जळगाव :
प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू बाळगल्याने मनपा आरोग्य विभागाने सोमवारी १९ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दंडापोटी ९५ हजार रुपये वसूल करण्यात आले.
महापालिकेच्या पथकाने सोमवारपासूनच प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. कर्मचार्यांची पथके मार्केट भागात फिरून प्रतिबंधित प्लास्टिक न वापरण्याची सूचना करताना दिसते होते. आरोग्य विभागाला १९ जणांकडे हे प्लास्टिक आढळून आले.
संबंधितांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रमाणे ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गोलाणी मार्केट, फुले मार्केट, केळकर मार्केट, गांधी मार्केट, अशोक टॉकीज गल्ली, संत कंवरराम मार्केट येथे ही कारवाई करण्यात आली.
प्लास्टिकची विक्री, खरेदी, उत्पादन किंवा जवळ बाळगणे दंडनीय गुन्हा ठरला आहे. यात पहिल्यांदा गुन्हा करणार्याला पाच हजार रुपये, दुसर्यांदा तोच गुन्हा केल्यास १० हजार आणि तीच व्यक्ती तिसर्यांदा गुन्हा करताना आढळल्यास २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांचा कारावास, अशी शिक्षा भोगावी लागणार आहे. नागरिकांनी, व्यापार्यांनी प्रतिबंधित प्लास्टिक जवळ बाळगणे अथवा त्याचा वापर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्यापार्यांचे साकडे, पॅकिंग मालावर कारवाई नको
महापालिकेने कारवाईचे अस्त्र उगारताच फुले मार्केटमधील व्यापार्यांनी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली. तामिळनाडू व अन्य राज्यात प्लास्टिक बंदी नाही. तेथील उत्पादक प्लास्टिक वेष्टनात पॅक केलेला माल आमच्याकडे पाठवितात. त्यामुळे या मालावर कारवाई करताना महापालिकेने सबुरीचे धोरण अवलंबावे, अशी व्यापार्यांची मागणी होती. त्यास आयुक्तांनी नकार दिला. मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कारवाई होत असताना त्यात केवळ जळगावला सवलत देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे व्यापार्यांना सांगितले.
प्रतिबंधित प्लास्टिक जमा करण्यासाठी दुपारी फिरणार घंटागाडी
जळगाव : शहरात दररोज सकाळी कचरा संकलन करणार्या घंटागाड्या आता दुपारीही नागरिकांकडे जाणार आहेत. मात्र, यावेळेत त्या प्रतिबंधित प्लास्टिक नागरिकांकडून जमा करणार आहेत. नागरिकांकडे अजूनही प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे. या वस्तू संकलित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी कचरा संकलनासाठी घरोघरी घंटागाड्या फिरतात. या गाड्या दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा शहरात फिरणार आहेत. नागरिकांनी त्यांच्याकडील प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा या गाड्यांमध्ये जमा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.