कारशेडवर न्यायालयाकडून स्थगिती नाहीच, वाचा सविस्तर ...

    05-Oct-2019
Total Views | 68



'स्थगिती दिल्यास प्रकल्प लांबणीवर पडेल आणि त्याचा एकंदर खर्चावर परिणाम होईल'

मुंबई (प्रतिनिधी) : बहुचर्चित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी निकालात काढल्या. कांही गैर-शासकीय संस्थांनी याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुंबई मेट्रोकडून कारशेडच्या कामास रात्रीच सुरवात झाली. आज शनिवार ५ ऑक्टोबर रोजी याचिकाकर्ते स्थगितीसाठी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. पण तिथेही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 

आज शनिवारी न्या. धर्माधिकारी आणि न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठापुढे पर्यावरणवाद्यांनी तातडीने सुनावणीची विनंती केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती तोंडी स्वरुपाची आहे. 'मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत' , असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मुंबई मेट्रोच्या वतीने विधीज्ञ अक्षय शिंदे यांनी युक्तिवाद केला. स्थगिती दिल्यास प्रकल्प लांबणीवर पडेल आणि त्याचा एकंदर खर्चावर परिणाम होईल, जे कि जनहिताच्या विरोधात असेल. 

न्या. धर्माधिकारी आणि न्या. मेनन यांनी कोणतीही स्थगिती देण्यास नकार दर्शवला. उच्च न्यायालयाचे अभिलेख (रेकोर्ड) पाहता झाडे छाटणी पासून मुंबई मेट्रोला थांबवल्याचे कुठेही दिसत नाही. ज्या प्रश्नावर न्यायालयाने एकदा विस्तृत सुनावणी घेतली आहे त्यावर पुन्हा तोंडी विनंतीच्या आधारे कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही. अशी कारणमीमांसा देत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. 
जवळपास गेल्या पंधरा दिवस मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु होती. मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या न्यायपीठासमोर हि सुनावणी झाली होती. कथित पर्यावरणवाद्यांना स्वतःची बाजू मांडण्याचा पुरेसा वेळ देण्यात आला होता. मात्र याचिकाकर्त्यांना कोणताही युक्तिवाद कायद्याच्या कसोटीवर टिकवणे जमले नव्हते.
सरकारच्या वतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली होती. याचिकाकरते व सरकार दोघांची बाजू ऐकून घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकालपत्र जाहीर केले. त्यानंतर रात्रीच मुंबई मेट्रोच्या वतीने आरेमधील प्रस्तावित जागेवर काम सुरु केले होते. काही मंडळींनी मेट्रोच्या कामाला आडकाठी करण्याचा प्रयत्न केला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121