‘या शाळेत प्रवेश घेवू नये’ शाळेसमोर असा फलक लावणार
जळगाव :
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणार्या शाळांची तपासणी मोहीम राबविली होती़. तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी आपल्या पाल्याचा ‘या शाळेत प्रवेश घेऊ नये’ असा फलक या अनधिकृत शाळांबाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी मंगळवारी (२२ रोजी) दिली़ सर्वाधिक अनधिकृत शाळा मात्र ह्या चोपडा तालुक्यात आढळून आल्याचे मोहिमेत उघडकीस आले आहे.
दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात येते़ त्या अनुषंगाने यंदा स्वयं अर्थ सहाय्यीत शाळांची तपासणी करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते़ त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील १ ली ते ८ वी पर्यंतच्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहीम काही दिवसांपासून राबविण्यात आली होती़ अखेर ही मोहीम पूर्ण झाली आहे़ या मोहिमे दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाला धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील १३ शाळा या शासनाची परवानगी न घेता सर्रासपणे कारभार चालवित असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
अशा आहेत १३ अनधिकृत शाळा
चोपडा- अंबाडे खाज्यामुंडा निवासी आदिवसी आश्रमशाळा, मराठे खाज्या नाईक आश्रमशाळा, मराठे ओम गुरूदत्त उच्च प्राथमिक शाळा, मोहिदा गुरूकुल इंग्लिश मीडीयम स्कुल, चोपडा अलवीया इंग्लिश मिडीयम स्कूल,़ चाळीसगाव- मेहुणबारे सरस्वती इंग्लिश मीडीयम स्कूल, भडगाव- भडगाव स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल, भडगाव सरस्वती इंग्लिश स्कूल, एरंडोल- कासोदा आर्यन इंटरनॅशनल स्कूल, कासोदा होली इंग्लिश मीडीयम स्कूल, मुक्ताईनगर- मुक्ताईनगर डॉ़ एपीजे़ अब्दूल कलाम इंग्लिश स्कूल, पाचोरा- नगरदेवळा बालाजी इंग्लिश मीडीयम स्कूल, धरणगाव- पाळधी आर्यन इंटरनॅशनल स्कूल अशा १३ शाळा अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत़.
कारवाईसाठी प्रस्ताव पाठविणार
जिल्ह्यातील १३ शाळांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ तसेच शाळांवर कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी दिली़ तसेच अनधिकृत शाळांच्या बाहेर गटशिक्षणाधिकार्यांना सांगून पालकांनी आपल्या पाल्यांचा ‘या प्रवेश घेऊ नये’ असा फलक लावण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत़ या शाळांवर त्वरित कारवाई करण्यात येणार आहे़
- पोपट भोळे
सभापती- शिक्षण जि.प.जळगाव