मुमक्का पोस्ट पुणे कसबा पेठ. स्थळ केसरीवाडा. हे घर आहे भाजप उमेदवार मुक्ता टिळक यांचे. लोकमान्य टिळकांच्या घरातील पणतसून, पुण्याच्या विद्यमान महापौर. ‘मुंबई तरुण भारत लाईव्ह’ने त्यांची भेट घेतली, ते त्यांचे शहरासंदर्भात काय विचार आहेत ते समजून घेण्यासाठी.
“कसबा पेठेतून विधानसभेची उमेदवारी मिळाल्यावर काय वाटतंय?, समोर कोणती आव्हाने आहेत?,” असे विचारल्यावर विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांनी वर्षानुवर्षे हा मतदारसंघ बांधून ठेवलेला असल्याने माझ्याकडून नागरिक आता तशाच उत्तम कामाची अपेक्षा ठेवत आहेत. साहजिकच याचे दडपण असले तरी हे आव्हान चांगले आहे. याशिवाय टिळक कुटुंबीयांना या निमित्ताने न्याय मिळाला आहे, असेही वाटते.”
“कसबा पेठ हा मूळ गावठाणाचा भाग आहे. प्राचीन वाडे, अरुंद रस्ते आणि मोडकळीस आलेल्या इमारती, अशी मूळ मुंबईसारखीच इथे स्थिती आहे. आमदार म्हणून इथल्या समस्यांवर काय उपाय आहेत?” असे विचारता मुक्ता टिळक यांनी सांगितले की, “जुने पुणे या भागात येते. त्यात प्राचीन वाडे, पेशवेकालीन इमारती जागतिक वारसा इमारती आहेत. जुन्या पुण्याचा देदीप्यमान इतिहास या वाड्यांच्या रूपानेच लोकांना दिसतो. या सर्व वारशांचे जतन, संवर्धन झाले पाहिजे. मी महापौरपदाच्या काळात गुजरातच्या वैशिष्ट्यपूर्ण धोरणांचा व योजनेचा अभ्यास करून ‘हेरिटेज पुणे’ ही योजना तयार केली आहे. हे हेरिटेज क्षेत्र म्हणून विकसित करताना वाड्याच्या मूळ मालकांना काही सुविधा देणे, जे वाडे पूर्ण मोडकळीस आले, त्यांना जास्तीचे चटई क्षेत्र देऊन त्यांचे योग्य व नीट पुनर्वसन करणे, अशा गोष्टी केल्या तर वारसा सांभाळतानाच नवीन विकास करणे शक्य आहे. महापौर म्हणून पुण्याची ओळख जपण्यासाठी आणलेली ही योजना आगामी काळात राज्य सरकारच्या मदतीने पूर्ण करू, असा विश्वास आहे.”
“शहराच्या मध्यातून जाणारी मुठा नदी, त्या पात्रातून जाणार्या रस्त्याचे गेली काही वर्षे पूर्णत्वास न गेलेले काम, लक्ष्मी रस्ता रविवार पेठ यासारख्या बाजारपेठा, त्यात मेट्रोचे सुरू असलेले काम यामुळे निर्माण झालेला वाहतुकीचा प्रश्न. आमदार म्हणून यावर काय उपाय आहेत?” असे विचारता त्या म्हणाल्या की, “बाजारपेठ भाग, अरुंद रस्ते यामुळे वाहतुकीची समस्या मोठी आहे. बाजारपेठेमुळे ट्रक-टेंपोसारखी मोठी वाहने खूप येतात. त्यामुळे आगामी काळात पार्किंगची समस्या वेगाने सोडवणे, यावर आमचा आता भर असेल. नागरिकांना पार्किंगच्या जास्तीत जास्त सुविधा आम्ही देऊ.”
“लोकमान्य टिळकांचा वारसा तुमच्या पाठीशी आहे. तुमचे माहेरदेखील सामाजिक कार्यात आहे. हा वारसा कसा पुढे चालवणार?” यावर विचारता मुक्ता टिळक म्हणाल्या की, “मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले. खर्या अर्थाने सामाजिक कामाची प्रेरणा मला सासरकडूनच मिळाली, असे म्हटले पाहिजे. मात्र जनसंपर्क आणि होता होईल तेवढे समाजासाठी करणे, याचे संस्कार मला माहेरी मिळाले होते.” “टिळक राष्ट्रवाद मानणारे नेते होते. त्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात. भाजपदेखील राष्ट्रवादाचे राजकारण करतो. भावी आमदार म्हणून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे तुम्ही कसे पाहताय?”
“नक्कीच, टिळकांचे विचार घेऊन पुढे जात आहोत. उदा. 370 कलम रद्द करणे. टिळकांच्या विचारानुसार राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण हादेखील टिळकांच्या चतु:सूत्रीमधला महत्त्वाचा विषय होता. स्वदेशी, स्वभाषा या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिले होते. आत्ता ‘स्कील इंडिया’च्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून हे सगळं पुढे चाललं आहे. नोटाबंदीवर विरोधकांनी खूप चर्चा केली. पण मला असं वाटतं की, टिळकांच्या चतु:सूत्रीतला जो चौथा मुद्दा होता - काळ्या पैशांवरच्या बहिष्काराचा, तो त्यातून पूर्ण झालाय. हा काळा पैसा सरकारच्या तिजोरीत येऊ शकला. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाची कामे, उदाहरणार्थ नदी सुधार, रस्तेबांधणी, उद्योग उभारणी, संरक्षण क्षेत्रातील काही विशेष बाबी या गोष्टी शक्य झाल्या आहेत.
