‘सडा’: एक परिसंस्था

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2018   
Total Views |




कोकणातील ‘सडे’ ही एक परिवर्तनशील परिसंस्था आहे. त्यांची रूपं सतत बदलत असतात. उन्हाळ्यात करड्या गवताच्या अक्राळविक्राळ दाढीमिशा वाढलेली काळीकुट्टं कातळं पावसाळ्यात विविधरंगी फुलांचं भरतकाम केलेला हिरवा शालू नेसतात. मानवी अतिक्रमणं थोपवून ‘ही’ मौल्यवान परिसंस्था टिकवणं, काळाची गरज आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

मला गुरं चरायला घेऊन जायला फार आवडतं. त्याचं कारण म्हणजे, पावसाळ्यात कोकणातल्या गवताळ सड्यांवर गुरं नेली की, ती एखाद्या फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये गेल्याच्या अत्यानंदाने शेपटी मुरडत शांतपणे चरत राहतात आणि आपल्याला मस्तपैकी दुर्बीण-कॅमेरा घेऊन एका दगडावर बसून आजूबाजूच्या निसर्गसृष्टीचा आनंद घेत घेत ती अभ्यासता येते. वार्‍याने तानपुर्‍यावर षड्ज लावून धरलेला असतो... पक्षी आपापला गंधार-पंचम-निषाद लावत असतात... मध्येच पाऊस तालवाद्य सुरू करतो... असं सगळं संगीत जमून आलेलं असतं.

 

गवताळ ‘सड्यां’ना (Coastal Plateaus) कोकणात विशेष महत्त्व आहे. अर्थात, हे महत्त्व वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळ्या दृष्टींनी आहे. शहरात नोकरी करणारा एखादा पांढरपेशा ‘पडीक जमीन’ म्हणून त्याच्याकडे पाहील; शेतकरी ‘गुरांना चरायला उत्तम जागा’ म्हणून त्याच्याकडे बघेल; एखादा बिल्डर, तिथे किती प्लॉट्स पडतील आणि किती फार्म हाऊसेस बांधून, किती ‘कोटी’ खिशात टाकता येतील, याचा हिशोब करायला सुरुवात करेल; तर एखादा पर्यावरण अभ्यासक तिथली जैवविविधता अभ्यासायला लागेल. गेल्याच आठवड्यात १९ तारखेला रत्नागिरीची पर्यावरण तंत्रज्ञान संस्था आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे रानफुलांची माहिती देणारी छोटीशी निसर्गसहल रत्नागिरीच्या एका सड्यावर आयोजित केली होती. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. मंगल पटवर्धन आणि प्रा. शरद आपटे यांनी पावसाळ्यातल्या रानफुलांची उत्तम माहिती दिली. जैवविविधता ही फक्त जंगलातच नसते, तर ती अशा मोकळ्या सड्यांवरही नांदत असते, हे पावसाळ्यात सड्यांवर भटकताना मनोमन पटतं. फक्त त्यासाठी ‘मान खाली घालावी’ लागते. ‘सडेसौंदर्य’ माणसांना मान खाली घालायला लावतं. एक प्रकारे ते Down to Earth चा संदेश देत असतं. ही रानफुलं गुलाब, मोगरा, सोनचाफा, अनंत या पाळीव फुलांसारखी सुगंधी नसतात; परंतु सुंदर मात्र असतात. शिवाय ही सर्व अल्पजीवी (Ephemeral) या गटात मोडतात. पावसाळ्यातले काही दिवसंच ही फुलं उगवतात, त्यांच्या बिया जमिनीवर पडून राहतात आणि त्या थेट पुढील पावसाळ्यात रुजतात. कीटकांना आणि मधमाशांना या दिवसांत जणू जेवणावळ वाढलेली असते.

 

सध्या हे ‘सडे’ पिवळ्या रंगाचं वधूवस्त्र नेसू लागले आहेत. सूर्यफुलाच्या कुळातील अत्यंत मनमोहक अशी सोनकीची फुलं (Senecio grahami) फुलू लागली आहेत. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या फुलांनी अख्खे सडेच्या सडे पिवळेधमक दिसायला लागतात. या फुलांचे घोस गणपतीच्या सजावटीसाठी वापरतात. सोनकीसारखीच मनमोहक निळी पापणी (utricularia reticulata) ही बिनपानाची कीटकभक्षी वनस्पती सडेसौंदर्यात भर घालते. या वनस्पतीला ‘सीतेची आसवं’ असंही म्हणतात. तुतारीची फुलं (Rhamphicarpa longiflora) ही पांढर्‍या रंगाची असतात आणि ती संध्याकाळी उमलतात. निळ्या पापणीच्या सहवासातच वाढणारी इरियोकोलन (Eriocaulon) ही पांढर्‍या ठिपक्यासारखी दिसणारी फुलं सड्याची शोभा वाढवतात. या वनस्पतीचे जगभरात ४०० प्रकार असून त्यांपैकी सुमारे १५ प्रकार कोकणात आढळतात. ‘गवती दवबिंदू’ (drosera indica) ही गुलाबी रंगाची बारीकशी फुलं असलेली आणखी एक कीटकभक्षी वनस्पती गवतात मध्येमध्ये दिसते. एकदांडी (ऊळलिरवळ लेपलरपशपीश) ही पांढरीशुभ्र, किंचित लांबडी फुलं असणारी वनस्पती फक्त कोकणातील काही ठराविक सड्यांवरच पाहायला मिळते. Camptorhiza indica हीसुद्धा रत्नागिरीतली प्रदेशनिष्ठ (Highly Endemic) वनस्पती आहे. Neanotis foetida या वनस्पतीची अगदी बारीक टिकलीएवढी चार पाकळ्यांची फुलं जमिनीच्या अगदी लगत उगवलेली असतात आणि त्यांच्यावर पुष्कळ संख्येने मधमाशा घोंघावताना दिसतात.

