महिला खर्‍या अर्थाने संसाराचा आधार

    24-Nov-2018
Total Views | 46

सातगाव डोंगरीत आ.किशोर पाटील यांचे प्रतिपादन


 
पाचोरा : 
 
शेतीला जोडधंदा म्हणून शेळी, मेंढी पालन अतिशय उत्तम व्यवसाय आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगिनी संसाराचा गाडा चालविण्यासाठी कष्ट करीत राहतात. महिला खर्‍या अर्थाने संसाराचा आधार असल्याचे प्रतिपादन आ. किशोर पाटील यांनी केले.
 
तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील सावित्रीबाई फुले महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन व्यवसाय सहकारी संस्था सातगाव या संस्थेच्या फलकाचे अनावरण तथा सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी लागणार्‍या जनरल नॉलेज पुस्तकाचे वाटप समारंभात ते बोलत होते.
 
आ. पाटील पुढे म्हणाले की, चूल-मूल ही जबाबदारी सांभाळूनदेखील माता-भगिनी आर्थिक उत्पन्नातदेखील भर घालतात. महिलांनी अनेक व्यवसाय उभारले पाहिजे. त्यासाठी आपणास अर्थसाह्यासाठी गरज पडल्यास बँकांमार्फत आपल्यास कर्ज उपलब्ध करून देईल.
 
सर्व जाती-धर्माच्या महिलांनी एकत्र येऊन ग्रामीण भागामध्ये एक नवा आदर्श निर्माण करून दिला आहे. आ. किशोर पाटील व माजी आ. आर. ओ. पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
 
यावेळी अ‍ॅड. दिनकरराव देवरे, सिकंदर तडवी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आ. आर.ओ.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात नव्या तरुण पिढीला सांगितले की, आजची तरुण पिढीने शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले असून तरीदेखील नोकरी मिळत नाही. युवकांनी निराश होऊ नका, खचून जाऊ नका.शासकीय सेवा करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करा.
 
 
गणित, सामान्य ज्ञानाची कास धरा. उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हा, यासाठी प्रचंड मेहनत करा. जिद्दी चिकाटीतून यश आपल्या पदरात पडेल. ग्रंथ आपले गुरु, मित्र असतात. त्यांचा सांभाळ करा ते तुम्हाला सांभाळतील असे सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121