ते पंधरा दिवस : १२ ऑगस्ट, १९४७

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2018   
Total Views |
 
 
 
मंगळवार. १२ ऑगस्ट.  आज परमा एकादशी.

यंदाचा अधिक मास, श्रावण महिन्यात आलेला आहे. या अधिक मासात आलेल्या एकादशीला परमा एकादशी म्हणतात.

कलकत्त्या जवळच्या सोडेपूर आश्रमात, गांधीजींच्याबरोबर थांबलेल्या लोकांमध्ये परमा एकादशी करणारे दोघे / तिघेच आहेत. त्यांच्यासाठी खास फराळाची व्यवस्था होतेय. गांधीजींच्या मनात मात्र काल रात्रीची सुह्रावर्दी बरोबरची भेटच घोळतेय.
 
शहीद सुह्रावर्दी. याच्या नावातल्या ‘शहीद’ चं ‘बलिदानाशी’ काहीही घेणं – देणं नाही. असलंच तर ‘इतरांचा जीव घेण्याशी’ हा संबंध असू शकतो. १९४६ च्या ‘डायरेक्ट एक्शन डे’ चा खलनायक, सुह्रावर्दी, त्या घटनेच्या एका वर्षानंतर गांधीजींना भेटायला येतो. ‘डायरेक्ट एक्शन डे’ च्या दिवशी अत्यंत क्रूरतेनं आणि बर्बर्तेनं कापून काढलेल्या पाच हजार हिंदूंच्या हत्येचं पाप, हा आपल्या भाळी मिरवतोय. अत्यंत धूर्त, स्त्रीलंपट, व्यसनी आणि क्रूर असणारा सुह्रावर्दी, प्रत्यक्षात मात्र सुशिक्षित आणि सभ्य गृहस्थ वाटतो. तो अत्यंत टापटिपीने पोशाख करतो. कट्टर मुसलमान असला तरी या बाबतीत मात्र तो इंग्रजाळलेला आहे.
आज गांधीजींच्या प्रातः प्रार्थनेला बऱ्यापैकी गर्दी आहे. काही पत्रकारही समोर बसलेले दिसताहेत.
भजन आणि थोडी सूतकताई झाल्यानंतर गांधीजी बोलू लागतात,
 

“दोनच दिवसानंतर येणारा पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस ठरणार आहे. मी असे ऐकले आहे की कलकत्त्यातले काही मुसलमान हा दिवस ‘शोक दिवस’ म्हणून साजरा करणार आहेत. ही बातमी खोटी असेल अशी मी आशा करतो. अर्थात हा दिवस कसा साजरा करायचा, याबाबत प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असेल. आणि आपण कोणावरही, हा दिवस विशिष्ट पध्दतीने साजरा करण्याची बळजबरी करू शकणार नाही. आता प्रश्न असा की, पाकिस्तानच्या हिंदूंनी १५ ऑगस्ट ला काय करावे..? माझे उत्तर असेल, त्यांनी पाकिस्तान च्या राष्ट्र ध्वजाला प्रणाम करावा.”

“मी असंही ऐकलं आहे की पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीत (अर्थात गोवा, दमण, दीव, पाण्डीचेरी येथील) राहणारे भारतीय, पंधरा ऑगस्ट ला स्वतंत्रतेची घोषणा करणार आहेत. हा संपूर्णपणे अविचार आहे. आम्हां भारतीयांना माज आलाय, असा याचा अर्थ होईल. ब्रिटीश भारत सोडून जाताहेत. फ्रेंच किंवा पोर्तुगीज नाही. मी हे मानतो के त्या वसाहतीतले भारतीय आज ना उद्या निश्चित स्वतंत्र होतील. पण आज त्यांनी कायदा हातात घेणे योग्य नाही.”

“काल रात्री शहीद सुह्रावर्दी साहेब मला भेटायला आले होते. त्यांनी मला म्हटले की अश्या अशांत परिस्थितीत मी कलकत्ता सोडून जाणे योग्य नाही. त्यांनी मला विनंती केली आहे कि मी कलकत्त्यातला माझा मुक्काम वाढवावा आणि जोपर्यंत खरी शांतता नांदत नाही, तोपर्यंत येथेच राहावे.”

