घर भाड्याने देण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018   
Total Views |

 


 
 
 
बरेचदा घर तर भाड्याने द्यायचे असते, पण घरमालकाला यासाठीची नेमकी सुरुवात कुठून करावी, हेच कळत नाही. हल्ली घर भाड्याने देण्याचे-घेण्याचे ऑनलाईनही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण, तरीही घर भाड्याने देण्याची प्रकिया ही प्रत्यक्ष घरमालक-भाडेकरु यांच्या कराराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. तेव्हा, घर भाड्याने देताना नेमकी कोणती काळजी घ्यावी? रजिस्ट्रेशन, पोलिसांकडे नोंदणी वगैरे फॉरमॅलिटिझ नेमक्या कशा पूर्ण कराव्यात, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा हा लेख...
 

गुंतवणुकींच्या बऱ्याच पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे घरात गुंतवणूक. जेव्हा बांधकाम उद्योगात तेजी होती, तेव्हा यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला. पण, गेली पाच वर्षे बांधकाम उद्योगात मंदीचे वातावरण असल्यामुळे बांधकाम उद्योजकांच्या तसेच गुंतवणूकदारांच्या सदनिका गिऱ्हाईकांची वाट पाहात तशाच पडून राहिल्या आहेत. यावर उपाय म्हणजे घर भाड्याने देणे, अन्यथा घरात केलेली गुंतवणूक ‘डेड’ गुंतवणूक होते. नोकरीनिमित्त किंवा नोकरी बदलामुळे तसेच लग्नानंतर बरेच जण नव्या जागेच्या शोधात असतात. बांधकाम उद्योगातील मंदी आणखी काही वर्षे अशीच राहील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे घरात गुंतवणूक केलेल्यांपुढे सध्या दोनच पर्याय उपलब्ध आहेत. ते म्हणजे, जर गिऱ्हाईक मिळाले असेल, तर आहे त्या किमतीलाच घर विकणे. पण, त्यासाठी सध्या गिऱ्हाईक मिळणे किंवा जागा भाड्याने देणे तितकेच कठीण. जागांचे भाव वाढतील व चांगला परतावा मिळेल, ही आशा सध्या कोणत्याही गुंतवणूकदाराने ठेवू नये. घर घेण्यासाठी जवळजवळ सर्वच जण गृहकर्जे घेतात. स्वत: एवढा पैसा उभारून कर्ज न घेता घर घेणे बऱ्याच जणांना जमत नाही. घराचा ताबा मिळाल्यावर गृहकर्जाचे हप्ते भरावेच लागणार. त्यामुळे जर घर भाड्याने दिले तर निदान मिळणाऱ्या भाड्यातून घराच्या कर्जाचे हप्ते भरणे सहज शक्य होईल.

 

घर भाड्याने देण्यापूर्वी घर भाड्याने देण्याचा तुमचा निर्णय पक्का हवा. जर तुम्ही नवीन घेतलेले घर भाड्याने द्यायला तयार असाल, तर तो निर्णय लवकर होऊ शकतो. पण, तुम्ही स्वत: नव्या घरात जाऊन तुमचे वडिलोपार्जित घर, जिथे तुमचे वास्तव्य असल्यामुळे साहजिकच त्या घरात तुमची भावनिक गुंतवणूक असते, म्हणून असे घर भाड्याने देण्याचा निर्णय पटकन होत नाही. अशा घराची देखभाल-दुरुस्ती करून, त्याला रंगरंगोटी करून ते भाड्याने द्यावे लागते. तुमचे राहते घर भाड्याने देण्याच्या स्थितीत असलेच असे नाहीघर भाड्याने देताना कोणी ओळखीतली व्यक्ती मिळाली तर चांगले, नाहीतर जागा भाड्याने देण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागते किंवा ब्रोकरशी संपर्क साधावा लागतो. भाडे निश्चित करावे लागते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. ‘लिव्ह अॅण्ड लायसन्स’ करावे लागते. हा करार करताना जी रजिस्ट्रेशन फी व स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, ती जागा भाड्याने घेणारा व जागा भाड्याने देणारा अर्धी अर्धी भरतात. तसेच अधूनमधून घराची तपासणी करावी. आजूबाजूच्या लोकांकडून भाडेकरूंबद्दलचे मत विचारावे. जागा भाड्याने दिल्यानंतर जर दिलेली जागा स्वत:चा बंगला असेल, तर त्या भाडेकरूची माहिती पोलीस चौकीला कळवावी लागते व जर गृहनिर्माण सोसायटीत जागा असेल तर भाडेकरूंबाबतची माहिती सोसायटीच्या कार्यकारिणीला व जवळच्या पोलीस चौकीला कळवावी लागते. कारण, सध्या सर्वधर्मीय दहशतवादी, नक्षलवादी देशद्रोही कारवाई करण्यासाठी विविध ठिकाणी जागा भाड्याने घेऊन राहण्याचे प्रकार भरपूर वाढले आहेत.

