय संघ सामने जिंकू लागला,” असे विधान केले. त्याच्या या विधानामुळे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू भडकले. भारताचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावस्कर यांनी लागलीच कोहली याच्या या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, “कोहलीने हे विधान कदाचित विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला खुश करण्यासाठी केले असेल. परंतु त्याने आधी माहिती घेणे आवश्यक होते. भारत १९७० आणि १९८०च्या दशकातही क्रिकेट सामने जिंकत होता. त्यावेळी विराट जन्मलादेखील नव्हता. केवळ विराट नाही तर अनेकांना असे वाटते की, क्रिकेट २००० साली सुरू झाले.


पण
, त्यांना मला सांगावेसे वाटते की, १९७० मध्येही भारतीय संघ परदेशात जिंकल्याची नोंद इतिहासात आहे. १९८३ साली भारताने पहिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारताने इतर खंडातही सामने जिंकले. इतकेच नव्हे तर भारताने परदेशात कसोटी मालिकाही अनिर्णित ठेवली होती,” असेही गावसकर यांनी नमूद केले. भारतीय संघाचा इतिहास पाहिला तर गावस्कर यांचे हे बोलणे योग्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९७० आणि १९८०च्या दशकातही भारताने अनेकदा सामने जिंकल्याचा इतिहास आहे. त्यावेळी होणार्‍या क्रिकेटच्या सामन्यांची संख्या आजच्या तुलनेत कमी असल्याने अनेक विजयांची नोंद होऊ शकली नाही, हे खरे आहे.


मात्र
, २००० सालानंतरच भारत क्रिकेटमध्ये जिंकू लागला, असे म्हणणे अयोग्य ठरते. कोहली सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून अशा अनुभवी खेळाडूने अशा प्रकारची विधाने करणे अशोभनीय आहे. केवळ भारतीय संघाचेच नव्हे, तर आयपीएल सामन्यांमध्येही त्याने नेतृत्व केले आहे. विविध संघात महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडणार्‍या कोहलीने हे विधान करण्याआधी विचार करणे गरजेचे होते, असे अनेक क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. क्रिकेटमध्ये ‘लिटिल मास्टर’ म्हणवल्या जाणार्‍या गावस्करांनी लगावलेला हा ‘परफेक्ट स्ट्रोक’ आहे, हे मात्र नक्की!


-रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@