“मी सुह्रावर्दी साहेबांना, एका अटीवर त्यांची विनंती मान्य करण्याचे म्हटले आहे. ती अट म्हणजे, कलकत्त्यातल्या एखाद्या अशांत जागी, सुह्रावर्दी साहेबांनी एका छताखाली माझ्याबरोबर राहावे, आणि त्या जागेला पोलीस किंवा सैन्याचे संरक्षण नसावे. पुढील एक – दोन दिवसात सीमा आयोगाचा निर्णय घोषित होईल आणि विभाजनाची निश्चित रेषा स्पष्ट होईल. अश्या वेळी हिंदू आणि मुसलमान, दोघांनीही त्या आयोगाचा सन्मान करणे आवश्यक आहे.”.

____ ____ ____ ____

श्रीनगर.
 
आणि काश्मीर च्या महाराजांनी, त्यांचे प्रधानमंत्री रामचंद्र काक यांना बर्खास्त केले. फक्त दोन वर्षांचा त्यांचा प्रधानमंत्री म्हणून असलेला कार्यकाल फारच वादग्रस्त ठरला. जवाहरलाल नेहरू आणि कॉंग्रेस यांच्याशी त्यांनी उघड शत्रुत्व पत्करलं होतं.
 
काही महिन्यांपूर्वी, जेंव्हा आपल्या १९ ते २३ जून च्या भेटीत माउंटबेटन यांनी श्रीनगर मधे महाराजांना सुचना केली होती की काश्मीर चे विलीनीकरण पाकिस्तानात करा, तेंव्हा महाराजांनी ती सूचना सपशेल फेटाळून लावली होती. नंतर काक महाशयांनी ही भूमिका घेतली की काश्मीर चे विलीनीकरण जर पाकिस्तानात होणार नसेल तर ते भारतातही होणे योग्य नाही. काश्मीर स्वतंत्र राहील. तसा सल्ला त्यांनी महाराजांना दिला.
 
 
 
 
 
 
 
नऊ / दहा दिवसांपूर्वीच्या आपल्या श्रीनगर भेटीत गांधीजींनी जर ही स्पष्ट भूमिका घेतली असती की ‘काश्मीर चा विलय भारतात व्हावा’, तर कदाचित गोष्टी खूप सोप्या झाल्या असत्या. पण गांधीजींना भारत आणि पाकिस्तान ही त्यांचीच दोन अपत्ये वाटत असल्याने त्यांनी महाराजांना विलीनीकरणाबाबत काहीच सांगितलं नाही. फक्त ‘रामचंद्र काक ह्यांना काढा’, इतकंच सांगितलं.
त्याप्रमाणे दहा दिवसात महाराजा हरीसिहांनी त्यावर कृती केली आणि मूळ हिमाचल प्रदेशातले, पण महाराजांच्या नात्यातले, ‘जनक सिंह’ यांना काश्मीर चे नवीन प्रधानमंत्री म्हणून घोषित केले.
 
रामचंद्र काक यांनी पळून जायचा प्रयत्न केला. पण तो सफल झाला नाही. महाराजांनी त्यांना घरातच नजरबंद ठेवलंय. काश्मीर च्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरु झाला आहे...!
 
____ ____ ____ ____
 
दिल्ली.
 
भारत शासनाच्या कार्मिक मंत्रालयाचा आदेश प्रसिध्द झाला आहे. डॉ. जिवराज मेहता यांना ‘डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल सर्व्हिसेस’ म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
 
ब्रिटीश शासनाच्या दृष्टीने ही तशी ऐतिहासिक घटना आहे. कारण पहिल्यांदाच ‘इंडियन मेडिकल सर्व्हिस’ च्या बाहेरील एखाद्या डॉक्टर ला हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आलंय.
 
डॉ. जिवराज मेहता हे गांधीजींचे व्यक्तिगत डॉक्टर असून, गेल्या वीस वर्षांपासून ते गांधीजींच्या प्रकृतीची चिंता करीत आहेत.
____ ____ ____ ____
 
पांडिचेरी.
 