 

सर्वप्रथम भाडे निश्चित करा

 

घर भाड्याने देण्याची मानसिक तयारी झाली की, सर्वप्रथम घराचे भाडे निश्चित करा. तुमच्या घराची जागा कुठे आहे? म्हणजे जागेच्या भौगोलिक स्थानावरून साधारण भाडे ठरत असते. स्थानिक ब्रोकरकडून जागेच्या भाड्याचा दर समजू शकतो. याबाबत केवळ एका ब्रोकररकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय न घेता, दोन ते तीन ब्रोकरकडून सविस्तर माहिती घ्यावी. तसेच त्या परिसरात आणखी कोणी जागा भाड्याने दिली असल्यास ते किती भाडे आकारतात, यावरून त्या परिसरातील भाड्याचा दर समजू शकेल. जागेचे भौगोलिक स्थान, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुखसुविधा, शेजार तसेच उपलब्ध पायाभूत गरजा व घराची एकूणच स्थिती या बाबींवरून घराचे भाडे ठरते. नवीन घरांना व आधुनिक सुशोभीकरण झालेल्या जुन्या घरांना चांगले भाडे मिळते. चांगले भाडे मिळण्यासाठी जर घराचे सुशोभीकरण करणार असाल तर, सुशोभीकरणासाठी येणारा खर्च व तुम्हाला मिळणारे भाडे हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे की नाही? ते पाहावे. त्याचबरोबर घराच्या सर्व खोल्या भाड्याने देणार आहात की केवळ एक खोली, याचाही विचार करावा. ही बाब खासकरुन अशा घरांसाठी लागू होते, जिथे तुमचे भरपूर सामान आहे. पण, धड ना ते तुम्हाला तुमच्या नवीन घरी नेता येईल किंवा भंगारातही देता येत नाही. अशावेळी भाड्याने द्यायच्या घरातील एका खोलीत तुम्ही ते सामान कुलूप लावून सुरक्षित ठेवू शकतात. त्यानुसार मग साहजिकच जितक्या खोल्या तुम्ही वापरायला देणार आहात, तेवढ्याचे खोल्यांचे तुम्हाला भाडे आकारावे लागेल.

 

भाडेकरू कसा हवा?

 

तुम्हाला भाडेकरू कसा हवा? एकटा राहणारा हवा की कुटुंबासकट राहणारा हवा? की विद्यार्थी हवेत? हल्ली कित्येक सोसायट्यांमध्ये विद्यार्थ्यांना किंवा एकट्याने राहणाऱ्यास जागा भाड्याने देण्यास परवानगी दिली जात नाही. एकट्याला किंवा काही विद्यार्थ्यांना जर जागा भाड्याने दिली तर त्यांचे मित्र रात्री-अपरात्री येऊन धिंगाणा घालण्याची बरीच उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे सोसायटीत विद्यार्थ्यांना जागा भाड्याने देणे बंद करण्यात आले आहेकिती काळासाठी जागा भाड्याने देणार आहात, याचाही निर्णय घ्यावयास हवा. घर गुंतवणूक म्हणून घेतलेले आहे की वैयक्तिक वापरासाठी घेतलेले आहे, यावरून घरमालक किती कालावधीसाठी जागा भाड्याने देणार याचा निर्णय घेऊ शकतो. जागा किती कालावधीसाठी भाड्याने देणार, यावरून कोणाला जागा द्यावयाची याचा निर्णय होऊ शकतो.

