
नागपूर : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१० व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५१४ सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज रामगिरी निवासस्थानी करण्यात आला.
या कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, नागपूर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भिमनवार आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजनेमधील जास्तीत जास्त घरांचा समावेश सोडतीमध्ये करावा. पुढील दोन वर्षात दहा लाख परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्तीसाठी नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यात परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी हातभार लावण्यासाठी कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे. तर नागपूर मंडळाच्या १५१४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. कोकण व नागपूर मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला असून कोकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे. कोकण मंडळातील सदनिकांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट आहे.