फ्रेंच शासनानं आज बैठका, सभा आणि रैलींवर लावलेली बंदी उठवली. या संदर्भात अटक झालेल्या लोकांना लवकरच सोडण्यात येईल, अशीही घोषणा झाली.
 
काल, पॅरिस हून परतल्यावर कलकत्ता येथे, भारतातील फ्रेंच गव्हर्नरांनी आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी गांधीजींची भेट घेतली आणि त्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. या घोषणेचा अंमल पांडिचेरी बरोबरच माहे आणि चंदननगर येथेही होईल.
____ ____ ____ ____
 
 

 
 
 दंगलीत मरण पावलेली व्यक्ती
 
 
लाहौर.
 
काल रात्रीपासून उसळलेल्या दंग्यांनी आता रौद्र रूप धारण केलंय. काल कोणीतरी मुद्दाम बातमी उठवली की रेडक्लिफ च्या सीमा आयोगाने लाहौर हे भारतात शामिल करण्याचं ठरवलंय.
 
झालं. मुस्लिम नेशनल गार्ड तर संधीची वाटच पाहात होते. त्यांची पूर्ण तयारी झालेली होती. त्यातून या बातमीने सामान्य मुसलमान खवळून उठला. काल रात्रीपासूनच जाळपोळीला सुरुवात झाली. काही भागांमधे संघाच्या स्वयंसेवकांनी अद्भूत आणि अतुलनीय शौर्य दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. खुद्द संघाचं कार्यालय हिंदू बहुल वस्तीत असुनही, ‘त्यावर मुस्लिम नेशनल गार्ड चे कार्यकर्ते आक्रमण करणार’ ही बातमी मिळाल्यामुळे बरेच स्वयंसेवक कार्यालयाच्या रक्षणासाठी तिथे ठिय्या देऊन उभे राहिले.
 
आज सकाळी दहा वाजे पासून मुस्लिम गुंडांचं हे आक्रमण अधिक तीव्र झालं. त्यातून शीख हे सहज ओळखू येत असल्यामुळे शिखांवर जास्त हल्ले झाले. डिप्टीगंज ह्या हिंदू – शीख बहुल भागात सकाळी ११ वाजता, एका प्रौढ शीख माणसाचा, मुस्लिम गुंडांनी भर रस्त्यावर कोथळाच बाहेर काढला. रस्त्यावर तडफडत, तो शीख, अवघ्या चार – पाच मिनिटातच नेहमी करता शांत झाला...!
 
अत्यंत भयंकर आणि पाशवी शक्तींचा नाच, लाहौर च्या रस्त्यांवर चालला होता. दुपारी तीन पर्यंत अधिकृत रित्या मेलेल्या लोकांची संख्या होती पन्नास. त्यातील जवळपास सर्वच हिंदू आणि शीख होते. जे हॉस्पिटल मधे भरती होण्याइतके सुदैवी होते, त्यांच्या जखमा इतक्या विचित्र, भयानक आणि आत खोलवर गेलेल्या होत्या की डॉक्टर आणि नर्सेस सुध्दा एकेका पेशंट बरोबर अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होते. दुपार पर्यंत लाहौर च्या दंग्यांचे हे लोण गुरुदासपुर आणि लायलपुर पर्यंत पोहोचले.
 
शेवटी दुपारी चार वाजता गव्हर्नर जेनकिन्स ने लॉर्ड माउंटबेटन ह्यांना टेलिग्राम पाठवला की “लाहौर आणि अमृतसर च्या पोलिसांवर विश्वास ठेवता येत नाही. मुस्लिम नेशनल गार्ड चे कार्यकर्ते पोलिसांच्या वर्दीत दंगे करताहेत. परिस्थिती नियंत्रणात नाही.”
 
लाहौर जळत होतं. लाहौर बरोबर अवघं पंजाब पेट घेत होतं. पण दिल्लीतल्या सत्ताधीशांना त्याचं फार काही सोयर सुतक दिसत नव्हतं..!
____ ____ ____ ____
 
कलकत्ता. दुपारी दोन वाजता.
 
कलकत्ता बंदरावरच्या अडीच लाख मुस्लिम खलाश्यांच्या वतीनं एक पत्रक प्रकाशित करण्यासाठी देण्यात आलंय.
 
