नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीच्या ११ मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केल्या आहेत. आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीने नीरव मोदीच्या दुबईतील ११ मालमत्ता जप्त केल्या. या सर्व मालमत्तांची किंमत जवळपास ५६ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जप्त केलेल्या मालमत्ता विषयी ईडीने सांगितले की, नीरव मोदीच्या जप्त केलेल्या मालमत्ता निरव मोदी व मेसर्स फायरस्टार डायमंड एफजेडई या त्याच्या समूह कंपनीच्या आहेत. यावर आम्ही आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई केली असून लवकरच आम्ही त्याचा ताबा घेऊ. यापूर्वी देखील नीरव मोदी व त्याच्या परिवाराशी संबंधित ६३७ करोड रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये न्यूयार्क येथील सेंट्रल पार्कमधील दोन अपार्टमेंटच्या देखील समावेश होता.
आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीने पीएनबी बँकेसोबतच देशाच्या विविध भागांतून अनेक बँकामध्ये घोटाळे केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी देश सोडून फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी भारत सरकारने आपली संपूर्ण ताकत लावली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/