धामण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2018
Total Views |



धामण हा साप शेतातील उंदीर फस्त करून, तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकर्‍याचा मित्र ठरतो. पर्यावरणाच्या दृष्टीने धामण अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून संरक्षित सरपटणार्‍या प्राण्यांच्या यादीत धामण सापाचा समावेश करण्यात आला आहे.

धामण हा भारतात सर्वत्र आढळणारा बिनविषारी साप असून, तो ‘कोल्युब्रिडी’ सर्पकुलातील ‘कोल्युब्रिनी’ उपकुलात मोडतो. याचे शास्त्रीय नाव ‘टायास म्युकोसस’ आहे. हा साप दक्षिण व आग्नेय आशियातील अफगाणिस्तान, पाकिस्तानातील सिंध, तिबेट, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान, थायलंड, दक्षिण चीन इत्यादी प्रदेशांत आढळतो. सहसा सपाट प्रदेशांत राहणारा असला तरी समुद्रसपाटीपासून तो सुमारे दोन हजार मीटर उंचीवरही आढळलेला आहे. भारतात पट्टेरी धामण (टायास फसिओलेट्स) आणि वेलपाठी धामण (टायास ग्रॅसिलिस) या दोन जाती आढळतात.

धामण सापाची लांबी सव्वादोन ते अडीच मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याच्या रंगाच्या दाट करडा, पिवळसर अथवा तपकिरी अशा विविध छटा आढळतात. शरीराचा घेर सुमारे दहा सेंमी. असतो. शेपूट टोकदार असून, त्याची लांबी शरीराच्या सुमारे एक-चतुर्थांश असते. मान बारीक असून, डोके लांबट व स्पष्टपणे वेगळे दिसते. डोळे मोठे आणि बाहुल्या वाटोळ्या असतात व त्यांच्या भोवतालचा पडदा सोनेरी असतो. पाठीवरील खवल्यांच्या कडा काळ्या असतात व त्यामुळे जाळे असल्यासारखे दिसते. ओठांच्या काठावरच्या व गळ्याच्या बाजूंवरच्या खवल्यांच्या कडादेखील काळ्या असतात. पोट पांढरट किंवा पिवळसर असते.

धामण हा एक चपळ साप आहे. तो पाण्यात जलद पोहू शकतो. पोहताना त्याचे डोके पाण्याच्या बाहेर असते. झाडावर चढण्यातही हा साप तरबेज आहे व तो सुमारे सहा मीटर उंचीवरुन उडी मारू शकतो. त्याच्या मार्गात असलेल्या वस्तूला तो शेपटीने वेटोळे घालतो. त्यामुळे भक्ष्य पकडण्यास त्याला आधार मिळतो. पाली, पक्षी व इतर लहान पृष्ठवंशीय प्राणी हे त्याचे अन्न आहे. तसेच बेडूक, कासवाची लहान पिले, वटवाघळे व लहान साप तो खातो. त्याचे मुख्य भक्ष्य उंदीर आहे. शेतातील उंदीर फस्त करून, तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकर्‍याचा मित्र ठरतो. धामण आपले भक्ष्य पटकन गिळतो. प्रतिकार करू न शकणारे बेडकासारखे प्राणी तो जिवंतच गिळतो. नंतर तो आपल्या शरीराने जमिनीवर दाब देऊन, पोटातील भक्ष्याला मारतो.

विणीच्या हंगामात नर धामण आक्रमक नृत्य करतो. जमिनीपासून स्वत:चे शरीर उंचावर नेऊन, केवळ शेपटी जमिनीवर विसावलेल्या अवस्थेत तो नृत्य करतो. हे नृत्य म्हणजे स्वत:च्या क्षेत्राचे रक्षण व इतर नर सापांना त्या क्षेत्रात येण्यास मज्जाव करणे यासाठी असते. मादी धामण चकचकीत व पांढर्‍या रंगाची सहा ते १४ अंडी घालते. मादी अंड्यांना विळखा घालते. पिले तीन महिन्यांची झाल्यावर प्रौढावस्थेत येतात.

धामण हा दिनचर आहे. दिवसभर तो भक्ष्याची शिकार करण्यात दंग असतो. त्याचा वावर माणसाच्या आजूबाजूला जुन्या पडीक भिंती, झाडे-झुडपे, भातशेते इ. ठिकाणी असला तरी शक्यतो माणसाचे सान्निध्य तो टाळतो. त्याला कोंडीत पकडले, तर मात्र तो हल्ला करतो व हल्ला करताना शत्रूच्या तोंडावर नेम धरून प्रहार करतो. पर्यावरणाच्या दृष्टीने धामण अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून संरक्षित सरपटणार्‍या प्राण्यांच्या यादीत धामण सापाचा समावेश करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@