परिसंवादात सामान्यांच्या प्रश्नांवर नितीन लढ्ढांचा काढता पाय

    26-Jul-2018
Total Views | 29

रोटरी क्लब जळगाव वेस्टने केले होते आयोजन

 
 
जळगाव, २६ जुलै :
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे गुरूवारी रोटरी हॉलमध्ये आयोजित सर्वपक्षीय परिसंवादात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना माजी महापौर नितीन लड्डा यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर प्रश्‍नांचा मारा सहन न झाल्याने आणि उपस्थितांचा वाढता रोष पाहून त्यांनी हॉलमधून काढता पाय घेतला.
 
 
या परिसंवादात मंचावर भाजपाचे आ.सुरेश भोळे, शिवसेनेतर्फे माजी महापौर नितीन लढ्ढा, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर, कॉंग्रेसतर्फे डॉ. राधेशाम चौधरी, रोटरी जळगाव वेस्टच्या अध्यक्षा संगीता पाटील, सचिव राजेश परदेशी आणि परिसंवाद प्रमुख गनी मेमन उपस्थित होते.
 
 
डॉ.राधेशाम चौधरी यांनी सत्ताधार्‍यांनी मूलभूत सुविधा आधी पुरवायला हव्या होत्या नंतर विमानतळ वगैरे करायला हवे होते असे सांगत शहराला वर्षभरात केवळ १०० दिवस पाणी पुरवठा होतो पण पाणीपट्टी मात्र ३६५ दिवसांची वसूल केली जाते असे सांगितले. शहरात विकास कामे लोकसहभागातून करणे लाजिरवाणी गोष्ट आहे. भाजपा आपले वजन वापरुन शहराचा विकास करु शकत होते पण तसे त्यांनी केले नाही. सेना-भाजपाचे भांडण देखावा असू शकतो. राजकारणात गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचे काम नेत्यांनी केले असे म्हणत आम्ही सत्तेत नसतांना अनेक प्रश्न सोडविल्याचा दावा त्यांनी केला.
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शहरात २५ वर्षे जुन्या वसाहतीमध्ये मूलभूत सूविधा नाहीत. भाजपा-सेना एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी मंत्री असतांना पण मनपात सत्ता आमची नसतांना नाट्यगृह आणि लांडोरखोरी उद्यान मंजूर करुन आणले असे त्यांनी सांगितले.
 
 
आ.सुरेश भोळे यांनी ‘सबका साथ सबका विकास’ हे मोदींचे ब्रीदवाक्य घेवून विकास करणार असल्याचे सांगत शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी २५ कोटी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करुन आणले. पण सत्ताधारी खाविआने विकास कामे करतांना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागात कमी कामे दिली असा आरोप केला. अमृत योजना, भूमिगत गटार आदी योजना केंद्र सरकारच्या आणल्या आहेत. लोकांनी जातपात न पाहता चांगले उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सत्ताधार्‍यांनी शहरातील गरीब जनतेचे अतिक्रमण काढले परंतु, १७ मजलीला परवानगी नव्हती मग तिच्या अतिक्रमणाचे काय?, विमानतळाचा फायदा सामान्य नागरिकांना नाही, परंतु विमानतळाचे कर्ज सामान्य नागरिकांच्या डोक्यावर आहे हे कसे? असे प्रश्‍न उपस्थित केले.
 
 
नितीन लढ्ढा म्हणाले की, सन २००० पर्यत पालिकेचा गाडा बरोबर चालत होता. २००१ ला ग्रहण लागले ते २१ महिने होते परंतु, ते सुटू शकले नाही. २०१२ साली प्रशासनाबरोबर चर्चा होवून हुडकोचे १२९ कोटींंचे कर्ज वनटाईम सेटलमेंट करुन ८० ते ९० कोटींमध्ये सर्व मिटणार होते. पण २०१३ ची निवडणूक डोळयासमोर ठेवून गाळयांबाबत केलेला ठराव क्र. १२३१ राज्य शासनावर दबाव टाकून रद्द करण्यात आला. खोटे बोलून लोकप्रतिनिधींनी व्यापार्‍यांकडून पैसा गोळा केला. गाळेधारकांची दिशाभूल करण्यात आली. मनपाच्या गाळे प्रकरणी जे अध्यादेश आज शासन काढू शकते ते २०१४ साली काढू शकत नव्हते का? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. युतीसाठी आम्ही दोन पावले पुढे गेलो पण युती झाली नाही. सेना राज्यात सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे आम्हीसुध्दा शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून मोठा निधी आणू शकतो असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या प्रश्नांना नितीन लढ्ढा निरुत्तर
नागरिकांनी परिसंवादात सहभाग घेत प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. यात खाविआने मनपात एमआयडीसीमध्ये सुविधा देवू शकणार नाही असा ठराव केला आहे याकडे लक्ष वेधले. तर १० वर्षात असे काय घडले की, ४५० कोटींचे कर्ज जळगावतील नागरिकांवर लादले गेले. गाळयांबाबत २००८ ला ठराव केला गेला आणि नंतर सलग १८ ठराव करण्यात आले. आम्ही जळगाव सोडून जायचे का? असा प्रश्न विनोद जवाहराणी यांनी विचारला. नागरिकांच्या प्रश्नांची सरबत्ती पाहताच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मंच सोडला. त्यापाठोपाठ हॉकर्सच्या धोरणावर युवकांनी नितीन लढ्ढा यांना धारेवर धरताच त्यांनीही निरुत्तर होवून परिसंवाद सोडत बाहेर जाणेच पसंत केले. या गोष्टीची सभागृहात बराच काळ चर्चा होती.
 
ना.गिरीश महाजनंाचा संदेश
परिसंवादात जलसंपदामंत्री गिरीश महाजन सहभागी होणार होते परंतु मुंबईला मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक असल्याने त्यांना तिकडे जावे लागले. ना.महाजन यांनी परिसंवादासाठी पाठवलेला व्हीडिओ संदेश प्रोजेक्टरव्दारे दाखवण्यात आला. त्यात ना.महाजन यांनी भाजपाला बहुमताने सत्ता द्या. एक वर्षात विकास करुन दाखवतो. जर विकास केला नाही तर विधानसभा निवडणुकीत आ.भोळेंसाठी मत मागायला येणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेडिकल हब आणले आहे. बहुमत द्या विकास करुन दाखवतो असे सांगत त्यासाठी २०० कोटी रुपये आणतो असा शब्दही त्यांनी दिला.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121