 

भाडेकरार निश्चिती

 

अनेक कारणास्तव कित्येक घरमालक जागा तशाच ठेवतात, पण भाड्याने देण्यास घाबरतात. त्यांना भीती वाटते की, भाडेकरुने जर जागा सांगितल्यावेळी रिकामीच केली नाही, तर कोर्टकचेरी कोण करत बसणार? घराच्या मूल्याच्या २ ते ३ टक्के रक्कम वर्षाला भाडे म्हणून मिळते. पूर्णतः अनोळखी व्यक्तीला जागा देणे जोखमीचे ठरु शकते. अशा व्यक्ती भाडे वेळेवर न देण्याचे प्रकार करू शकतात. भाडेच द्यायचे बंद करतात. ठरलेल्या तारखेत जागा रिकामीच करीत नाही, यामुळे घरमालकाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागू शकतो. घरमालकाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरमालक व भाडेकरु यांच्यात कायदेशीर करार व्हावयासच हवा. करार केलेला असेल, तर जोखीम फार कमी होते. कराराचा मसुदा योग्य व स्पष्ट हवा, सर्व महत्त्वाचे मुद्दे करारात अंतर्भूत हवेत. करार वकिलास दाखवून तो योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. घरमालक भाडेकरुकडून काही रक्कम ‘डिपॉझिट’ म्हणून घेऊ शकतो व भाडेकरुने घर सोडण्यापर्यंतचे सर्व भाडे दिलेले असेल व घराचे काही नुकसान केलेले नसेल, तर घरमालकाने घेतलेल्या ‘डिपॉझिट’ची रक्कम भाडेकरुला परत द्यावी लागते. कराराचा मसुदा दोघांनीही नीट वाचावा व दोघांना मान्य झाल्यानंतरच रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय सदर करार कायदेशीरदृष्ट्या वैध ठरत नाही. शहरांच्या ठिकाणी सब रजिस्ट्रेशन कार्यालय असते. त्या कार्यालयात स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी सरकारी नियमांनुसार भरून करार रजिस्टर करावा. काही काही जण सरकारी यंत्रणेत रजिस्टर न करता, करारावर नोटरीची सही घेऊन तो ‘नोटराईज्ड’ करतात. घर भाड्याने देणाऱ्याने हा ‘शॉर्टकट’ स्वीकारू नये. यात जोखीम होऊ शकते. जर भाडेकरू तुम्हाला त्रास देत असेल, भाडे नियमित देत नसेल किंवा जागा खाली करीत नसेल, अशावेळी सरकारी यंत्रणेकडे केलेला ‘रजिस्ट्रेशन’चा करारच तुम्हाला वाचवू शकेल.

 

जागा भाड्याने दिल्यानंतर निदान तीन महिन्यांतून एकदा तुमच्या घरात जाऊन तुम्ही घराची पाहणी करणे आवश्यक आहे. पाहणीत तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. जर एखादी बाब अयोग्य वाटली तर तुम्ही ती तत्काळ घर भाड्याने घेतलेल्याच्या नजरेत आणून देऊ शकता. शेजाऱ्यांकडून भाडेकरूच्या वर्तनाची माहिती घेऊ शकता. त्याला ‘युटिलिटी बिल’ म्हणतात. म्हणजे वीज बिल वगैरे वगैरे तो वेळेत भरतो की नाही याचीही खात्री करून घ्याजागा भाड्याने देणे, हे तुम्हाला आर्थिक वाढ करणारे ठरले पाहिजे. मनस्ताप करणारे ठरताना कामा नये. जागा भाड्याने देणे ही आर्थिक व कायदेशीर बाब आहे. या दोन्ही बाबींचे योग्य पालन झाल्यास दोघांनाही काहीही त्रास होत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@