या पत्रकाद्वारे, मुस्लिम खलाश्यांच्या ह्या संघटनेनं धमकी दिलेली आहे की जर ‘कलकत्ता हे पाकिस्तान ला जोडल्या गेलं नाही, तर आम्ही अनिश्चितकालीन हडताल करू’. यात म्हटलंय की सन १६९० साली, हे कलकत्ता बंदर बांधण्यापासून ते मुस्लिमांच्या ताब्यात आहे. त्यामुळे हिंदू बहुल पश्चिम बंगाल ला ते देणं हे कोणत्याही अर्थाने उचित ठरणार नाही..’
____ ____ ____ ____
 
कलकत्ता. सोडेपूर आश्रम. दुपारी दोन वाजता.
 
आश्रमात गांधीजी वामकुक्षी घेताहेत. त्यामुळे अखंड बंगाल चे ‘प्रधानमंत्री’, हुसैन शहीद सुह्रावर्दी यांच्या कडून आलेल्या कलकत्त्याच्या पूर्व महापौर, उस्मान ह्यांना वाट बघत बसणं क्रमप्राप्त आहे.
 
तीन वाजता उस्मान यांची गांधीजींबरोबर भेट झाली. उस्मान यांनी शहीद सुह्रावर्दींचं पत्र सोबत आणलंय, ज्यात सुह्रावर्दींनी, गांधीजींबरोबर राहण्याचा प्रस्ताव मान्य केलाय. पत्र वाचताना, चष्म्याच्या आत लुकलुकणारे गांधीजींचे डोळे आनंदाने चमकत होते. अनेकांनी गांधीजींना सांगितलं होतं की सुह्रावर्दी हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. हा अत्यंत बदमाश माणूस आहे. मात्र एखाद्या बद्दल असं मत बनविणं गांधीजींना मंजूर नव्हतं. म्हणून त्यांनी बरोबर राहण्याचा हा प्रयोग करून बघण्याचे ठरविले.
____ ____ ____ ____
 
 

 
 
कॉंग्रेस अध्यक्ष - आचार्य जे. बी. कृपलानी 
 
 
कराची. दुपारी तीन वाजता.
 
आता काहीच दिवसांसाठी शिल्लक राहिलेल्या कराची च्या कॉंग्रेस कार्यालयातून एक प्रेस नोट, वर्तमानपत्रांकडे पाठवायला तयार झाली आहे. ही प्रेस नोट, कॉंग्रेस चे अखिल भारतीय अध्यक्ष आचार्य जे. बी. कृपलानी यांची आहे.
 
आचार्य कृपलानी स्वतः कराचीत उपस्थित आहेत. पण त्यांच्या भेटीचं कसलंच चैतन्य कॉंग्रेस कार्यालया मधे किंवा शिल्लक राहिलेल्या थोड्या फार कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जाणवत नाहीये.
 
या प्रेस नोट मधे, आचार्य कृपलानी ह्यांनी, काल लियाकत अली खान ह्यांनी त्यांच्यावर आणि कॉंग्रेस पक्षावर लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. “काल लियाकत अली खान यांनी माझ्यावर आरोप केलाय की मी सिंध मधील हिंदूंना भडकवतोय आणि त्यांना सरकारशी विद्रोह करण्यासाठी उद्युक करतोय. मी ह्या आरोपाचे पूर्ण खंडन करतो.”
 
“मी काही सभांमध्ये या घोषणेचा उल्लेख केला, ज्यात म्हटले होते, ‘हंसके लिया हैं पाकिस्तान, लड़के लेंगे हिन्दुस्थान’. या संदर्भात मी हिंदू आणि मुसलमान या दोन्ही समूहांना अश्या प्रकारच्या घोषणा बंद करण्यास सांगितले आहे. अश्या घोषणा देणाऱ्यांना मी म्हटले की जर भारतीय सेना पाकिस्तान च्या सीमेवर पोहोचेल तर पाकिस्तान मधील हिंदूंना फार वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. तसेच, जर पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेजवळ पोहोचलं, तर भारतातील मुसलमानांची परिस्थिती फार वाईट होईल.”
 
