जळगाव, 15 नोव्हेंबर
रक्तनात्याचे कुटुंबातील सदस्यांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र देण्याचा कायदा पारित करणे, ना. विष्णू सावरा यांच्याकडून आदिवासी विकास विभागचे मंत्रिपद काढून घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी अॅड. गणेश एन. सोनवणे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीश महाजन, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. सुरेश भोळे यांना नुकतेच निवेदन दिले.
रक्त संबंधातील जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारे कुटुंबातील इतर व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचे नियम 2003 मध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारस करण्याकरिता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाने 15 नोव्हेंबर, 2017 रोजी आठ सदस्यांची उपसमिती गठीत केली होती.
दरम्यान, या समितीची एक महिन्याच्या आत अनुसूचित जमातीसाठी नियम 2003 मध्ये सुधारणा करण्याबाबत अभिप्राय देण्यासाठी नेमण्यात आली होती. परंतु, अद्याप याबाबत समितीने कोणतेही प्रयत्न केले नाही.
त्यामुळे टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या जमातींवर अन्याय होत आहे. तरी रक्त नात्याचा कायदा त्वरित पारित करण्यासाठी समाजबांधव उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी जमातींना सवलती मिळूच नये, यासाठी पक्षपातीपणा करून धोरणे ठरवीत आलेले आहेत. तरी त्यांच्याकडून मंत्रिपद काढण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.