“पुणे शहराच्या तुम्ही महापौर आहात. त्यामुळे तुम्हाला या शहराच्या समस्यांची चांगली जाण आहे. साहजिकच काही अडचणीही आल्या असतील. विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही या समस्यांवर कसा मार्ग काढणार आहात?,” असे विचारता त्या म्हणाल्या की, ‘’नगरसेवक आणि महापौर यांची कामे ही शहराशी निगडित असतात. उदा. कचर्याचा प्रश्न. मात्र जेव्हा आपण विधानसभेत जातो तेव्हा विचारात घेतल्या जाणार्या प्रश्नांचे स्वरूप हे अधिक व्यापक असते. उदा. शिक्षकांचा प्रश्न असेल किंवा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न असेल. हे विषय शहराच्या थेट पायाभूत सुविधांशी संबंधित नसतील पण नागरिकांच्या आयुष्याशी संबंधित असतात, धोरणांशी संबंधित असतात. या धोरणांचा अभ्यास करणे, सुधारणा करणे हे अधिक अपेक्षित असते. मात्र, शहराच्या समस्यांची माहिती खोलवर असल्याने धोरणांवर चर्चेत भाग घेताना त्याचा निश्चित उपयोग होतो.”
“मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने मांडत असतात की, नागरी विकासाकडे, आपल्या शहरांकडे आपलं पूर्वापार दुर्लक्ष झालं आहे. तुमचा काय अनुभव आहे?” असे विचारता मुक्ता टिळक म्हणाल्या की, “बरोबर आहे. माझ्या असे लक्षात आले की, 1966 च्या विकास योजनेपासून (डेव्हलपमेंट प्लान) पुणे शहराभोवतीच्या रिंग रोड म्हणजे वर्तुळाकार मार्गाचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. मी तो प्रश्न घेऊन 2017 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे गेले, तेव्हा त्यांनी तातडीने त्यात लक्ष घातले. मला सांगायला आनंद होतो आहे की, हा पूर्ण 36 किमी. चा वर्तुळाकार मार्ग प्रकल्प आता निविदा प्रक्रियेपर्यंत आला आहे. यातील 18 किमी. ची जागाही आमच्या ताब्यात आली आहे. हा पूर्णपणे उन्नत मार्ग असेल. लवकरच हा मार्ग पूर्ण होईल. मला वाटतं की, या प्रकारच्या विकासामुळे शहरात रोजगार तयार होण्यास मदत होते. चांगला रोजगार तयार झाला तर शहरांच्या अर्ध्या समस्या संपतात. कारण रोजगार नसेल तर अतिक्रमणे तयार होतात. अतिक्रमणातून गुंडगिरी तयार होते. गुन्हेगारांना थारा मिळतो. त्यातून दहशतवाद्यांनाही आश्रय मिळू शकतो. केवळ पायाभूत सुविधा आणि त्यातून चांगला रोजगार निर्माण करण्यातून इतक्या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो. छोटी शहरेसुद्धा यादृष्टीने नीट नियोजित केली गेली पाहिजेत, हा मुख्यमंत्र्यांचा आग्रह बरोबरच आहे.”
“आजच्या राजकारणात महिला उमेदवारांची संख्या अजूनही कमी आहे. एक महिला उमेदवार, यशस्वी राजकारणी म्हणून तुम्हाला याविषयी काय वाटते?,” असे विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या की, “सर्वच पक्षात अशी स्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, भाजपच्या बाबतीत मी हे निश्चित सांगू शकते की, पक्षाच्या पातळीवर सर्व ठिकाणी महिलांना 33 टक्के आरक्षणांचा नियम पाळला जातो. पुढच्या काळात उमेदवारीतही अशी संधी मिळेल, अशी आशा आहे. मात्र, माझ्या स्वत:च्या बाबतीत मला वाटतं की, महिला असण्यापेक्षा माझ्या महापौर म्हणून केलेल्या कामाचा अधिक विचार केला गेला आहे. महिलांच्या प्रश्नांबाबत मला असं वाटतं की, खर्या अर्थाने समाज सुशिक्षित आणि प्रगत व्हायचा असेल तर महिलांच्या शिक्षण आणि आरोग्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
माझ्या भागात मुस्लीम महिला, झोपडपट्टीतल्या महिला, विडीकामगार महिलांची संख्या मोठी आहे. माझ्या सुदैवाने माझा महाराष्ट्रभर विविध क्षेत्रातील महिलांशी संबंध आला. त्यात उसतोडणी कामगार होत्या, तमाशा कलांवत होत्या. मी आनंदवनाशी संबंधित किंवा आंतरराष्ट्रीय कुष्ठरोगी संघटनेचे काम करताना अनेक लोकांशी माझा संबंध आला. त्यातून मला विविध क्षेत्रांतील महिलांचे प्रश्न समजत गेले. आता या भागाचाच विचार केला तर हा बाजारपेठेचा भाग आहे. मोठ्या प्रमाणावर महिला बाजारात खरेदीसाठी येत असतात. सर्वात मोठा प्रश्न आहे, तो महिलांच्या स्वच्छतागृहांचा. त्यामुळे दर एक किमीवर महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा संकल्प केला आहे.”
पुण्याच्या प्रश्नांचीच नव्हे तर एकूणच शहरांच्या आणि नागरीकरणाच्या प्रश्नांची सखोल जाण असणारी ही विदुषी आता कसबा पेठ या पुण्याच्या मूळ गावठाणातल्या मतदारसंघातून विधानसभेत जाणार आहे. निश्चितच नागरी समस्या दूर करून शहरी नागरिकांचे जीवन सुखी करण्यात मुक्ता टिळक यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीचा मोठा वाटा असणार आहे. बनचुक्या राजकारण्यांच्या सभागृहात लोकमान्य टिळकांच्या घरातील एका अभ्यासू विदुषीचा प्रवेश राजकारणात बरंच काही बदलवणारा ठरणार आहे.