“कॉंग्रेस ने अजूनही अखंड भारताची कल्पना सोडलेली नाही. मात्र ती शांततापूर्ण मार्गांनी व्हावी, असा आमचा प्रयत्न राहील.”
____ ____ ____ ____
 
 
 
 
लॉर्ड माउंटबेटन 
 
 
दिल्लीतील गव्हर्नर हाऊस.
 
लॉर्ड माउंटबेटन यांचे कार्यालय. लॉर्ड साहेब त्यांच्या खास आरामखुर्चीवर टेकून, डोळे बंद करून, विचारमग्न बसले आहेत. त्यांना भारतातील इंग्रजी साम्राज्याचा विस्तीर्ण पट समोरून सरकत जाताना दिसतोय. आजच्याच दिवशी.. होय आजच्याच दिवशी, त्या काळच्या अखंड भारतात, इंग्रजांचं राजकीय प्रतिनिधित्व सुरु झालं. नेमकं सांगायचं तर १२ ऑगस्ट, १७६५. हीच ती ‘अलाहाबाद ची संधी’. इस्ट इंडिया कंपनी तर सन १६०० पासून आहे. तश्या अनेक संधी केलेल्या आहेत इंग्रजांनी, या आधी. मुगलांशी, विजापुरकरांशी, मराठ्यांशी, निझामाशी... अनेकांशी. पण ते सर्व तह, त्या सर्व ‘संधी’, व्यापारी स्वरूपाच्या होत्या. पहिल्यांदाच, बक्सर च्या युध्दानंतर, इंग्रजांनी राजकीय स्वरूपाचा तह केला तो मुगल बादशाह शाह आलम (दुसरा) बरोबर. अर्थात १८२ वर्षांपूर्वी...
 
तेंव्हा पासून तर आज पर्यंत, गंगेत बरंच पाणी वाहून गेलं. १८५७ सुध्दा होऊन गेलं. आज मात्र हे साम्राज्य फक्त दोनच दिवसांनी आपण या भारतीयांना सोपवणार आहोत..!
 
लॉर्ड साहेब भानावर आले. सध्यातरी भूतकाळात डोकावणं फार उपयोगाचं नाही. वर्तमान काळ जपला पाहिजे. लॉर्ड साहेबांनी एक अत्यंत महत्वाचा विषय पूर्ण करत आणलाय. आणि तो म्हणजे अखंड हिंदुस्थानाच्या सैन्याचं विभाजन. या द्वारे एयर फोर्स च्या दहा स्क्वाड्रन पैकी दोन पाकिस्तान ला तर आठ भारताला मिळतील. आर्मी आणि नेव्ही यांची विभागणी, दोन युनिट्स भारताला तर एक पाकिस्तान ला, या प्रमाणात करण्यात आली आहे.
 
मात्र एप्रिल १९४८ पर्यंत फिल्ड मार्शल सर क्लॉड आचिनलेक हेच दोन्ही देशांच्या फौजांचे सुप्रीम कमांडर राहतील. आणि लार्ड माउंटबेटन हे जॉइंट डिफेन्स काउंसिल चे चेअरमन असतील, हे माउंटबेटन यांनी जाहीर केलं.
____ ____ ____ ____
 
लंडन.
 
ब्रिटीशांच्या राजधानीतील भारतीय, स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाबद्दल फारच उत्साही आणि उत्तेजित झालेले आहेत. इंडिया हाऊस वर १५ ऑगस्ट ला दिमाखाने तिरंगा फडकणार आहे. या कार्यक्रमासाठी ब्रिटीश पंतप्रधान एटली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत, इंडियन हाय कमिशनर, कृष्ण मेनन. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल.
 
त्याचबरोबर लंडन मधे, अनेक सार्वजनिक ठिकाणी लहान लहान गटांमध्ये हा सोहळा साजरा होईल. सर्व भारतीय उपहारगृह (रेस्तरां), पंधरा ऑगस्ट ला तिरंग्याच्या रंगांनी सजवले जाणार आहेत. लंडन वेस्ट-एंड मधील भारतीय विद्यार्थी हा सोहळा ‘स्वराज हाऊस’ मधे साजरा करणार आहेत. इंडियन वर्कर्स असोसिएशन च्या भव्य सोहळ्यात प्रमुख वक्ते असतील, भारतातील समाजवादी चळवळीचे अर्ध्वयू, अच्युतराव पटवर्धन.
 
भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी १४ ऑगस्ट च्या रात्री सव्वा अकरा वाजता, सिंगापुर च्या नॉर्थ रिज रोड वरील ‘रॉयल टॉकीज’ मधे ‘धरती’ ह्या हिंदी चित्रपटाचा खास शो होणार आहे. मुमताज शांती आणि त्रिलोक कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट, इतरत्र चांगलाच लोकप्रिय ठरला आहे.
____ ____ ____ ____
 
कलकत्त्याच्या बेलियाघाटा मधली हैदरी मंझील..!
 
शहीद सुह्रावर्दी बरोबर एका छताखाली राहण्यासाठी, गांधीजींसाठी निवडलेले ठिकाण. मुळात ही इमारत एका इंग्रज व्यापाऱ्याची होती. मात्र १९२३ साली पश्चिम भारताच्या शिया मुसलमानांपैकी दाऊदी बोहरा समाजाच्या लोकांनी काही जागा कलकत्त्यात विकत घेतल्या. त्यात ही ‘हैदरी मंझील’ पण होती. शेख आदम नावाच्या बोहरा व्यापाऱ्याने ही इमारत विकत घेतली. मृत्युपूर्वी ह्या शेख आदम ने ही जागा आपली मुलगी हुसैनीबाई बंगाली हिच्या नावे केली. मात्र सध्या ह्या जागेचा ताबा सुह्रावर्दी कडे आहे.
 
बेलियाघाटा हा तसा घाण आणि गचाळ परिसर. हिंदू – मुस्लिम संमिश्र वस्ती असलेला, पण मुस्लिम बहुल असा भाग. त्यातील ही इमारत सध्या ओसाड पडली होती. कोणीच येथे राहत नव्हतं. उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट होता.
 
मात्र उद्यापासून गांधीजी आणि सुह्रावर्दी येथे राहणार म्हणून या इमारतीची डागडुजी सुरु झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आणि कारागीर, संध्याकाळ पासून इमारतीला जरा चांगलं रूप द्यायला झटताहेत..!
____ ____ ____ ____
 
मुंबई.
 
दादर मधील ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या एका कार्यकर्तीचं घर. रात्रीचे साडेनऊ वाजताहेत. मात्र त्या प्रशस्त घरात, पस्तीस ते चाळीस सेविकांची बैठक चालूच आहे.
 
राष्ट्र सेविका समिती च्या प्रमुख संचालिका, लक्ष्मीबाई केळकर अर्थात ‘मावशी’, ह्या उद्या सकाळच्या विमानाने कराचीला जाताहेत. त्या संदर्भातच ही बैठक चाललेली आहे. सुमारे आठ – दहा दिवसांपूर्वी कराचीतल्या जेठी देवानी या सेविकेचं पत्र मावशींना मिळालं. त्या पत्रात, कराचीतील सेविकांच्या, त्यांच्या परिवारांच्या कठीण परिस्थितीचं वर्णन होतं. ते वाचूनच मावशींनी निर्णय घेतला की सिंध प्रांतात, विशेषतः कराचीला भेट देऊन सेविकांची सर्व व्यवस्था लावलीच पाहिजे.
____ ____ ____ ____
 
खंडित स्वातंत्र्य फक्त ३ रात्री च्या अंतरावर आहे. सीमेवर अक्षरशः वणवा पेटलाय. पंजाब सारख्या प्रांतात तर प्रशासन ही गोष्टच शिल्लक नाही. कोंबड्यांसारखी माणसं मारली जाताहेत...
 
आणि तीन जून ची फाळणी स्वीकारणारं नेतृत्व, दिल्लीच्या राजकीय वातावरणात, चौदा ऑगस्ट च्या रात्रीची तयारी करतंय..!
 
 
मागील लेख तुमच्या वाचनातून राहिला असेल तर त्याची लिंक खालीलप्रमाणे : ११ ऑगस्ट १९४७ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@