सर्वांच्या सहभागातूनच मुंबईचा विकास शक्य : प्रवीण परदेशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : "अफाट लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराच्या विकासाच्या अनेक योजना आहेत. प्रशासन त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लोक, संस्था आणि संघटना, तसेच प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातूनच मुंबईचा विकास शक्य आहे," असे स्पष्ट मत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले. पार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे शुक्रवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित 'मुंबईचा विकास आणि आमची भूमिका' या विषयावर ते बोलत होते. यावेळी पार्लेकर नागरिकांबरोबरच, नगरसेवक, महापालिकेचे मुख्यालयातील, तसेच विभाग कार्यालयातील अधिकारी परदेशी यांचे विचार ऐकायला आणि विकासाच्या योजना समजून घ्यायला आवर्जून उपस्थित होते.

 

प्रवीण परदेशी पुढे म्हणाले की, "मुंबई शहराला इतिहास आहे. देशभरातून लोक येथे येतात. मात्र, मुंबई शहर जगातले सर्वात उत्कृष्ट शहर कसे बनवता येईल, याबाबत चिंतन करण्याची गरज आहे. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे." "साडेचारशे चौरस किलोमीटर क्षेत्राच्या मुंबईत दीड कोटी लोक राहतात. त्यातले निम्मे लोक झोपडपट्टीत राहत असले तरी त्यांना सेवा देण्यात पालिका कोणताही भेदभाव करीत नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्या ७० लाख लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ७२२२ मेट्रिक टन कचरा दररोज साफ केला जातो. यातला निम्मा कचरा झोपडपट्टीतून येतो. प्रति किलोमीटर ७८०० वृक्ष, याप्रमाणे ९० लाख वृक्ष आहेत. तरीही मुंबईत प्रदूषण जास्त आहे. वाहनांची वाढती संख्या हे त्यामागचे मुख्य कारण आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

 

खासगी वाहनांतून प्रवास केल्यास प्रदूषणाचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढते. न्यूयॉर्क, टोकियो, लंडन अशा विकसित देशांतून लोक सार्वजनिक वाहनातून प्रवास करतात. म्हणून प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा त्यावर नामी उपाय आहे. यासाठीच बेस्टच्या ताफ्यात ४००० वातानुकूलित बसेस आणण्यात येत आहेत. प्रवाशांना बेस्टची फ्रिक्वेन्सी कळावी म्हणून त्यामध्ये आयटीएमएस सिस्टिम बसविण्यात येत आहे. पुढील वर्षात ही संख्या ६००० पर्यंत नेणार आहोत. लोकांनी बसमधून प्रवास करावा म्हणून पहिल्या टप्प्याचे भाडेही कमी केले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यामुळे बेस्ट बसच्या प्रवाशांच्या संख्येत १० लाखांनी वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहर स्वच्छ, सुंदर अणि आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले.

 

मियावाकी जंगले

 

"मुंबई शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी झाडेही लावणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मियावाकी जंगलांचा पर्याय शोधला आहे. या पद्धतीत कमी जागेत जास्त झाडे लावण्यात येतात. त्यासाठी विकासकांना क्षेत्रफळाच्या ५ ते १० टक्के खुली जागा सोडण्याचे बंधनकारक करण्यात येत आहे. त्याशिवाय त्यांना ओसी देण्यात येणार नाही. मियावाकी असल्याशिवाय ग्राहकाने जागा खरेदी करू नये, असे रेरालाही बंधनकारक करण्यात येणार आहे," असे परदेशी यांनी सांगितले.

 
 
 

पाण्यावर प्रक्रिया

मुंबई शहराला कमी खर्चात शुद्ध आणि मुबलक पाणी दिले जाते. दररोज पुरवण्यात येणार्‍या 3500 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 2700 दशलक्ष लिटर पाणी सांडपाणी म्हणून बाहेर फेकले जाते. हा पाण्याचा मोठा अपव्यय असून त्यामुळे समुद्राचे प्रदूषणही वाढत असून ती चिंतेची बाब आहे. त्यामुळे रोजच्या सवयीत बदल करायला हवा. पाणी प्रदीर्घ काळपर्यंत पुरवायचे असेल तर पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरले पाहिजे. त्यासाठी सिव्हरेज प्लांट बनविण्यात येणार असून त्यातील 50 टक्के पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. वीस हजार चौरस मीटर क्षेत्राच्या सोसायट्यांना टॉयलेटसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याशिवाय त्या सोसायट्यांना ओसी न देण्याचे धोरण आखण्यात आले आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

 

कचऱ्यावर प्रक्रिया

स्वच्छता ही महत्त्वाची बाब आहे. यासाठी स्वच्छता अभियानाला वेगळा अर्थ असला पाहिजे,” असे सांगून परदेशी म्हणाले की, “कचरा ही मूल्यवान वस्तू आहे. त्यापासून बनणारे खत उपयुक्त असून मुंबईत भाजी घेऊन येणार्या ट्रकमधून तो शेतीसाठी पाठविण्याची योजना आहे. सोसायट्यांनी खतनिर्मिती केल्यास त्यांना मालमत्ता करात सवलत देण्यात येत आहे. शिवाय हाऊसकिपिंग एजन्सींनाही त्यापासून पैसा मिळू शकतो.” कचरा हा उत्पन्नाचा स्रोत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

 
 
रोजगारनिर्मिती
“मुंबई शहर 450 चौरस किलोमीटरवर वसले असून 142 चौरस किलोमीटरवर वस्ती आहे. इतर क्षेत्र पर्यावरण संरक्षणासाठी ना विकास क्षेत्र म्हणून राखीव आहे. मात्र, त्या क्षेत्रातच झोपड्या निर्माण होत आहेत. त्या कमी होण्यासाठी विकसकांना एफएसआय वाढवून दिला पाहिजे. तसेच व्यवसायवृद्धीसाठी 5 एफएसआय दिला पाहिजे. फायनान्स, आयटी, टुरिझम अशा क्षेत्रांत जादा एफएसआय दिल्यास रोजगारनिर्मिती वाढेल,” असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला.

रस्त्याशिवाय विकास नाही
“शहराच्या विकासात रस्त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे,” असे विशद करताना परदेशी म्हणाले की, “रस्त्याशिवाय विकास नाही. शहराचे 18 टक्के क्षेत्र सार्वजनिक रस्त्यांसाठी आवश्यक आहे. मात्र, मुंबईत रस्त्यांसाठी जागा नाही. त्यामुळे कोस्टल रोड आवश्यक आहे. कोस्टल रोडमुळे रस्त्यांचे पर्सेंटेज वाढेल. सार्वजनिक रस्ते हे शहराचा आत्मा असतात. रस्त्याखालील सेवासुविधाही महत्त्वाच्या असतात. रस्त्यांसाठी दीर्घकाळाच्या उपाययोजना शोधणार, रस्त्याशिवाय विकास नाही,” असे त्यांनी नमूद केले.

मुलगा नक्की करतो काय?
आपला मुलगा राज्याचा सचिव होता, पालिकेचा आयुक्त आहे, पण नक्की काम काय करतो, हे जाणून घेण्यासाठी परदेशी यांच्या मातोश्री मंगला परदेशी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित होत्या. त्यांचा लोकमान्य सेवा संघातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रवीण परदेशी यांना लोकमान्य सेवा संघाचे मानद सदस्यपद बहाल करण्यात आले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@