 
नवरात्रात घराच्या दारावर ज्यांचे घोस बांधतात, ती ‘कुर्डू’ची फुलं (Celocia argentea) आता सड्यांवर फुलू लागली आहेत. तीन पाकळ्यांची आकाशी रंगाची Murdannia semiteres, गुलाबी रंगाची दोन पाकळ्यांची जमिनीलगत दिसणारी ढाल गोधडी (indigofera dalzellii), गडद लाल-मातकट रंगाच्या जाड देठातून डोकं वर काढणारी बंबाकू (Striga generioids), चार पाकळ्यांची जांभळी चिरायत (Exacum pumilium), तशाच आकाराची गुलाबी रंगाची युफोर्बिया (Euforbia), रस्त्याच्याकडेला हळदव्या रंगाची दिसणारी कवळा (Smithia sensitiva) अशी कितीतरी रंगीबेरंगी रानफुलं सड्यावरून चक्कर टाकताना नजरेस पडतात. सड्यावरून फिरत फिरत थोडं झुडुपी भागात आलो की, थोडी मोठ्या आकाराची आकर्षक रंगांची पावसाळी रानफुलं पाहायला मिळतात. तेरडा (Impatiens balsmina), पेंडगुळ (Ixora coccinea), मुरुडशेंग (Helicteres isora), टाकळा (cassia tora), रानभेंडी (Abelmoschus manihot), पुनर्नवा (Boerhavia diffusa), भारंगी (Clerodendrum serratum याच्या फुलांची भाजी करतात), रानतीळ (Sesamum orientale), कोष्ठ (Costus speciosus), अग्निशिखा/कळलावी (Gloriosa superba), काटली (Momordica dioica) याच्या फळांची भाजी करतात), वाघाटी (Caesalpinia crista)... बघावीत तितकी थोडी !
 

सजीवसृष्टीतला कुठलाही जीव हा निरुपयोगी नाही. ही रानफुलं जशी निसर्गसौंदर्यात भर घालतात तशीच ती कीटक-मधमाशांना मोठ्या प्रमाणात खाद्य पुरवून परिसंस्थेत खूप महत्त्वाची उत्पादक भूमिका बजावतात. सध्या कोकणात वाढलेल्या मानवी अतिक्रमणांमुळे अनेक वनस्पती त्यांचं उपयोगमूल्य माहीत होण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. एखाद्या सड्यावर एखादा कारखाना आला आणि त्यामुळे आजूबाजूच्या चार लोकांना रोजगार मिळाला, तर एकवेळ ठीक आहे. त्याला ‘विकास’ म्हणता येईल; पण उगाच मनात आलं म्हणून वा पैसा भरपूर आहे म्हणून सड्यावरच्या जमिनी विकत घ्यायच्या; त्याला कुंपण घालायचं, वणवे लावून मूळचं सगळं रान-झुडूप जाळून टाकायचं, सुरूंग लावून कातळं फोडायची, तिथे आंबा-काजूची कलमं लावायची, त्यांना पाणी घालण्यासाठी बोअरवेल्स खणायच्या आणि मग हे सगळं तोट्यात जातंय, असं लक्षात आल्यावर पाटावर वड्या पाडतात, तसे जमिनीचे प्लॉट्स पाडून ते विकायला काढायचे, असे उपद्व्याप सध्या कोकणात ‘प्रतिष्ठा’ पावले आहेत. यात निसर्गाचा र्‍हास होतोच, पण माणसाला तरी काही फायदा होतो का? ‘सडे’ ही कोकणातली अत्यंत मौल्यवान परिसंस्था या मानवी उपद्व्यापांचा बळी ठरत आहे. त्यामुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळणारे कोकणातील सडे निवडून ते संरक्षित करणं, ही काळाची गरज आहे.

 

आता, मुद्दा असा येतो की, ‘संरक्षित करणं’ म्हणजे कुंपण घालणं का? तर नाही ! गुरं आणि इतर प्राण्यांचा वावर हाही सड्यावरच्या परिसंस्थेचाचं एक भाग असतो. मर्यादित गुरेचराईमुळे बेसुमार वाढणारी गवतं आपोआप नियंत्रणात राहतात आणि त्यामुळे इतर वनस्पतींना वाढायला आणि फुलायला वाव मिळतो. त्यामुळे सड्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना कुंपण घालून बंदिस्त करणं हेही योग्य नाही. तसंच पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली इथे झाडं लावणं, हेही चुकीचं आहे. ‘सडे’ हे ‘सडे’चं राहिले पाहिजेत. आपण काहीही न करणं, हेच निसर्गासाठी खूप काही करण्यासारखं आहे!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@